गेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या सहभोजनाचे (स्टेट डिनरचे) परंपरागत निमंत्रण ‘इंडियाचे राष्ट्रपती’ या ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ या शीर्षकाने पाठवण्यात आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले होते. विरोधकांच्या एकत्रित युतीला ‘इंडिया’ असे नाव दिल्याने भाजपाकडून’ भारत’ या नावाला मुद्दाम प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. तर सत्ताधारी पक्षाने ‘काँग्रेसला भारत या नावाबद्दल काय अडचण आहे?’ असा सवाल केला. घटनेत इंडिया आणि भारत या दोन्हींचा उल्लेख आहे, संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये म्हटल्याप्रमाणे “इंडिया, म्हणजे भारत, हा राज्यांचा संघ असेल.” याशिवाय भारताची वेगवेगळी नावे आहेत. ज्यात हिंदुस्थान, प्राचीन भारतवर्ष, आर्यावर्त इत्यादी नावांचा समावेश होतो.
इंडिया आणि भारत यासंदर्भातील वाद हा द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर समोर आला होता. हिंदुत्त्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या ग्रंथांमध्ये हे सर्व विषय सविस्तर हाताळले आहेत. हिंदुस्थान आणि भारत ही नावे आणि सनातन धर्म, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातील फरक यांविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काय नमूद केले आहे, ते जाणून घेऊ.
आर्य आणि सप्तसिंधूचा प्रदेश
सावरकर नमूद करतात की, हिंदू आणि हिंदुस्थान या संज्ञा सिंधू आणि सिंधूमधील म्हणजेच उत्तरेकडील इंडस किंवा सिंधू नदी आणि दक्षिणेकडील हिंदी महासागर यांच्यामध्ये राहणारे लोक असे वर्णन करता येऊ शकते. ते पुढे नमूद करतात ‘सिंधू’ हे नाव आर्यांनी दिलेले आहे असे म्हटले जाते. पर्शियन आणि प्राकृत या दोन्ही भाषेत S ची जागा H ने घेतली त्यामुळे कदाचित नंतरच्या काळात सिंधूचे हिंदू झाले असावे असे मानले जाते, तरी सावरकर नमूद करतात की; आर्यांनी कदाचित या प्रदेशात राहणाऱ्या स्थानिक जमातींद्वारे आधीच वापरलेले नाव निवडले असावे, त्यामुळे हिंदू हा शब्द स्थानिक असल्याचे त्यांनी नोंदविले आहे.
आणखी वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?
सावरकर म्हणतात, आर्यांच्या पहिल्या टोळीने सिंधूचा किनारी भाग आपल्या वास्तव्यासाठी कधी निवडला हे सांगणे आज कठीण असले तरी, ‘हे निश्चित आहे की, प्राचीन इजिप्शियन आणि बॅबिलोनियन लोकांनी त्यांची भव्यदिव्य सभ्यता निर्माण करण्यापूर्वी सिंधूचे पवित्र पाणी हे दररोज सुगंधित यज्ञाच्या धुराचे आणि वैदिक स्तोत्रांच्या मंत्राने गुंजत असलेल्या खोऱ्यांचे साक्षीदार होते, हा आध्यात्मिक भाग त्यांच्या (आर्यांच्या) आत्म्याला चैतन्य देणारा होता. सावरकर म्हणतात की, आर्यांनी स्वतःला सप्तसिंधू म्हटले आहे.
आर्यांनी सिंधू नदीच्या कृतज्ञतेपोटी, अगदी स्वाभाविकपणे स्वतःसाठी सप्तसिंधू हे नाव वापरले. आणि ही संज्ञा वैदिक काळात संपूर्ण भारतासाठी वापरली जात होती, याचे दाखले आपल्याला जुन्या नोंदींमध्ये सापडतात. किंबहुना याचा उल्लेख ऋग्वेदातही केलेला आहे. ते म्हणतात की, ‘हप्ता हिंदू’ हा शब्द अवेस्तामध्ये आढळतो, हा एक झोरास्ट्रियन प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे. त्यानंतर ते असा युक्तिवाद करतात की, सिंधू हे नाव आर्यांपेक्षा जुने असू शकते, ज्यांनी हे नाव त्यांच्या आगमनापूर्वी या भूमीत राहणाऱ्या जमातींकडून घेतले होते.
आणखी वाचा: नेताजींच्या मृत्यूचे गूढ खरंच तैवानमध्ये दडलंय का?
सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, हे बहुधा शक्य आहे की महान सिंधूला या भूमीतील मूळ रहिवासी ‘हिंदू’ म्हणूनच ओळखत असतील. परंतु आर्यांच्या वास्तव्यानंतर, त्यांच्या भाषाशास्त्रीय आणि बोलण्याच्या पद्धतीत हिंदू कदाचित सिंधू झाली असण्याची शक्यता आहे. संस्कृत मध्ये एस हा एच शी समतुल्य असल्याने हे घडले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशा प्रकारे हिंदू हे नाव या भूमीला आणि त्यात राहणाऱ्या लोकांचे असे अनादी काळापासून मिळाले आहे आणि सिंधू हे वैदिक नावही त्याचेच नंतरचे आणि दुय्यम स्वरूप आहे.
