Anant Ambani and Radhika Merchant Wedding सध्या सगळीकडेच लग्नाचा माहोल आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ‘बिग फॅट वेडिंग’चे (Big Fat Wedding) औचित्य साधून जगभरातील प्रथितयश प्रभृतींचे भारतात आगमन झाल्याचेही आपण पाहिले. या प्री- वेडींगच्या भव्य सोहळ्यामुळे जामनगरचे रस्ते रोषणाईने झळाळून निघाले होते. त्याच पद्धतीचा सोहळा किंवा त्याहूनही अधिकचा झगमगाट पुन्हा एकदा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या रूपाने मुंबईत पाहायला मिळाला. याच सोहळ्याला असलेली जगप्रसिद्ध व्यक्तींची उपस्थिती, उंची वेशभूषा, संगीत, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींनी लक्ष वेधून घेतले. १२ जुलै रोजी हा नेत्रदीपक विवाह सोहळा संपन्न झाला. प्री- वेडींगनंतर प्रत्यक्ष विवाह सोहळा कसा असेल याची उत्सुकता अनेकांना लागली होती. इतिहासातही अशाच प्रकारच्या भव्यदिव्य विवाह सोहळ्याची अनेक उदाहरणे सापडतात. त्यातील एक विवाह खुद्द शाहजहानचा पुत्र दारा शुकोहचा होता. विशेष म्हणजे या विवाहाच्या भव्यतेची दखल तत्कालीन इतिहासातही घेतली गेली. भारतात अनेक मुघल सम्राट होऊन गेले परंतु अशा प्रकारे भव्य सोहळे क्वचितच नोंदविले गेले आहेत. म्हणूनच आताच्या वर्तमानकालीन पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक विवाहाचा घेतलेला हा वेध, नक्कीच रंजक ठरणारा आहे.

अधिक वाचा: अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?

How Was Supriya sule Marriage Fix
Supriya Sule Marriage : “मग मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बोलतोय”, लग्न जुळवताना सदानंद सुळेंची झाली होती फजिती; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

दारा शुकोह हे इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. दारा शुकोहचा विवाह/ निकाह नादिरा बेगमशी झाला होता. हा विवाह केवळ दोन आत्म्यांचे मिलन नव्हते, तर त्या काळातील सर्वात मोठा सोहळा ठरला होता. मुघल इतिहासातील शाहजहानचा थोरला पुत्र दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्या कथा अद्भुत, रंजक तसेच क्रूरता दर्शवणाऱ्या आहेत. या कथांच्या रंजकतेमागे कारस्थान, भावाच्या विश्वासघाताची एक करुण कहाणी देखील आहे, ज्याचा शेवट दारा शुकोहाच्या मृत्यूत झाला होता. शाहजहानचे दारा शुकोहवर नितांत प्रेम होते, त्यामुळेच शहाजहानचा उत्तराधिकारी दारा शुकोह ठरला होता. परंतु दुर्दैवाने हे पद त्याला फार काळ उपभोगता आले नाही.

दारा शुकोहचा विवाह, आईच्या मृत्यूनंतरचा पहिला सोहळा

दारा शुकोहची सावत्र आई मुमताज़ महल हिचा बाळंतपणात मृत्यू झाला. यानंतर एका वर्षानंतर दारा शुकोहचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यामुळेच या विवाहाची सर्व तयारी त्याची बहीण जहाँआरा हिने केली होती. दारा शुकोहला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. विद्वान अशी त्याची ख्याती असली तरी त्याने आपल्या विनम्र स्वभावाने इतर मुघल सम्राटांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले होते.

दारा शुकोहची बेगम नादिरा बानो

दारा शुकोहचा विवाह नादिरा बानो हिच्याबरोबर झाला होता. तिच्या सौंदर्याबद्दल लिहिताना इतिहासकार तिची तुलना मुमताज़ महल बरोबर करतात. असे असले तरी नादिरा बानो हिच्या वंशाविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते नादिरा ही दारा शुकोहची बहीण होती. तर अनेकजण तिचा उल्लेख चुलत बहीण म्हणून करतात. तिचे वडील सुलतान परवेझ मिर्झा हे जहांगिरचे पुत्र होते, ती अकबराचा मुलगा मुराद याची नात होती. काहीही असले तरी दारा शुकोह आणि नादिरा बानो हे एकमेकांशी एकनिष्ठ होते हे खरे. दारा शुकोह याने आपल्या अल्प आयुष्यात दुसरा विवाह केला नाही.

अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

मुघल राजकुमाराचा विवाह

दारा शुकोहचा विवाह परंपरा आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानला जातो. दारा शुकोहने आपल्या भव्य दिव्य विवाह सोहळ्यासाठी मुघल इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले. ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार दारा शुकोहच्या लग्नासाठी त्या काळी तब्बल ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. शाहजहानची मोठी मुलगी जहाँआरा हिने या भव्य सोहळ्यासाठी तिच्या स्वत:कडची १६ लाख रुपयांची रक्कम खर्च केली होती. लग्नसोहळा आठ दिवस चालला आणि एकट्या वधूच्या पेहरावाची किंमत आठ लाख होती. दाग-दागिने, मौल्यवान रत्न असा एकूण ७ लाख ५० हजार इतका खर्च आला आहे. १८ लाख रुपये प्राथमिक विधींवर खर्च करण्यात आले. नर्तक, संगीतकार यांच्यावर १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. उत्तम पोशाख, चांदीची भांडी, विविध देशांमधून मागविलेल्या भेटवस्तू यांवर ६ लाख ४० हजार इतका खर्च करण्यात आला होता. इराक, अरब, तुर्कमेनिस्तानवरून लग्नासाठी खास घोडे मागविण्यात आले होते. दिवाण-ए-आममध्ये लग्नाच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते.

सेहरा बांधणी

मुघल कालीन लघुचित्रांमध्ये या विवाह सोहळ्याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रात शाहजहान आलिशान सज्जात बसला आहे. राजकुमार दारा शुकोहच्या डोक्याला तो सेहरा बांधत आहे. हा सेहरा साधा सुधा नसून मोती, माणिक, पाचूजडित आहे. या रत्नजडित सेहऱ्याने या समारंभाची शोभा वाढविल्याचा संदर्भ ‘पातशाहनामा’ या ग्रंथात आढळतो. भारतीय प्रथेनुसार या मुघल राजकुमाराने शुभशकुन म्हणून वडिलांच्या हातून सेहरा बांधल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाला होते ख्रिश्चन धर्माविषयी कुतूहल! त्याचा भारतीय कलापरंपरेवर काय परिणाम झाला?

मेहंदी समारंभ

मेहंदी समारंभ शहाजहानच्या काळातही आजच्या इतकाच महत्त्वाचा होता. १६३३ साली या विवाह सोहळ्यात नवर देवाच्या हाताला आणि पायाला मेहेंदी लावण्यात आली होती. हा कार्यक्रम दिवाण-ए-खासमध्ये पार पडला होता. उपस्थितांमध्ये पान-सुपारी, वेलची, सुकामेवा वाटण्यात आला होता. हा शाही विवाह सोहळा असाधारण होता, राजकुमारी जहाँआरा आणि सती उन-निसा-खानम (मुमताज़ महलची मुख्य दासी) यांनी या भव्य सोहळ्याची व्यवस्था केली होती. नवरदेवाच्या वरातीचे चित्रण देखील सापडते. या चित्रात दारा शुकोह हा सजवलेल्या घोड्यावर बसलेला आहे. त्याचा पोशाख अत्यंत सुंदर आणि उठावदार आहे. कपाळावर सेहरा, हातात रुमाल, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम आहे. या वरातीत इतर शाही सदस्यही दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला वधू पक्ष वर पक्षाचे स्वागत करत आहे. एकूणच दारा शुकोहचा विवाह हा मुघल इतिहासातील एक मनमोहक अध्याय मानला जातो. हा विवाह केवळ राजघराण्याचे वैभवच नाही तर कौटुंबिक-सांस्कृतिक परंपरा तसंच त्याभोवती विणले गेलेले राजकारण देखील दर्शवतो.

नंतरच्या कालखंडात औरंगजेबाविरुद्धच्या युद्धात दारा शुकोहला पराभवाचा सामना करावा लागला. औरंगजेबाने साखळदंड बांधून भर उन्हात अर्धनग्न अवस्थेत दारा शुकोहची धिंड काढली. त्यानंतर शिरच्छेद करण्याचा आदेशही दिला. इतकेच नाही तर त्याचे छिन्नविछिन्न धड लोकांना जरब बसावी म्हणून उघड्यावर टाकले, शेवटी ते ताजमहालच्या आवारातच पुरले. त्यामुळे कधी काळी भव्य दिव्य वरातीचा उपभोग घेतलेल्या राजकुमाराच्या नशिबी अर्धनग्न धिंड-शिरच्छेद यावा यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय.