सोमवारी २५ मार्च रोजी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. देशभरात वेगवेगळया भागात रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे फोडून हा सण साजरा केला जाईल. फुगे फोडून रंगपंचमी साजरी करणे हा भाग आधुनिक असला तरी याप्रमाणेच होळी साजरी करण्याची एक पद्धत भारतीय संस्कृतीत गेल्या ४०० वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. ही परंपरा ‘गुलाल गोटा’ या नावाने ओळखली जाते. राजस्थानच्या जयपूर या भागातील होळीचे हे वैशिष्ट्य आहे.
गुलाल गोटा म्हणजे काय?
गुलाल गोटा हा लाखेपासून तयार केलेला लहान गोळा असून त्यात (कोरडा) गुलाल भरला जातो. हे गोळे सुमारे २० ग्रॅम वजनाचे असतात. होळीच्या दिवसात या गोळ्यांचा वापर फुग्यांसारखा केला जातो. स्थानिक कारागिरांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोट्यांच्या निर्मितीत लाख लवचिक होण्यासाठी प्रथम ती पाण्यात उकळतात. लाख हा कीटकांद्वारे स्रवलेला चिकट द्रव आहे. राजस्थान हे लाखेपासून तयार करण्यात येणाऱ्या बांगड्यासाठी प्रसिद्ध आहे. गुलाल गोटा तयार करताना लाखेला गोल आकार दिल्यानंतर त्याला रंग दिला जातो. लाल, पिवळा आणि हिरवा हे प्राथमिक रंग वापरले जातात, इतर रंग त्यांच्या मिश्रणातून तयार होतात. एकूणच या प्रक्रियेत कारागीर लाखेचा गोळा गरम करतात आणि फुंकणीच्या माध्यमातून या गोळ्याला गोल आकार देतात. हे गोळे पूर्णतः बंद करण्यापूर्वी त्यात गुलाल भरला जातो.
अधिक वाचा: होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता
कच्चा माल कुठून आणला जातो?
या गोट्यांच्या निर्मितीसाठी लागणारी लाख छत्तीसगड आणि झारखंडमधून आणली जाते. छत्तीसगड राज्य कौशल्यविकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, स्केल कीटक (मादी) लाखेसाठीचा मुख्य स्रोत आहे. १ किलो लाख राळ तयार करण्यासाठी, सुमारे तीन लाख कीटक मारले जातात. लाखेच्या किटकांपासून राळ, डाय आणि मेण देखील मिळते. याशिवाय गोट्यांच्या निर्मितीसाठी लागणारा गुलाल सामान्यतः बाजारातून खरेदी केला जातो.
जयपूरमध्ये ‘गुलाल गोटा’ची परंपरा कशी सुरू झाली?
गुलाल गोटे मुस्लीम समाजातील लाखेच्या कलाकृती तयार करणारे कारागीर तयार करतात. त्यांना जयपूरमध्ये मनिहार म्हणतात. आवाज मोहम्मद हे या कामातील प्रसिद्ध कारागीर आहेत. त्यांच्या या कौशल्यबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिहारांचे पूर्वज मेंढपाळ आणि घोडे व्यापारी होते; ते अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले. भारतात जयपूरच्या जवळ असलेल्या बागरू या शहरात स्थायिक झाले आणि हिंदू लाख कारागिरांकडून लाखेच्या कलाकृती तयार करण्याचे काम त्यांनी शिकून घेतले.
मनिहारोंका रस्ता
स्थानिक भाषेत हिंदू कारागिरांना लाखेरे म्हणतात. जयपूर शहराची स्थापना १७२७ साली झाली. सवाई जयसिंग दुसरे हे या शहराचे संस्थापक होते. मूलतः कलेचे प्रशंसक असलेल्या सवाई जयसिंग यांनी त्रिपोलिया बाजार येथील एक बोळ मनिहार समुदायाला दिला, त्या बोळाला ‘मनिहारों का रास्ता’ असे नाव दिले. तेव्हापासून ते आजपर्यंत लाखेच्या बांगड्या, दागिने आणि गुलाल गोटा याच ठिकाणी तयार करून विकला जातो. येथील कारागिरांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या काळी राजे होळीच्या दिवशी हत्तीच्या पाठीवर बसून शहरात फिरत आणि गुलाल गोटा लोकांवर फेकून सामान्यांच्या सणात सहभागी होत. पूर्वीचे राजघराणे सणासाठी आपल्या राजवाड्यात मोठ्या प्रमाणात गुलाल गोट्याची मागणी नोंदवत होते.
अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
या परंपरेमागील अर्थशास्त्र
सहा गुलाल गोटा गोळे असलेला एक बॉक्स १५० रुपयांना विकला जातो. ही किंमत पाण्याच्या फुग्यांपेक्षा खूप जास्त आहे. होळीच्या कालखंडात कारागिरांचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतलेले असते, मुख्यत्त्वे यात महिलांचा समावेश अधिक असतो. या गोट्यांना पारंपरिक होळी खेळल्या जाणाऱ्या वृंदावनसारख्या ठिकाणांहून मागणी आहे. होळीच्या तीन महिने आधीपासून गुलाल गोटे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. गुलाल गोटा तयार करणे हे हंगामी काम असल्याने मनिहारांसाठी हा सण वगळता लाखेच्या बांगड्या तयार करणे हा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे. कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय तयार केलेल्या बांगड्या पर्यावरणपूरक असल्याचं कारागीर सांगतात. असे असले तरी आज जयपूरमध्ये अनेक आधुनिक कारखाने रसायनांचा वापर करून लाखेच्या बांगड्या तयार करतात. यात लाख कमी प्रमाणात असून रसायनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता असते. शिवाय मूळ लाखेच्या बांगड्या या रसायनयुक्त बांगड्यांपेक्षा महाग असतात. त्यामुळे मूळ लाखेच्याच बांगड्यांची मागणी घटली आहे.
या कलेचे भविष्य काय आहे?
भारत सरकारने लाखेच्या बांगड्या आणि गुलाल गोटा कारागिरांना ‘कारागीर कार्ड’ (artisan cards) दिले आहे. यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. अनेक कारागीर आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी जगाच्या विविध भागात गेले आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आवाज मोहम्मद यांचे! गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत त्यांना लाखेच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेबद्दल त्यांचे कौतुक केले होते. परंपरा वाचवण्यासाठी काही गुलाल गोटा निर्मात्यांनी जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅगची मागणी केली आहे. GI टॅग हा एखाद्या उत्पादनाच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याचे आणि त्यांच्या भौगोलिक स्थानाचे वैशिष्ट्य विशद करण्याचे काम करतो. किंबहुना मूळ वस्तूंची नक्कल होण्यापासूनही रोखण्यासाठी या टॅगची मदत होऊ शकते. परंतु मनिहारांमधल्या एकजुटीच्या अभावामुळे याविषयी पुढील कारवाईसाठी विलंब होत असल्याची खंत आवाज मोहम्मद यांनी व्यक्त केली. समाजातील अनेक तरुण सदस्यांना या कामशिवाय ब्लू कॉलर नोकऱ्या करण्यात अधिक रस आहे, असेही ते म्हणाले.