पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १९६० पासून हिंदू मंदिर जीर्ण अवस्थेत होते. आता ६४ वर्षांनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाकिस्तान सरकारने एक कोटी पाकिस्तानी रुपयांचा (३६,००० डॉलर्स) निधी मंजूर केला आहे. पाकिस्तानी मीडिया आउटलेट ‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (इटीपीबी) ने पंजाबमधील रावी नदीच्या पश्चिमेकडील नरोवालच्या जफरवाल शहरात बाओली साहिब मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. इटीपीबी ही पाकिस्तानमधील अल्पसंख्याक प्रार्थनास्थळांवर देखरेख करणारी एक संस्था आहे. हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय पाकिस्तानने कसा घेतला? या निर्णयामागील हेतू काय? त्याविषयी जाणून घेऊ.
पाकिस्तान हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार का करत आहे?
पंजाबच्या नारोवाल जिल्ह्यात सध्या हिंदू मंदिर नाही, त्यामुळे या भागात राहणाऱ्या हिंदूंना घरी धार्मिक विधी करणे किंवा सियालकोट आणि लाहोरमधील मंदिरांमध्ये जाणे भाग पडत आहे. नारोवालमध्ये सध्या १,४५३ हून अधिक हिंदू राहतात. पाकिस्तान धर्मस्थान समितीच्या मते, पाकिस्तानच्या स्थापनेनंतर नारोवाल जिल्ह्यात ४५ हिंदू मंदिरे होती. परंतु, कालांतराने ही सर्व मंदिरे दुरुस्तीअभावी मोडकळीस आली आणि आता या प्रदेशात हिंदूंना पूजा करता येईल अशी जागा नाही.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कोण प्रयत्न करत आहे?
बाओली साहिब मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाकिस्तान धर्मस्थान समितीने सर्वात जास्त प्रयत्न केले आहेत, असे पाक धर्मस्थान समितीचे माजी अध्यक्ष रतनलाल आर्य यांनी सांगितले. आता, ईटीपीबी चार कनाल (एक युनिट) जमिनीवरील बांधकामावर देखरेख करत आहे आणि सीमांसह भिंतींच्या बांधकामाला प्राधान्य देत आहे, असे ‘डॉन’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रयत्नात दोन प्रमुख व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; ते आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या वन मॅन कमिशनचे अध्यक्ष आणि मंजूर मसीह आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शोएब सिद्दल.
पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले की, बाओली साहिब मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे हिंदू समाजाची दीर्घकाळची मागणी पूर्ण होईल आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचे धार्मिक विधी करण्याची परवानगी मिळेल. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर ते पाकिस्तान धर्मस्थान समितीकडे सोपवले जाईल. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू राहतात. परंतु, समुदायाच्या मते देशात ९० लाखांहून अधिक हिंदू राहतात. पाकिस्तानची बहुसंख्य हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.
हेही वाचा : पाकिस्तानात पुन्हा पोलिओचा फैलाव; कारण काय?
पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे का पाडण्यात आली?
गेल्या वर्षी कराचीतील दीडशे वर्षे जुने मंदिर, जुने आणि धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर ते पाडण्यात आले होते. त्यामुळे हिंदू समाजाला धक्का बसला होता. केअरटेकरच्या म्हणण्यानुसार, परिसरातील सुमारे ४०० ते ५०० स्क्वेअर यार्डमध्ये असलेले हे मंदिर वर्षानुवर्षे विकासकांचे लक्ष्य होते, अशी बातमी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. दुसऱ्या घटनेत हल्लेखोरांच्या एका गटाने गेल्या वर्षी १६ जुलै रोजी सिंधच्या काश्मोरमध्ये एका हिंदू मंदिरावर ‘रॉकेट लाँचर’ने हल्ला केला होता. हल्लेखोरांनी घौसपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिरावर आणि त्यालगतच्या हिंदूंच्या घरांवर हल्ला केला, असे वृत्त पीटीआयने दिले.