शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) सुवर्ण मंदिर संकुलातील अकाल तख्तासमोरील दोन पवित्र निशान साहिबांचा केशरी रंग बदलून बसंती रंग केला आहे. बसंती रंग वसंत ऋतूशी संबंधित पिवळा रंग आहे; ज्याला पंजाबमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. सुवर्ण मंदिरातील निशान साहिबचा रंग बदलण्याच्या पाच दिवस आधी कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथील ऐतिहासिक गुरुद्वारा असलेल्या, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्याशी संबंधित असलेल्या बेर साहिब येथील निशान साहिबचा रंग बदलण्यात आला होता.
निशान साहिब हा शीख धर्मियांचा पवित्र ध्वज असून तो सर्व गुरुद्वार्यांवर फडकवला जातो. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमधील सर्व गुरुद्वारे ध्वजाचा रंग बदलण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती एसजीपीसी समितीच्या एका अधिकाऱ्याने दिली. दिल्लीतील गुरुद्वारांचे व्यवस्थापन करणारी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (डीएसजीएमसी) ‘एसजीपीसी’च्या नेतृत्वाचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. परंतु, हा निर्णय घेण्यामागील कारण काय? याचा इतिहास जाणून घेऊ.
हेही वाचा : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बालविवाहाची प्रथा? २४ वर्षांत ३ लाख बालविवाह झाल्याचं उघडकीस
केशरीपासून बसंतीपर्यंत
या बदलापूर्वी, बहुतेक एसजीपीसी गुरुद्वारांमध्ये केशरी निशान साहिब होते. केशरी निशान साहिबचे शिरोमणी अकाली दल (एसएडी) या राजनेतिक पक्षाच्या ध्वजाशी अगदी साम्य आहे. २०२० मध्ये मोहालीच्या सेक्टर ६० मधील गुरुद्वारा सच्चा धन साहिबचे अध्यक्ष राजिंदर पाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली निशान साहिबचा रंग बदलून केशरीपासून बसंती करण्यात आला होता. २०२२ मध्ये निवडून आलेल्या त्यांच्या उत्तराधिकार्याने पुन्हा निशान साहिबचा रंग बदलून केशरी केला. त्यानंतर राजिंदर पाल सिंग यांनी अकाल तख्तशी संपर्क साधला आणि अधिकृत शीख आचारसंहितेनुसार बसंती रंगाचे निशान साहिब फडकवावे असे सांगितले.
या वर्षी ६ जुलै रोजी अकाल तख्तच्या जथेदारांनी एसजीपीसीला पत्र लिहून निशान साहिबच्या रंगावरून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यास सांगितले होते. पिवळसर आणि राखाडी निळा हे संहितेमध्ये विहित केलेले रंग आहेत. परंतु, केशरी आणि बसंती हे दोन्ही रंग पिवळ्या रंगाच्याच छटा मानल्या जाऊ शकतात. हिंदू धार्मिक रंगासारखा दिसणारा केशरी रंग बहुतेक गुरुद्वारांमध्ये वापरला जातो, तर निहंग पंथीय बहुतेक निळ्या निशान साहिबांचा वापर करतात.
इतिहासातील वादविवाद
१९९५ मध्ये एसजीपीसीच्या गुरमत प्रकाशमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात केशरी आणि बसंतीवरील मतभेद स्वातंत्र्यपूर्व काळात असल्याचे सूचित करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगांवर वादविवाद केल्यामुळे अकाली नेत्यांना ध्वजात शीख रंगाचा समावेश हवा होता. काँग्रेसने शिखांच्या मागणीला सहमती दर्शवली होती असे काही पुरावेही आहेत. परंतु, ऑगस्ट १९३० मध्ये बाबा खडक सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसजीपीसीने त्याच्या सर्वसाधारण सभागृहाच्या बैठकीत शिखांना शीख ध्वज घेऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यास सांगणारा ठराव संमत केला.
१९३१ मध्ये राष्ट्रध्वजातील एक रंग म्हणून केशरी रंगाला समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसजीपीसीचे अध्यक्ष झालेले मास्टर तारा सिंग यांनी केशरी रंगाला होकार दिला. परंतु, बाबा खडक सिंग यांनी आग्रह धरला की, फक्त बसंती रंगच स्वीकार्य आहे. १९३६ मध्ये अधिकृत शीख आचारसंहितेने असे नमूद केले की, निशान साहिबचे कापड एकतर झांथिक (बसंती) किंवा राखाडी निळ्या (सुरमई) रंगाचे असावे. परंतु, काही दशकांमध्ये केशरी हा निशान साहिबचा सर्वात सामान्य रंग ठरला आहे.
“आम्ही नवा गोंधळ निर्माण करू इच्छित नाही. निशान साहिबसाठी कोणता रंग वापरायचा हे ठरवण्यासाठी आम्ही अकाल तख्तचे जथेदार आणि इतर तज्ज्ञांबरोबर बसू. पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. आम्ही योग्य रंग ठरवू आणि कळवू,” असे दरबार साहिब (सुवर्ण मंदिर)चे व्यवस्थापक भगवंत सिंग यांनी यापूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते.
केशरी रंग कसा लोकप्रिय झाला?