हिंदुस्थान आणि भारत
सावरकर म्हणतात की, जेव्हा सत्तेचे केंद्र सप्तसिंधूपासून गंगेच्या खोऱ्यामध्ये स्थलांतरित झाले तेव्हा भारत हा शब्द आला. “आर्यवर्त किंवा ब्रम्हवर्त हे शब्द सिंधूपासून समुद्रापर्यंत संपूर्ण खंडाला सामावून घेणारे आणि राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट असलेल्या विशाल संश्लेषणाला व्यक्त करण्यासाठी इतके योग्य नव्हते. प्राचीन लेखकांनी परिभाषित केल्याप्रमाणे आर्यावर्त म्हणजे हिमालय आणि विंध्य यांच्यामध्ये असलेली भूमी…. ज्यांनी आर्य आणि गैर-आर्य लोकांना एका समान वंशात जोडले होते अशा लोकांसाठी हे एक सामान्य नाव म्हणून ते काम करू शकत नाहीत…
सावरकर म्हणतात की, “हा भरत कोण होता, वैदिक किंवा जैन किंवा त्याने नेमका कोणत्या काळात राज्य केले” या अनुमानात प्रवेश न करता, हे जाणून घेणे पुरेसे आहे की “त्याचे नाव केवळ मान्यच नव्हते तर आर्यावर्त आणि दाक्षिणापथातील लोक त्यांच्या समान मातृभूमीला आणि त्यांच्या सामान्य सांस्कृतिक साम्राज्याला संबोधण्यात आनंदित होते.
असे असले तरी ते असा युक्तिवाद करतात की, “परंतु हा नवा शब्द भारतवर्ष आपले जन्मजात नाव सिंधू किंवा हिंदू पूर्णपणे दाबू शकला नाही किंवा त्या नदीवर आपण जे प्रेम केले ते आपल्याला विसरताही आले नाही.” किंबहुना ते पुढे जावून असेही नमूद करतात की, परदेशी लोकही भारताची भूमी सिंधू भूमी म्हणूनच ओळखतात. यासाठी ते राजा विक्रमादित्यचा नातू शालिवाहन याने दिलेल्या वर्णनाचा स्पष्ट उल्लेख करतात. त्याने नमूद केल्या प्रमाणे आर्यांचा सर्वोत्तम देश सिंधुस्थान म्हणून ओळखला जातो तर म्लेंच्छ देश सिंधूच्या पलीकडे आहे.” नंतर ते असा युक्तिवाद करतात की सम्राट भरत निघून गेला तरी सिंधू कायम राहते. “आपल्या देशाच्या नावांपैकी सर्वात प्राचीन नाव म्हणजे सप्तसिंधू किंवा सिंधू. आपल्या राष्ट्राला नदीशी जोडणारे आणि ओळखणारे नाव, आपल्या बाजूला निसर्गाची नोंद करते आणि आपले राष्ट्रीय जीवन एका पायावर उभे करते, म्हणजेच मानवी गणनेनुसार, अनंतकाळपर्यंत टिकून राहते.
सावरकरांनी केलेली सनातन धर्म, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांची व्याख्या
सावरकर सनातन धर्माच्या अनुयायांचे वर्णन करतात, ज्यांना श्रुती, स्मृती आणि पुराणांचा अधिकार असतो. श्रुती आणि स्मृती या दोन्ही वैदिक साहित्याचा संदर्भ घेतात, श्रुती हे प्रथमदर्शनी ज्ञान आहे, जे ऐकले गेले होते (वेद, उपनिषद इ.), तर स्मृती म्हणजे स्मृतीतून लिहिलेले ज्ञान (उपवेद, तंत्र इ.). श्रुती, स्मृती आणि पुराण किंवा सनातन धर्माने सांगितल्याप्रमाणे, बहुसंख्य हिंदू धर्माच्या त्या पद्धतीचे सदस्य आहे. त्यांना वैदिक धर्मी म्हटले तरी हरकत नाही. परंतु याशिवाय इतर हिंदू आहेत जे अंशतः किंवा पूर्णतः काही पुराण, काही स्मृती आणि काही श्रुती नाकारतात.
सावरकर स्पष्ट करतात की, “बहुसंख्य हिंदूंचा धर्म प्राचीन स्वीकृत उपनाम, सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृती-पुराणोक्त धर्म किंवा वैदिक धर्म याद्वारे उत्तम प्रकारे दर्शविला जाऊ शकतो; उर्वरित हिंदूंचा धर्म त्यांच्या संबंधित आणि स्वीकृत नावांनी शीख धर्म किंवा आर्य धर्म किंवा जैन धर्म किंवा बुद्ध धर्म या नावांनी दर्शविला जाईल. म्हणून वैदिक किंवा सनातन धर्म हा केवळ हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्माचा एक संप्रदाय आहे, परंतु त्याच्या तत्त्वांमध्ये योगदान देणारे बहुसंख्य असले तरीही. हिंदुत्वाबद्दल ते म्हणतात की, “हिंदुत्व हा शब्द नसून इतिहास आहे. या शब्दाला अध्यात्मिक किंवा धार्मिक इतिहासच नाही तर संपूर्ण इतिहास आहे. हिंदू धर्म हा केवळ हिंदुत्वाचा एक भाग आहे.”