Hindi National Language Row : गेल्या काही दिवसांपासून देशभरात हिंदी भाषेवरुन राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध राज्यांतील लोकांनी परस्परांशी संवादासाठी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा राजकीय वर्तुळात सुरु झाला. तामिळनाडू, तेलंगणा इत्यादी दाक्षिणात्य राज्यांमधील सत्ताधारी आणि राजकीय नेतृत्वाकडून शहा यांच्या या प्रस्तावाला विरोध केला जात होता. हा वाद काही प्रमाणात शांत झाल्यावर दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने ‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही’, असे वक्तव्य केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा वाद सुरु झाला.
त्याच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने किच्चा सुदीपवर निशाणा साधला होता. तर दुसरीकडे टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी किच्चा सुदीपचे समर्थन केले होते. या मुद्द्यावरुन सध्या अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात ट्विटर वॉर सुरु होते. पण हा वाद नेमका काय? किच्चा सुदीपने नेमकं काय वक्तव्य केले होते? अजय देवगणची टीका काय? या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नेमकं प्रकरण काय?
दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हा नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. लवकरच तो ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी २३ एप्रिल रोजी या चित्रपटाचा म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात किच्चा सुदीपसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी त्याने दाक्षिणात्य चित्रपट, हिंदी चित्रपट आणि हिंदी भाषेवर वक्तव्य केले.
“मला अजिबात लाज वाटत नाही…”, अजय देवगणच्या टीकेनंतर किच्चा सुदीपचे प्रत्युत्तर
“दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.” असे त्याने यावेळी म्हटले होते.
त्यापुढे तो म्हणाला, “सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यातून त्यांना हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत.”
त्याच्या या संपूर्ण विधानानंतर हिंदी भाषेबद्दल त्याने केलेले वक्तव्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर विविध प्रतिक्रियाही उमटायला सुरुवात झाली. या वादावर नुकतंच अभिनेता अजय देवगणने ट्विट करत संताप व्यक्त केला.
अजय देवगण काय म्हणाला?
अजय देवगण याने काल रात्री उशिरा या संपूर्ण प्रकरणावर एक ट्विट केले होते. यात तो म्हणाला, “किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन.” अजयच्या या ट्विटनंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. यानंतर किच्चा सुदीपला जास्त प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
किच्चा सुदीपचे स्पष्टीकरण
किच्चा सुदीपने वक्तव्य केल्यानंतर यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र अजय देवगणच्या ट्विटनंतर मात्र त्याने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. किच्चा सुदीपने या संदर्भात सलग तीन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल सविस्तर माहिती अजय देवगणसह सर्वांनाच दिली.
“सर, मी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले होते, तो मुद्दा तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा संपूर्ण मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकेन. मला असे बोलायचे नव्हते. कोणाच्याही भावना दुखावणे, कोणत्याही वादाला तोंड फोडणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, मी हे असे का करेन सर.
मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय अजून पुढे वाढवायचा नाही. मला असे वाटतं की हा विषय आताच संपायला हवा. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या बोलण्याचा हे उद्दिष्ट नव्हते, जे सध्या समजलं जात आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. मी तुम्हाला लवकरच भेटेन, अशी आशा व्यक्त करतो.
सर अजय देवगण, तुम्ही जो हिंदी मजकूर पाठवला आहे, तो मला समजला आहे. याचे कारण म्हणजे आपण सर्वजण हिंदीचा आदर करतो. त्यावर प्रेम करतो आणि आम्ही ही भाषाही शिकत आहोत. याची अजिबात लाज वाटत नाही सर. पण मी फक्त हाच विचार करत आहे की मी हेच ट्विट जर कन्नड भाषेत केले असते, तर काय झाले असते. सर आपण सगळे भारताचे आहोत ना?” असे किच्चा सुदीप स्पष्टीकरण देताना म्हटले.
किच्चा सुदीपच्या या स्पष्टीकरणानंतर अजय देवगणने पुन्हा एकदा यावर भाष्य केले. अजयने यानंतर केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, “हॅलो किच्चा सुदीप. तू माझा मित्र आहेस. माझा गैरसमज दूर करण्यासाठी तुझे खूप खूप आभार. मी नेहमी सर्वच सिनेसृष्टीला एक म्हणून पाहिले आहे. आपण सर्वच प्रत्येक भाषेचा आदर करतो आणि प्रत्येकाने आपल्या भाषेचा आदर करावा अशी अपेक्षा करतो. कदाचित, तुझ्या वक्तव्याचे भाषांतर करताना काही तरी चुकले असावे.”
दरम्यान अजयचे हे ट्विट पाहिल्यानंतर किच्चा सुदीपने अजयला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “एखाद्या वक्तव्याचे भाषांतर करणे आणि त्याचा अर्थ लावणे हा एक वेगळा दृष्टीकोन आहे. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेतल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देत नाही. कारण ते प्रकरण नेमकं काय आहे, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. अजय देवगण सर, मी तुम्हाला याबद्दल दोष देत नाही. पण जर तुम्ही माझ्या एखाद्याचा चांगल्या गोष्टीचे कौतुक केले असते तर तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण ठरला असता. असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले.
“हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही तर…”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान किच्चा सुदीप आणि अजय देवगण यांच्यात या मुद्द्यावर ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण वादावर किच्चा सुदीपने पडदा टाकला असला तरी काहीजण त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अजय देवगणने त्याचे वक्तव्य नीट समजून न घेता भाष्य केल्याने त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, राजकारणी तसेच सर्वसामान्य व्यक्ती यावर भाष्य करताना दिसत आहे. यावेळी ते अजय देवगणवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे.