History of Hindi language: महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर या निर्णयावर टीका, समर्थन आणि वाद-विवाद सुरूच आहेत आणि या निर्णयाच्या निमित्ताने अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे. मराठी भाषकांची घटती संख्या, आपल्या भाषेविषयीची उदासीनता आणि परप्रांतीयांचा वाढता प्रभाव …असे एक ना अनेक कंगोरे या विषयाला जोडले गेले आहेत. हिंदीच्या समर्थनार्थ देशासाठी एक ‘संपर्कभाषा’ असावी, असा युक्तिवाद सत्ताधारी भाजपाकडून केला जात आहे. पण, हिंदी भाषक इतर स्थानिक भाषा शिकतील का, या प्रश्नावर मात्र सर्वत्र मौन आहे. शिवाय हिंदीच्या सक्तीसाठी ज्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसे प्रयत्न मराठीसाठी का होत नाहीत, हा मुद्दा आता विरोधकांनी लावून धरला आहे. आजच्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक गोष्टीचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ तपासला जातो. मग, हिंदीच्या प्राधान्याला तोच निकष का लागू होत नाही? समोर पुरावे असूनही मराठीला तिचा अभिजात दर्जा सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला, याची सल मराठी माणसाच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदीच्या व्युत्पत्तीचा आणि विकासाचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
हिंदीचा इतिहास ७ व्या शतकापर्यंत मागे जातो
संस्कृत भाषा ही हिंदीची जननी असल्याचं मानलं जात. असं असलं तरी हिंदीचा प्राचीन इतिहास हा ७ व्या शतकापर्यंतच मागे जातो. हिंदीचे मूळ हे अपभ्रंश भाषेत शोधले जाते. १० व्या शतकातील दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात जुनी हिंदी (खडीबोली) म्हणून ओळखली जाणारी भाषा हिंदी आणि उर्दूची पूर्वज भाषा असल्याचे मानले जाते. खडीबोली या बोलीचा विकास हा मूलतः शौरसेनी अपभ्रंश भाषेतून झाला. जुनी हिंदी देवनागरी लिपीत लिहिली जात होती. परंतु, इस्लामिक आक्रमानंतर चित्र पालटलं. अफगाणी, फारसी आणि तुर्क आक्रमकांनी स्थानिक भाषेचा स्वीकार केला. तर स्थानिक भाषेने अरबी आणि फारसी भाषेतील अनेक शब्द सामावून घेतले.
१३ व्या शतकानंतर अधिक विकास

आजच्या हिंदी भाषेत जुन्या हिंदीतील केवळ २५ टक्के भाग शिल्लक आहे. वास्तविक हिंदीचा विकास हा १३ व्या शतकानंतर अधिक झाला. या कालखंडात हिंदी भाषेला समृद्धी देणारे साहित्य निर्माण झाले. पृथ्वीराज रासो आणि अमीर खुसरू यांचे लिखाण हिंदीचा विकास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. हिंदी आणि उर्दू या भगिनी भाषा असल्यातरी राष्ट्रीयत्व आणि धार्मिक संबंधांमुळे या भाषांचा उगम समजावून घेणे सहज आणि सोपे नाही.

आधुनिक हिंदी भाषा

१८व्या शतकाच्या अखेरीस हिंदीला आधुनिक रूप मिळू लागलं. १९५० साली हिंदीला भारतीय राज्यघटनेने अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. यानंतर केंद्र सरकारने व्याकरण आणि लेखनशैलीचं प्रमाणबद्धीकरण (standardisation) केलं आणि सरकारी कागदपत्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवला.

…उर्दू होती अधिकृत भाषा

हिंदीला अधिकृत दर्जा मिळण्याआधी ब्रिटिश भारतात उर्दू ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जात होती. उर्दूदेखील दिल्लीतील खडीबोलीतून निर्माण झाली आहे. परंतु, ती फारसी लिपीत लिहिली जाते. मुख्यतः ही भाषा उच्चभ्रू वर्ग आणि न्यायालयांमध्ये वापरली जात होती. मात्र, १८५७ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर उर्दूविरुद्ध विरोध वाढू लागला आणि हिंदीला प्राधान्य द्यावे, असा आग्रह होऊ लागला.

