उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगम अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे. महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासून कोट्यवधी लोकांनी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले आहे. परंतु, आता एका सरकारी यंत्रणेच्या अलीकडील अहवालाने पाण्याच्या शुद्धतेबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. गंगा-यमुना नदीत विष्ठेत आढळून येणारा कॉलिफॉर्म बॅक्टेरियाची उच्च पातळी असल्याचे आढळून आले आहे. या संगमात कोटींहून अधिक भाविकांनी आधीच स्नान केले आहे, तर अनेकजण स्नान करण्याच्या तयारीत आहेत, ज्यांच्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे सांगत या अहवालाचे खंडन केले आहे. अहवालात काय सांगण्यात आले आहे? संगमावरील पवित्र स्नान किती सुरक्षित आहे? हा जीवाणू काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया काय आहे?

फेकल कॉलिफॉर्म हा एक जीवाणू आहे, जो नैसर्गिकरित्या माणसाच्या आणि उबदार रक्त असलेल्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतो. पाण्यात त्यांची उपस्थिती म्हणजे पाणी दूषित होण्याचा इशारा आहे. हे जीवाणू पाण्यात आढळून येणे म्हणजे या पाण्यात विषाणूदेखील असू शकतात, जसे की माणसांच्या विष्ठेतून निघणारे विषाणू. पाणी पिणे, पोहणे, अंघोळ करणे किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरणे सुरक्षित आहे की नाही, हे निर्धारित करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करताना कॉलिफॉर्म बॅक्टेरियाची चाचणी केली जाते. गंगा नदीतील पाण्याचे विश्लेषण करणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालात म्हटले आहे की, विविध ठिकाणी निरीक्षण केले असता फेकल कॉलिफॉर्म (एफसी) आढळून आले.

सरकारी यंत्रणेच्या अलीकडील अहवालाने पाण्याच्या शुद्धतेबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. (छायाचित्र-पीटीआय)

गंगेमध्ये विष्ठेत आढळणाऱ्या कॉलिफॉर्मची चिंताजनक पातळी

मलनिस्सारणाच्या पाण्यात ‘फिकल कॉलिफॉर्म’ची मर्यादा २५०० युनिट प्रति १०० मिली असते. २००४ मध्ये शहरी विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने शिफारस केली होती की, नदीच्या पाण्यात विष्ठेत आढळणाऱ्या कॉलिफॉर्मची पातळी ५००एमपीएन/१०० एमएल पर्यंत मर्यादित असावी, नदीत सोडण्यासाठी कमाल मर्यादा २,५०० एमपीएन/१०० एमएल असावी. एमपीएन/१०० एमएल पाण्याच्या नमुन्याच्या १०० मिलीलीटरमध्ये उपस्थित असलेल्या जीवाणूंच्या संख्येचा संदर्भ देते. ‘सीपीसीबी’ने विष्ठेत आढळणाऱ्या कॉलिफॉर्मची सुरक्षित मर्यादा २,५०० एमपीएन/१०० एमएल ठेवली आहे. परंतु, महाकुंभमेळ्यात वसंत पंचमी शाही स्नानानंतरच्या एका दिवसानंतर ४ फेब्रुवारी रोजी नोंदवलेली आकडेवारी चिंताजनक आहे. सरकारी एजन्सीने शास्त्री पुलाजवळ ११,००० एमपीएन/१०० एमएल आणि संगम येथे गंगा नदीत ४,९०० एमपीएन/१०० एमएल पातळी नोंदवली गेली आहे. दोन्हीही सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आहेत.

या चाचणीत नदीच्या पाण्याची गुणवत्ता प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेशी सुसंगत नव्हती. महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रयागराज येथे मोठ्या संख्येने लोक नदीत स्नान करतात; ज्यामुळे कालांतराने नदीतील विष्ठेतही वाढ होते. ‘KnowYourH2O’ अमेरिकेतील जल संशोधन कार्यक्रमानुसार पाण्याची स्वच्छता न केल्याने जास्त सेंद्रिय पदार्थ निर्माण होतात; ज्यामुळे नंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. यामुळे मानवी आरोग्यालाच धोका निर्माण होत नाही तर जलचर पर्यावरणालाही धोका निर्माण होतो, असे संस्थेने ‘इंडिया टुडे’ला सांगितले.

आरोग्य धोके काय?

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) च्या अहवालानुसार, कॉलिफॉर्म जीवाणू थेट आजाराला कारणीभूत नसतात परंतु पाण्यात हानिकारक रोगजनकांच्या उपस्थितीचे एक मजबूत सूचक असतात. नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील अंतर्गत औषध विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अतुल काकर यांनी ‘पीटीआय’ला सांगितले, “आवश्यक स्वच्छता नसल्याने विष्ठेमधून जीवाणू पाण्यात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ते पाणी वापरण्यासाठी किंवा अंघोळीसाठीही सुरक्षित नाही. अहवालात हेच सूचित करण्यात आले आहे,” असे डॉ. काकर पुढे म्हणाले. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) च्या अहवालानुसार, कॉलिफॉर्म जीवाणू थेट आजाराला कारणीभूत नसतात परंतु पाण्यात हानिकारक रोगजनकांच्या उपस्थितीचे एक मजबूत सूचक असतात. (छायाचित्र-पीटीआय)

ते म्हणाले, जेव्हा जेव्हा पाणी दूषित असते तेव्हा ते त्वचेच्या आजारांसह विविध जलजन्य रोग, अतिसार, उलट्या, विषमज्वर आणि कॉलरासारख्या आजारास कारणीभूत ठरतात. यात्रेकरूंच्या आरोग्यासह गंगा दूषित झाल्यामुळे पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन कामांसाठी नदीवर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांनाही धोका निर्माण होतो. विष्ठेच्या जीवाणूंच्या सतत संपर्कामुळे त्वचेवर, पचनसंस्थेवर आणि अगदी श्वासोच्छवासाच्या आरोग्यावर परिणाम करणारे आजार होऊ शकतात.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची ‘एनजीटी’ला माहिती

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) सोमवारी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (एनजीटी) गंगा नदीमधील विष्ठेच्या दूषिततेबद्दलच्या निष्कर्षांची माहिती दिली. अहवालाचे पुनरावलोकन करताना, न्यायाधिकरणाने अनेक उल्लंघनांची नोंद घेतली आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (यूपीपीसीबी) सुचनांचे पालन न केल्याचेही सांगितले. ‘एनजीटी’ने स्पष्ट केले की, यूपीपीसीबी पूर्वीच्या निर्देशानुसार सर्वसमावेशक कार्यवाही अहवाल सादर करण्यात अयशस्वी ठरले.

त्यांनी पूर्ण अहवाल सादर करण्याऐवजी पाणी चाचणीच्या काही अहवालांसह केवळ एक कव्हर लेटर प्रदान केले होते. न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला ‘सीपीसीबी’च्या निष्कर्षांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि प्रतिसाद दाखल करण्यासाठी एक दिवस दिला आहे. याशिवाय, सदस्य सचिव, यूपीपीसीबी आणि प्रयागराज येथील गंगामधील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित राज्य प्राधिकरणाने १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत हजर राहावे, असे निर्देश दिले आहेत.