पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ जानेवारी रोजी नवी मुंबईतील खारघर येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. तब्बल नऊ एकरात पसरलेले हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. कृष्णभक्तीचा प्रसार करणाऱ्या इस्कॉन संस्थेची जगभरात ८५० पेक्षा अधिक मंदिरे आहेत. केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही या संस्थेशी जोडले गेले आहेत. इस्कॉन ही संस्था काय कार्य करते, या संस्थेचा इतिहास व इतर माहिती…
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराविषयी…
नवी मुंबईतील खारघर येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या जागतिक संस्थेतर्फे प्रशस्त कृष्ण मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम ९ जानेवारीपासून सुरू झाला असून बुधवार, १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल नऊ एकर परिसरात असलेले हे मंदिर आशिया खंडातील इस्कॉनचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम करण्यास १२ वर्षे लागली असून त्यासाठी १७० कोटी खर्च आला आहे. या मंदिराचा मुख्य भाग भगवान श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आला आहे. मंदिर परिसरात विविध आश्रम व अन्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे असून त्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिरासमोर फुलांनी बहरलेले विशाल उद्यान तयार करण्यात आले आहे. मंदिर परिसरात भाविकांना नौकायन करता यावे यासाठी तलाव तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय वैदिक अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयाची निर्मितीही करण्यात आली आहे. जवळपास तीन हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना प्रसाद वितरित करण्यासाठी भव्य प्रसादम गृहही तयार करण्यात आले आहे. इस्कॉनने निर्माण केलेले हे एकमेव मंदिर आहे, जेथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद जी यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
इस्कॉन या संस्थेचा इतिहास काय?
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शस्नेस म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) ही वैष्णव धार्मिक संघटना असून ‘हरे कृष्णा चळवळ’ या संस्थेद्वारे चालवण्यात येते. या संघटनेची स्थापना ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात १९६६ मध्ये केली. १८९६ मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या स्वामी प्रभुपाद यांच्या घरात कृष्णभक्तीचे वातावरण होते. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या गुरूकडून दीक्षा घेतली आणि आपले आयुष्य कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. १९६५ मध्ये अमेरिकेत गेलेल्या स्वामी प्रभुपाद यांनी १९६६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये इस्कॉन संस्थेची स्थापना केली. न्यूयॉर्कमधील तरुण व हिप्पी लोकांना इस्कॉन आकर्षित करू लागली आणि ही चळवळ ‘हरे कृष्णा चळवळ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. हळूहळू इस्कॉन अमेरिकेतील इतर राज्यांसह जगभरात पसरले गेले. इस्कॉनने प्रसार करण्याचे वेगळे तंत्र वापरल्याने जगभरात या संस्थेचा प्रसार झाला. प्रत्यक्ष जनतेत जाऊन प्रसार, सार्वजनिक सहभाग आणि ग्रंथांचे मोफत वाटप यांद्वारे या संस्थेने विविध देशांतून भाविक जोडले. आज जवळपास १० लाखांपेक्षा अधिक भक्तमंडळी या संस्थेशी जोडली असून त्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. ७० च्या दशकात इस्कॉनचे सॅन फ्रान्सिस्को येथे स्थानांतर झाल्यांनतर ही चळवळ अमेरिकेत आणखी मोठी झाली. त्यानंतर युरोपमध्ये गेल्यानंतर ब्रिटिशांसह अनेक देशांचे नागरिक कृष्णभक्तीत लीन झाले.
संस्थेचा प्रसार कसा केला जातो?
इस्कॉन या संस्थेची तत्त्वे वैदिक ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवतम् आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथावर आणि गौडिय वैष्णव परंपरेवर आधारित आहेत. ही संस्था भगवान श्रीकृष्णाला मानते आणि कृष्णभक्तीचा प्रसार करते. इस्कॉनचे सदस्य झाल्यानंतर भाविकाला काही मूलभूत नियमांचे व्यावहारिक पालन करावे लागते. कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे. त्याशिवाय कांदा-लसूणसह मांसाहार करणे वर्ज्य आहे. त्याशिवाय अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहण्याची शिकवण इस्कॉन देते. कृष्णभक्तीत लीन होऊन इस्कॉनचे ग्रंथ आणि श्रीमद्भभगवद्गीता यांचे वाचन करण्याची आणि त्यातील शिकवण अंगिकारण्यास इस्कॉन सांगते. कृष्णभक्तीद्वारे अध्यात्मिक जीवनातील आनंद आणि तत्त्वज्ञान समजावून सांगितले जाते. अधिकाधिक भाविकांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात असून भक्तिमार्ग दर्शविणाऱ्या भजनांच्या फेऱ्या, पुस्तकांचे वाटप, त्याशिवाय गरिबांना खाद्यपदार्थांचे वाटप आदी अनेक प्रकार केले जातात. जगभरात मंदिरे, पर्यटन क्षेत्रे, हॉटेल, शैक्षणिक संस्था यांचा आधार घेऊन इस्कॉन कृष्णभक्तीचा प्रसार करत आहेत. विविध रेल्वे स्थानके, विमानतळ, सार्वजनिक ठिकाणी इस्कॉनच्या पुस्तकांची विक्री केली जाते. आर्थिक परिस्थती बिकट असणाऱ्यांसाठी ‘फूड फॉर लाइफ’ नावाची उपशाखा इस्कॉनने तयार केली आहे. याद्वारे गरीब विद्यार्थ्यांसह हलाखीची परिस्थिती असणाऱ्यांना विनामूल्य अन्नपदार्थांचे वाटप केले जाते.