महात्मा गांधींचा ‘हिंदुस्थानी’चा प्रस्ताव

१९०० साली तत्कालीन भारत सरकारने हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांना समान दर्जा दिला. त्यामुळे लवकरच हिंदी ही औपचारिक शब्दसंग्रहासाठी मुख्य भाषा ठरली, तरीही भाषिक फूट कायम राहिली. महात्मा गांधींनी फारसी आणि देवनागरी लिपीचा वापर करून दोन्ही भाषांना एकत्र करून ‘हिंदुस्थानी’ ही भाषा विकसित करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, १९५० साली भारतीय संविधान अस्तित्त्वात आल्यावर हिंदीलाच प्राधान्य देण्यात आले.

हिंदीच्या बोली अनेक

हिंदी ही भारताची एकमेव अधिकृत भाषा नाही. देशात एकूण २२ अधिकृत भाषा आहेत. सुमारे ४० ते ५५ टक्के लोकसंख्या ही हिंदीचा पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून वापर करते. दिल्ली, मुंबई, चंदीगड, अहमदाबाद, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्येही हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. भारतातील पूर्वेकडच्या हिंदीमध्ये प्रामुख्याने अवधी, बघेली आणि छत्तीसगढी या बोलींचा समावेश होतो. तर हरियाणवी, ब्रजभाषा, बुंदेली, कानुजी आणि खडी बोली या पश्चिमेकडील हिंदीच्या प्रमुख बोली आहेत.

आठव्या शतकात १६ प्रादेशिक भाषा आणि बोली

उद्योगतन सूरी यांच्या ‘कुवलयमाला’ (इ.स. ७७८) या ग्रंथानुसार त्या काळात उत्तर भारतात आठव्या-नवव्या शतकात किमान सोळा प्रादेशिक भाषा व बोली प्रचलित होत्या. त्या काळातील अपभ्रंश साहित्यातून हिंदी ही एक समान साहित्यिक भाषा म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हिंदी भाषा आणि तिच्या साहित्याचा बाह्य विकास (exogenous development) नाथ-सिद्ध संप्रदायातील कवींच्या लिखाणातून दिसून येतो. या काव्यग्रंथांमध्ये हिंदीच्या मध्ययुगीन रूपांचा ठसा आढळतो, याबाबत शंका नाही.

ठोस पुरावे १० व्या शतकातील

हिंदीची प्राचीनता सिद्ध करण्यासाठी तिचा कालखंड हा इसवी सनपूर्व असल्याचे सांगण्यात येते. काही अभ्यासक ती सिंधू संस्कृतीकालीन असल्याचाही दावा करतात. परंतु, हडप्पाकालीन लिपीचा उलगडा अद्याप झालेला नाही. शिवाय भारतातील प्राचीन शिलालेख प्राकृत आणि संस्कृत भाषेत आहेत. हिंदी भाषेचे अस्तित्त्व सांगणारे ठोस पुरावे इसवी सन दहाव्या शतकापासून मिळतात. त्यामुळे या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. मराठीचे आद्य संदर्भ सातवाहनांच्या शिलालेखांमध्ये सापडतात. किमान २००० वर्षांपासून ही भाषा विकसित होत आली आहे. भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा भाग म्हणूनही इतर भाषक ही भाषा शिकत नाहीत. त्यामुळेच मराठीसारख्या भाषेला आपले अभिजात अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु, हिंदीला मात्र बहुभाषक तत्त्वावर देश स्वतंत्र होताच सरकारी कामकाजात स्थान मिळाले.

दुसरीसाठी मात्र पायघड्या!

हिंदी भारतीय भाषा आहे आणि तिचा उगम अपभ्रंश भाषांमधून झाला आहे, हे मान्यच. त्यामुळे ती शिकावी याबद्दल दुमत नाही. परंतु, एका भाषेच्या पदरी संघर्ष आणि दुसरीसाठी पायघड्या हा दुजाभाव का? हा प्रश्न आजही उत्तराच्या प्रतीक्षेत आहे, हे विसरून चालणार नाही.