पंजाबमधील दहशतवादाच्या काळात केशरी रंगाला लोकप्रियता मिळाल्याचे दिसते. खलिस्तान समर्थक लेखक सरबजीत सिंग घुमान यांच्या मते, जर्नेल सिंग भिंद्रनवाले आपल्या भाषणात केशरीचा उल्लेख करायचे आणि शिखांना केशरी झेंड्याखाली एकत्र येण्यास सांगायचे. “अकाल तख्तवरील हल्ल्यानंतर (ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान) समाजात संताप निर्माण झाला आणि केशरी रंग प्रतिकाराचे प्रतीक ठरला. शीख तरुणांनी केशरी पगडी घालण्यास सुरुवात केली,” असे सरबजीत सिंग घुमान म्हणाले. १९८४ नंतर पोलिस अनेकदा केशरी पगडी किंवा दुपट्टा घातलेला कोणताही व्यक्ती अतिरेक्यांचा सहानुभूतीदार असल्याचा संशय व्यक्त करायचे.
अतिरेक्यांची प्रशंसा करणाऱ्या अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये केशरी रंगाचा उल्लेख आहे. उत्तर पश्चिम दिल्लीचे माजी भाजपा खासदार, पंजाबी गायक हंस राज हंस यांनी केशरी पगडी घालून ‘पट्टा पट्टा सिंहन दा वैरी’ गायले. हे गाणे १८ व्या शतकातील शीख लोकांबद्दल होते; ज्यांना मुघल आणि अफगाणांनी लक्ष्य केले होते. शीख धर्मातील उदासी आणि निर्मला पंथांना हिंदू परंपरांशी संरेखित केले जाते. त्यांनी शिखांमध्ये केशरी रंगाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा केशरी आणि आजचा हिंदू धर्मातील भगवा रंग एकरूप नसला तरी काही शीख विद्वानांनी असा युक्तिवाद केला आहे की, शिखांमधील केशरी रंगाची लोकप्रियता हिंदू धर्माच्या वर्चस्ववादी प्रभावाचा परिणाम होती.
राजिंदर पाल सिंग म्हणाले, “सर्व गुरुद्वारांमध्ये १९७० च्या उत्तरार्धात आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत बसंती रंगाचे निशान साहिब असायचे. तो अलीकडेच बदलला आहे. उजव्या विचारसरणीच्या हिंदू संस्थांच्या प्रभावाखाली गुरुद्वारांमध्ये केशरीच्या नावाखाली भगव्या रंगाचा वापर केला जात आहे, असेही मला वाटते. यामुळेच शीख आचारसंहितेमध्ये जे लिहिले आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी अकाल तख्तशी संपर्क साधला,” असे ते म्हणाले. सरबजीत सिंग घुमान यांनी निदर्शनास आणून दिले की बसंती, केशरी आणि भगवा या सर्व पिवळ्या रंगाच्या छटा मानल्या जाऊ शकतात. “जेव्हा संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांनी केशरी रंग लोकप्रिय केला, तेव्हा जवळजवळ हा रंग उजव्या विचारसरणीच्या हिंदू संस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या भगवासारखाच होता. आता वापरात असलेला केशरी रंग वेगळा आहे,” असे ते म्हणाले.
राजकारणातील रंग
शीख आणि पंजाबींच्या संस्कृतीत बसंती रंग नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. भगतसिंग यांच्या शौर्य आणि बलिदानाशी या रंगाचा संबंध आहे. लोकप्रिय गीत ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे राम प्रसाद बिस्मिल यांनी तुरुंगात असताना लिहिले होते. भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांनी हे गीत देशभक्तिपर गीत म्हणून गायले होते. आम आदमी पार्टीही (आप) ते योग्य करण्याचा प्रयत्न करताना दिसते, म्हणजेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्यासह पक्षाचे नेते बसंती पगडी आणि दुपट्टे परिधान करतात. पंजाबमध्ये पांढरी पगडी परंपरागतपणे काँग्रेसशी संबंधित आहे.
एसएडी पक्षाचा झेंडा केशरी आहे, पण पक्षाचे नेते निळ्या पगड्या परिधान करतात. शीख लेखक भाभीषण सिंग गोराया म्हणाले, “१९९८ मध्ये ‘शीख मॉनिटर’ या इंग्रजी मासिकात एक लेख प्रकाशित झाला होता; ज्यामध्ये तत्कालीन एसजीपीसी अध्यक्ष गुरचरण सिंह तोहरा यांच्यावर एसजीपीसी गुरुद्वारांमधील निशान साहिबचा रंग बसंतीपासून केशरीमध्ये बदलल्याचा आरोप करण्यात आला होता. एसएडीकडेही निळ्या रंगाचा पक्षाचा झेंडा होता. त्यांनी रंग कसा बदलला, हे मला माहीत नाही.” एसजीपीसीने केशरीवरून बसंतीमध्ये बदल केल्यानंतर, गुरुद्वारांमधील निशान साहिबचा रंग पंजाबमधील ‘आप’ने दत्तक घेतला. आज आपण तो रंग ‘आप’च्या झेड्यांमध्ये पाहू शकतो.
© IE Online Media Services (P) Ltd