History, cultural Significance and Importance of Ganesh, Ganesh Chaturthi 2024: गणपती किंवा विनायक अथवा गणेश ही भारतातील सध्याची सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. पूर्व आणि आग्नेय आशियातील श्रीलंका, म्यानमार, जपान, कोरिया, चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आदी देशांमध्येही या गणरायाने ठाण मांडले आहे. हत्तीचे तोंड अर्थात सोंड असलेल्या या गणरायाचे आकर्षण असणाऱ्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. गणेशोत्सव हा आपल्याकडील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. गेल्या काही वर्षांत हा उत्सव अनुभवण्यासाठी विदेशी पर्यटक या काळात भारतात येतात. या देवतेच्या लोकप्रियतेला मध्ययुगामध्ये साधारणपणे ९-१० व्या शतकात मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली दिसते. गाणपत्य नावाचा संप्रदायच उदयास आला. या लोकप्रिय देवतेच्या मूळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला थेट अफगाणिस्तानापर्यंत पोहोचावे लागते. असे का, त्यामागची कारणे काय अशा अनेक प्रश्नांचा हा शोध!
आणखी वाचा: वैनायकी – गणपतीची शक्ती
गणपतीचा सर्वात प्राचीन उल्लेख कुठे सापडतो?
ऋग्वेदाला जगभराच्या मौखिक परंपरेतील सर्वात प्राचीन साहित्याचा मान मिळाला आहे. या ऋग्वेदामध्ये आलेला बृहस्पती किंवा ब्रह्मणस्पती हा उल्लेख गणपती किंवा विनायकाचा आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, कारण तज्ज्ञांच्या एका गटाच्या म्हणण्यानुसार हे गजमुख असलेल्या गणपतीचे वर्णन नाही. त्यामुळेच वैदिक वाङ्मयामध्ये येणारा गणपती हा उल्लेख केवळ गणांचा अधिपती याच अर्थाने येतो, असे तज्ज्ञांच्या या गटाला वाटते.
आणखी वाचा: आणि जन्माला आले… नाम बडे और दर्शन…
सुरुवातीच्या काळात अनेक शतके गणपतीचा उल्लेख विनायक असाच होत होता, हे खरे आहे काय?
होय, गणरायाशी संबंधित सर्व प्राचीन साहित्यामध्ये गणपतीसाठी वापरलेले नाव म्हणजे विनायक. मानवगृह्यसूत्रात विनायक असा उल्लेख सापडतो. त्यात देवयजन, शालकंटक, उस्मित आणि कुष्माण्डराजपुत्र असा चार विनायकांचा उल्लेख आहे. लोकांच्या कार्यात विघ्न आणणे हे या विनायकांचे वैशिष्ट्य सांगितले असून त्यावर उपाय म्हणून त्यांची शांती करावी असे सांगून त्या शांतीच्या उपचारप्रक्रियेचे वर्णन या सूत्रामध्ये सविस्तर देण्यात आले आहे.
हस्तिमुख विनायक
नंतर सापडणारा उल्लेख हा दुसऱ्या बौधायन गृह्य परिशेष कल्प यामध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे या ग्रंथात सर्वप्रथम विनायक हा हस्तिमुख किंवा गजमुख असल्याचा उल्लेख सापडतो. शिवाय चार विनायकांच्या एकत्रिकरणातून एकच एका विनायकाची निर्मिती झाली असाही उल्लेख आहे. इथेही हा विनायक विघ्नकर्ता आणि शांती केल्यानंतर विघ्नहर्ता ठरतो, असा उल्लेख सापडतो. याही ग्रंथामध्ये विनायकाच्या शांतीचे उपचार देण्यात आले आहेत.
विनायक गौतम बुद्धांचे एक नाव?
प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये गौतम बुद्धांचे एक नाव म्हणून विनायक असाही उल्लेख सापडतो.
हिंदू, बौद्ध, जैन सर्वच धर्मांमध्ये विनायक किंवा गणपती आहे का? त्याचे अंकनही सापडते का?
होय. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांमध्ये गणपतीचे अंकन सापडते. तिन्ही धर्मांशी संबंधित लेणींमध्ये गणरायाचे वा विनायकाचे अंकन आहे. यातील प्रसिद्ध उदाहरण आहे ते लेण्याद्रीचे. शिवाय, औरंगाबाद लेणींमध्ये गौतम बुद्धांच्या बाजूलाच विनायक शिल्पित करण्यात आला आहे. ही दोन्ही प्रसिद्ध उदाहरणे महाराष्ट्रातीलच आहेत.
आणखी वाचा: विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?
प्राचीन भारतात हत्ती शुभ मानला जात होता, याचे संदर्भ सापडतात का? कुठे?
प्राचीन भारतात हत्ती शुभ मानला जात होता इतकेच नव्हे तर तो पूजलाही जात होता; याचे सर्व प्राचीन संदर्भ प्राचीन गांधार विद्यमान पाकिस्तानातील पश्चिमेकडचा भाग आणि विद्यमान अफगाणिस्तानामध्ये सापडतात. या भागामध्ये राज्य केलेल्या सर्व राजांच्या प्राचीन नाण्यांवर हत्तींचे अंकन सापडते. त्यातील देवतेशी संबंधित अंकन हे विनायकाचे चित्रणच आहे, असे भारतविद्या या विषयातील आणि नाणकविद्येतील तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. म. के. ढवळीकर आणि डॉ. ए. के. नरेन यांचे संशोधन काय सांगते?
प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर आणि डॉ. ए. के. नरेन यांvr संशोधनांती असे मत व्यक्त केले आहे की, प्राचीन गांधार प्रदेश म्हणजेच तत्कालीन वायव्य भारतात सर्वप्रथम विनायकाला हत्तीचे तोंड प्राप्त होऊन यक्ष रूपात त्याचे पूजन झाल्याचे पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे साधार स्पष्ट करता येते.
गणपती किंवा विनायकाचे प्राचीन अंकन कुठे सापडते?
अफगाणिस्तानातील बेग्राम हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे प्राचीन काळातील सर्वात अप्रतिम हस्तिदंती नक्षीकाम पाहायला मिळते. याच बेग्रामध्ये हत्ती ही नगरदेवता होती, असा उल्लेख सातव्या शतकात भारतात आलेल्या प्रसिद्ध बौद्ध भिक्खू ह्युआन श्वांग (चिनी भाषेत झुअँग झाँग) याने लिखित स्वरूपात केला आहे. बेग्रामचे प्राचीन नाव कपिशा नगरी होते आणि कपिशा नगराच्या नाण्यावर हत्तीच्या अंकनासोबतच ‘कपिशिये नगरदेवता’ असा खरोष्टी लिपीतील उल्लेखही आहे. विद्यमान पाकिस्तानातील चारसाढा इथे सापडलेल्या नाण्यांवरही प्राचीन पुष्कळावती नगरीचा (तत्कालीन नाव) उल्लेख असून ‘पुष्कलावती नगरदेवता’ असा त्यावर स्पष्ट उल्लेख आहे. ही हत्तीरूपी नगरदेवता सर्वत्र पूज्य असल्याचे प्राचीन संदर्भही सापडतात. ही पुष्कलावती हास्तिनायनांची राजधानी होती. विख्यात संस्कृत वैय्याकरणी पाणिनीने ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथामध्येही हस्तिनायनांचा उल्लेख केला आहे. हत्ती हे त्यांचे राजचिन्ह असावे, असे संशोधकांना वाटते. इंडोग्रीक राजांच्या नाण्यांवरही हत्तीमुख असलेल्या देवतेचे अंकन सापडते. त्यातील काही संदर्भ थेट गणपतीशी जुळणारे आहेत, असे संशोधकांचे मत आहे.
काबूलच्या मशिदीवर ‘महाविनायक’ विराजमान होता, हे खरे आहे काय?
काबूल येथील महाविनायकाची शिल्पकृती ही गणपतीच्या प्राचीन शिल्पकृतींपैकी एक मानली जाते. या शिल्पकृतीचा उल्लेख ‘महाविनायक’ असा केला जातो. अफगाणिस्तानातील गार्देज या ठिकाणी असलेल्या मशिदीवर महाविनायकाची शिल्पकृती विराजमान होती. महाविनायकाची ही मूर्ती २८ इंच उंचीची असून तिची रुंदी १४ इंच आहे. महाविनायकाची ही शिल्पकृती आलीढ आसनात उभी असलेली आहे. डोक्यावर मुकूट, गळ्यात हार आणि एकदंत अशी ही शिल्पकृती आहे. या प्रदेशात डोक्यावर रूमाल बांधून त्याची गाठ मागच्याबाजूस ठेवण्याची परंपरा आहे. तशाच बांधलेल्या रूमालावर महाविनायकाचा मुकूट विराजमान आहे. या शिल्पकृतीवर पर्शिअन कलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ही शिल्पकृती संगमरवरामध्ये घडविलेली आहे. ही शिल्पकृती १९८० साली काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली. मात्र दुर्दैवाने तालिबानी राजवटीत संग्रहालयात नासधूस झाली, त्यानंतर ही शिल्पकृती सापडलेली नाही. त्यामुळे सध्या केवळ या शिल्पकृतीचे छायाचित्रच उपलब्ध आहे.