हे ही वाचा… महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
जगभरात इस्कॉनची किती मंदिरे?
न्यूयॉर्कमध्ये १९६६ मध्ये इस्कॉनची स्थापना झाल्यानंतर सहा दशकांत जगभरातील विविध देशांमध्ये इस्कॉनची जवळपास ८५० मंदिरे आहेत. भारताचे शेजारी असलेल्या नेपाळ, बांगलादेश या देशांसह अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये इस्कॉनची मंदिरे आहेत. भारतातच इस्कॉनची ८०० मंदिरे असून १२ मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, २५ उपाहारगृहे, तीर्थक्षेत्र हॉटेल यांचा समावेश आहे. गौडिय वैष्णव परंपरेची स्थापना करणाऱ्या श्री चैतन्य महाप्रभू यांचे जन्मस्थान असलेल्या मायापूर येथे इस्कॉनचे सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ४,२५,००० चौरस फूट परिसरात असून मंदिराची उंची ३४० फूट आहे. मंदिर परिसरात निवासस्थाने, उद्यान, शैक्षणिक केंद्र आहेत. त्याशिवाय वृंदावन, रायपूर, नवी दिल्ली, मुंबई, कोल्हापूर यांसह देशभरातील विविध शहरांत इस्कॉनची मंदिरे आहेत. युरोपमध्ये ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन व बेल्जियमध्ये इस्कॉनची मंदिरे आहेत. अनेक रशियन नागरिक इस्कॉनकडे आकर्षित होत असून या देशात ३१ धार्मिक केंद्रे उभारण्यात आली आहेत. बेल्जियममधील डरब्यू येथील राधादेश मंदिर म्हणजेच भक्तिवेदांत महाविद्यालयाचा एक भाग आहे. २००२ मध्ये स्थापित झालेल्या या महाविद्यालयातून अध्यात्मिक शिक्षण दिले जाते. अमेरिकेत मंदिरांसह इस्कॉनची ५६ धार्मिक केंद्रे आहेत. कॅनडात ३१ तर मेक्सिकोमध्ये पाच केंद्रे आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्येही इस्कॉनची मंदिरे व धार्मिक केंद्रे आहेत. आग्नेय आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाइन्स हे देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही इस्कॉनच्या धार्मिक केंद्रे उभारण्यात आली आहेत. आफ्रिकेत ६९ संलग्न इस्कॉन केंद्रे आहेत, त्यापैकी चार कृषी केंद्रे आहेत, तर तीन शैक्षणिक केंद्रे आहेत. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे इस्कॉन केंद्राच्या वतीने मोठ्या रथयात्रेचे आयोजन करण्यात येते.
इस्कॉनचे भक्त असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती…
हेन्री फोर्ड यांचे नातू आणि फोर्ड मोटर्स या जगप्रसिद्ध वाहन कंपनीचे मालक अल्फ्रेड फोर्ड हे इस्कॉनचे सदस्य आहेत. अमेरिकेत डॅलास येथे स्वामी प्रभुपाद यांची भेट झाल्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये इस्कॉनचे सदस्यत्व स्वीकारले. त्याच वर्षी त्यांनी स्वामींसह भारताला भेट दिली आणि कृष्णभक्तीला वाहून घेतले. त्यांनी अंबरीश दास हे नाव धारण केले आहे. हवाई बेटावरील इस्कॉनच्या मंदिराला त्यांनी पाच लाख डॉलरचे दान केले, त्याशिवाय इस्कॉनच्या अनेक केंद्रांना त्यांनी भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे. बीटल्स या नावाजलेल्या संगीत बँडच्या संस्थापकांपैकी एक असलेला जॉन लेननलाही इस्कॉनचे आकर्षन होते. इस्कॉनवर आधारित काही गीते त्याने या बँडच्या सहाय्याने सादर केली होती. बीटल्सचाच सदस्य असलेला ब्रिटिश संगीतकार जॉर्ज हॅरिसन, पॉली स्टॅरिन, विनोदी अभिनेता रसेल बँड आदी इस्कॉनचे सदस्य होते. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जाॅब्ज यांनाही इस्कॉनचे आकर्षण होते. न्यूझीलंडचा रग्बी खेळाडू मार्क एलिस हाही इस्कॉनचा कृष्णभक्त आहे. त्याशिवाय जगभरातील संगीताशी संबंधित अनेक ख्यातनाम व्यक्तिमत्त्वे इस्कॉनशी संबंधित आहेत.
हे ही वाचा… ३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
इस्कॉनला निधी कसा मिळतो?
भाविकांकडून होणारा दानधर्म, पुस्तकांची विक्री, हॉटेल, कलादालनातू मिळणारे उत्पन्न यांद्वारे इस्कॉन संस्थेला निधी मिळतो. जगभरातील अनेक ख्यातनाम व धनाढ्य व्यक्ती इस्कॉनचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून इस्कॉनला सढळ हाताने मदत केली जाते. त्याशिवाय इस्कॉनच्या मंदिरांना लाखो लोक भेटी देतात, त्यांच्याकडूनही दानधर्म केला जातो. इस्कॉनच्या पुस्तकांची लाखो प्रती विकल्या जातात. पुस्तकांच्या रूपाने इस्कॉनला भरघोस निधी मिळतो. इस्कॉनची हॉटेल व निवासस्थानांद्वारेही इस्कॉनला निधी मिळतो. मंदिरांना मिळालेल्या उत्पन्नतून तिथला खर्च चालविला जातो.
sandeep.nalawade@expressindia.com