पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकर्षक दृश्ये, तंत्रज्ञानातील करामती, लक्षणीय संवाद आणि ‘पकडघट्ट’ कथानक या सर्व घटकांनी हॉलीवूडचा सिनेमा नेत्रदीपक करण्यासाठी आपल्या कल्पनाश्रमांतून राबणारा लेखकवर्ग वेतनात होत असलेल्या तफावतीमुळे पुन्हा एकदा एकवटला आहे. सिनेनगरी लॉस एंजेलिस येथे मंगळवारपासून ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ या मुख्य संघटनेशी संलग्न असलेल्या ११,५०० लेखकांनी संप पुकारला. त्यामुळे अमेरिकी दूरचित्र वाहिन्यांवर प्रसारित होणारे कित्येक कार्यक्रम बाधित होणार आहेत. सध्याच्या बदलत्या वातावरणात आपल्या लेखनाला योग्य मोबदला मिळावा असे लेखकांचे म्हणणे आहे. ‘एआय’ आणि ‘चॅटजीपीटी’ तंत्रज्ञानामुळे भविष्यात कलाकार- लेखकांच्या नोकऱ्यांचे भवितव्य अवघड बनले असताना या संपाकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

संप होण्याचे नेमके कारण काय?

दर तीन वर्षांनी लेखकांसाठी वेतन करारात बदल होतात. हॉलीवूड सिनेमा आणि टेलिव्हिजन जगतावर युनिव्हर्सल, पॅरामाऊंट आणि वॉल्ट डिस्ने या स्टुडिओंचे वर्चस्व आहे. पण त्यात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपल या कंपन्यांनीही शिरकाव केला आहे. काही आठवडय़ांपासून या स्टुडिओंकडे लेखकांच्या संघटनेने वेतन आणि कराराबाबतचे प्रस्ताव ठेवले. त्याबाबत स्टुडिओंकडून अनुकूलता न दिसल्याने मंगळवारी लेखकांनी एकत्र येत संप पुकारला. अभिनेत्यांच्या संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास हा संप चिघळण्याची शक्यता आहे.

स्टुडिओंचे म्हणणे काय?

लेखकांच्या संघटनेने दिलेल्या प्रस्तावानुसार एखादा टीव्ही शोसाठी किंवा एखाद्या सिनेमाच्या लेखनगटासाठी गरज असो किंवा नसो, पण निश्चित अशा संख्येने लेखकांचा ताफा स्टुडिओने ठेवायला हवा. त्यावर सर्व स्टुडिओंनी विरोध केला आहे. वेतनवाढीसाठी तयार असलो, तरी अशा प्रकारच्या मागण्या स्टुडिओवर थोपल्या जाऊ शकत नाही, असे स्टुडिओवाल्यांचे म्हणणे आहे.

लेखकांच्या संघटनेचा दावा काय?

‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ या संघटनेच्या मते भविष्यातील लेखकांच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या निर्माण झालाय. सध्या स्टुडिओकडून लेखकांना जी वागणूक मिळत आहे ती अत्यंत वाईट आहे. एखादा चित्रपट किंवा टीव्ही शो लोकप्रिय होतो, त्यावर स्टुडिओ बक्कळ कमाई करतो. पण त्याच्या निर्मितीसाठी जो लेखकांचा ताफा झटतो, त्याला नफ्यातला अत्यंत छोटा हिस्सा मिळतो.

लेखकांची याबाबतची भूमिका काय?

टीव्हीवरील कार्यक्रम, मालिका, सिनेमा यांचे अंतिम लेखन होण्याआधी अनेक लेखकांचा ताफा आधी कथेचा आराखडा तयार करून, त्यावर मेहनत घेत असतो. या गटांना सर्वात कमी वेतन दिले जाते. त्यांच्या कल्पनांवर आणि गोष्टींवर या कार्यक्रमांचा डोलारा उभा राहतो, पण त्यांना त्याचा मोबदला सर्वात कमी मिळतो. नव्या वेतन करारामध्ये या लेखकगटांच्या हाती किरकोळ रकमाच येऊ शकतात, अशी भीती आहे.

संपाचा पहिला फटका कुणाला?

अमेरिकी टीव्ही वाहिन्यांवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या लाइव्ह शोंवर या संपाचा परिणाम होणार आहे. ‘सॅटरडे नाइट लाइव्ह’ आणि ताज्या घडामोडींवर विनोदातून भाष्य करणाऱ्या अनेक मालिका यामुळे बंद होतील. नव्याने सुरू झालेले चित्रपटांचे काम ठप्प होईल. कारण त्यांच्या पटकथा लिहिणाऱ्या लेखकांच्या साऱ्या यंत्रणांनी संपात सहभाग घेतला आहे.

अर्थव्यवस्थेवर परिणाम कसा?

हॉलीवूडचा अमेरिकी अर्थव्यवस्थेतील वाटा तुलनेने कमी असला तरी अंदाजे ७०० ते ८०० अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल या चित्रनगरीकडून होते. तब्बल २० लाख लोकांना यातून रोजगार मिळतो. हा संप चालला, तर या उद्योगाला पूरक असलेल्या सर्व सेवाही ठप्प होतील. २००७मध्ये अशाच प्रकारे लेखकांचा संप १०० दिवस चालला. त्यामुळे २.१ अब्ज डॉलर इतके नुकसान झाले होते.

भविष्याबाबतची चिंता हेच कारण?

या संपात ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत पहिल्यांदाच लेखकांनी आवाज उठवला आहे. ‘अलेक्सा’ आमच्यासाठी तुम्हाला पर्याय ठरू शकणार नाही, अशा आशयाचे फलक काही लेखकांनी या संपात झळकवले आहेत. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनच्या स्ट्रिमिंग मनोरंजन फलाटाने लेखकांच्या उत्पन्नाची गणिते बदलली. पूर्वी मालिकेचे २० भाग असतील, तर लेखकांना वर्षभर लेखनाद्वारे पैशांचा मार्ग निश्चित असे. स्ट्रिमिंग मालिकांच्या ८ ते १० भागांच्या युगात आठवडय़ाच्या कामाचे वेतन मिळू लागले आणि स्पर्धा वाढल्याने उत्पन्न उतरणीला लागले. त्याचा परिणाम संपात झाला आहे. pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood writers strike hollywood writers go on strike over fair pay print exp 0523 zws
Show comments