भारतातील श्वानपालन व्यवहारात अद्यापही परदेशी प्रजातींचा दबदबा असताना भारताने श्वानाच्या आणखी एका देशी वाणाची नोंदी केली आहे. हिमालयन शेफर्ड या प्रजातीची आता भारतीय नोंदणीकृत श्वान प्रजाती म्हणून नोंद झाली आहे. प्रजातींची ही नोंद कशी होते? ही नवी प्रजाती कुठली? वर्षानुवर्षे माणसाच्या जोडीने परिसरात राहणाऱ्या या प्रजातींची नोंद आजच का घेण्यात आली आणि त्याने साध्य काय होणार अशा अनेक प्रश्नांचा हा ऊहापोह…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वानांच्या प्रजातीची नोंद कशी होते?

भारतातील सर्व पशूधनाच्या स्थानिक वाणाची किंवा प्रजातींची नोंद राष्ट्रीय पशू अनुवांशिक संसाधन ब्युरो (एनबीएजीआर) ही संस्था करते. देशातील पाळीव पशू-पक्ष्यांच्या देशी वाणांचा शोध घेणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, देशी वाणांच्या प्रजातींचे मूळ स्वरूपात संवर्धन करणे या उद्देशाने १९२६ साली ही संस्था स्थापन झाली. आतापर्यंत वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांच्या २१९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यात गाई किंवा गोवंशाच्या ५३, म्हशींच्या २०, शेळ्यांच्या ३७, मेंढ्यांच्या ४४, घोड्यांच्या ७, उंटांच्या ९, डुक्करांच्या १३, गाढवांच्या ३, कोंबड्यांच्या १९, बदकांच्या २ तर याक आणि गीझच्या प्रत्येकी एका प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. श्वानाच्या एका प्रजातीची नव्याने नोंद झाल्यानंतर नोंदणीकृत भारतीय श्वान प्रजातींची संख्या आता ४ झाली आहे. नव्याने नोंद करण्यात आलेली श्वान प्रजाती म्हणजे हिमालयन शेफर्ड डॉग. कोणत्याही स्थानिक प्रजातीची नोंद करण्यासाठी ती प्रजाती भारतीय आणि त्याच्या मूळ नैसर्गिक स्वरूपातच असल्याची खातरजमा केली जाते. त्यासाठी त्याच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला जातो. त्या प्रजातीच्या प्राण्यांची किमान हजार संख्या असावी लागते. प्रजाती किंवा वाण नोंदवण्यासाठी पशू पालक, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, प्रजोत्पादन करणाऱया संस्था, शासकीय यंत्रणा असे कुणीही अर्ज करू शकते. मात्र, अर्जाबरोबर ती भारतीय, स्वतंत्र आणि मूळ स्वरूपातील प्रजाती असल्याचे पुरावे जोडणे आवश्यक असते. एखाद्या प्रजातीबाबतचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संशोधनपत्रिकेतील शोधनिबंध प्रसिद्ध झाला असल्यास किंवा किमान तीन वर्षे प्रजातीचा अभ्यास करून आवश्यक नोंदी करण्यात आलेल्या असतील किंवा राज्याच्या पशूधन विकास विभागाने आवश्यक नोंदी आणि कागदपत्रांसह अर्ज केला असल्यास त्याचा विचार करण्यात येतो. त्यानंतर आलेल्या अर्जानुसार स्वतंत्र समित छाननी आणि अभ्यास करून नोंदणीबाबत निर्णय घेते. ही नोंद किंवा मान्यता २५ वर्षांसाठी वैध असते.

हेही वाचा >>> स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?

कोणकोणत्या भारतीय श्वान प्रजाती आहेत?

हिमालयन शेफर्डची स्वतंत्रपणे नोंद व्हावी यासाठी हिमाचल प्रदेशच्या पशूधन विकास विभागाने २०२२ मध्ये अर्ज केला होता. दोन वर्षे या प्रजातीचा अभ्यास करून त्याची नोंद करण्यात आली. त्यासाठी स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. यापूर्वी तामिळनाडूमधील राजपलयम, चिप्पीपिराई आणि कर्नाटकातील मुधोळ हाऊंड या श्वान प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. खरेतर भारतीय श्वानांच्या वीसपेक्षा अधिक प्रजाती होत्या. मात्र अनेक प्रजातींचे कालौघात संकर झाले आणि त्याच मूळ गुणवैशिष्ट्ये राहिली नाहीत. आजही साधारण २० प्रजाती देशातील विविध भागांत दिसतात. बखरवाल, बंजारा हाऊंड, बुली कुत्ता, गल डोंग, गल टेरिअर, इंडियन स्पिट्झ, हाफा, इंडियन परिहा, कन्नी, जोनांगी, कैकाडी, कोंबई, मराठा ग्रे हाऊंड, रामनाथपुरम मंडई, विखन, रामपूर ग्रे हाऊंड अशा काही प्रजाती आहेत. यातील काही प्रजातींची संख्या आता हजारपेक्षा कमी आहे. तर काही प्रजातींची स्थानिक नावे आणि ओळख वेगवेगळी असली तरी त्या स्वतंत्र प्रजाती आहेत का याबाबत साशंकता आहे. उदाहरणार्थ बंजारा हाऊंड आणि मराठा हाऊंड यांची गुणवैशिष्ट्ये सारखीच आहेत. त्यामुळे त्या स्वतंत्र प्रजाती आहेत का याबाबत संभ्रम आहे. देशाच्या सीमांवरील राज्यातील प्रजाती या शेजारील देशांतही आढळतात.

 प्रजीतींची नोंद का महत्त्वाची?

कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्याच्या स्थानिक प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी मुळात त्याची नोंद आवश्यक असते. स्थानिक प्रजाती या परिसराशी अनुकूल झालेल्या असतात. भौगोलिक वातावरण, हवामान यानुसार प्रजातींची गुणवैशिष्ट्ये असतात. त्यांच्या नैसर्गिक क्षमतांची नोंद असणे हे त्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे काळानुरूप बाजारपेठीय ओळख मिळवून देण्यासाठीही प्रजातींची नोंद करणे, त्यांची गुणवैशिष्ट्ये मांडणे गरजेचे आहे. स्थानिक प्रजातींची नोंद झाल्यानंतर त्या प्रजातीचा जनुकीय ठेवा जपला जातो. जेणेकरून त्याचे मूळ स्वरूप राखण्यास मदत होते.

हिमालय शेफर्ड डॉगचे वैशिष्ट्य काय?

श्वानांमधील शेफर्ड हा गट म्हणजे मेंढपाळांना मदत करणारे श्वान. हिमालय शेफर्डही उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमधील मेंढपाळांकडून मेंढ्या राखण्यासाठी आवर्जून बाळगला जातो. काळ्या, राखाडी, भुऱ्या रंगात आढळणारी ही प्रजाती जाड, लांब केसांची असते. मजबूत शरीरयष्टी, पंजे आणि जबडा ही त्यांची पाहिल्याबरोबर ठसणारी वैशिष्ट्ये. स्मरणशक्ती, मालकाप्रति निष्ठा आणि जंगली श्वापदांचे हल्ले परतवून लावण्याची क्षमता यांमुळे शेकडो वर्षे स्थानिकांच्या पसंतीस उतरलेली ही प्रजाती आहे. त्याची अधिकृत नोंद आता झाली असली तरीही त्याचे २००५ साली पोस्टाचे तिकिट प्रसिद्ध करण्यात आले होते. भोटे कुकुर, गड्डी कुत्ता, भोटीया अशी त्याची स्थानिक नावे आहेत. मात्र, या प्रजातीची अद्याप कोणत्याही केनल क्लबने नोंद केलेली नाही.

हेही वाचा >>> Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?

केनल क्लब आणि एनबीएजीआर फरक काय?

केनल क्लब ही श्वान प्रजातींच्या, श्वानांच्या वंशावळीच्या नोंदी ठेवणारी आंतरराष्ट्रीय व्यवस्था किंवा संघटना आहे. भारतातही केनल क्लब कार्यरत आहे. तेथेही भारतीय श्वान प्रजातींची नोंद होते. मुळात केनल कल्ब आणि एनबीएजीआरच्या स्थापनेमागील हेतू आणि कामात फरक आहे. केनल क्लबला बाजारपेठीय अधिष्ठान आहे. त्यामुळे श्वान विक्री, प्रजोत्पादनाच्या लाखोंच्या व्यवहारात केनल क्लबच्या प्रमाणपत्राला मान्यता असते. त्यामुळे श्वानाचे वाण अस्सल आहे का याची हमी केनल क्लबच्या नोंदींवरून मिळते. एनबीएजीआरचा हेतू स्थानिक भारतीय प्रजातींचे संवर्धन हा आहे. यापूर्वी एनबीएजीआर नोंद केलेल्या चिप्पिपराई, राजपलयम, मुधोळ हाऊंड या प्रजातींची केनल क्लब ऑफ इंडियाने (केसीआय) नोंद केलेली आहे. मात्र हिमालय शेफर्डची स्वतंत्र प्रजाती म्हणून केसीआयने नोंद घेतलेली नाही. त्याशिवाय कन्नी, कोंबई, रामनाथपुरम या प्रजातींचे प्रमाणीकरण केसीआयने केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himalayan shepherd dog becomes the fourth indian official breed print exp zws