Large skull of ‘lost’ human species in Asia: शास्त्रज्ञांनी एका नामशेष झालेल्या मानवी प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीची कवटी एरवी सापडणाऱ्या कवटीपेक्षा आकाराने मोठी असल्यामुळे शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही प्रजाती ‘होमो सेपियन्स’ बरोबर सुरुवातीच्या काळात अस्तित्त्वात असावी, असे मानले जाते. म्हणजेच ही प्रजाती आणि होमो सेपियन्स एकाच कालखंडात होऊन गेल्याची शक्यता असल्याचे अभ्यासक सांगतात. याच नव्या शोधाचा घेतलेला हा मागोवा…
नव्याने सापडलेल्या या प्राचीन प्रजातीला ‘जुलुरेन’ (मोठ्या डोक्याचे लोक) असे नाव देण्यात आले आहे. अंदाजे ३ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती विद्ममान चीनमध्ये होऊन गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. शास्त्रज्ञांच्या मते या प्रजातीचा मेंदू इतर कोणत्याही ज्ञात होमिनिन प्रजातींशी (ज्यात आधुनिक मानवांचा समावेश आहे) तुलना करता अधिक मोठा होता. ‘होमो जुलुरेन्सिस’ ही प्रजाती लहान गटांमध्ये एकत्र येऊन वन्य घोड्यांची शिकार करत होती, तसेच सोपी-साधी दगडी हत्यारेही तयार करत असे. ही हत्यारे प्रामुख्याने प्राण्यांच्या कातड्यांवर प्रक्रिया करून वस्त्र तयार करण्यासाठी वापरली जात असावीत, असे लक्षात येते.
होमो जुलुरेन्सिस
मोठा मेंदू असलेल्या ‘होमिनिन’ या प्रजाती निएंडरथल्स आणि डेनिसोव्हन्सच्या नातेवाईक असण्याची शक्यता आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस (CAS) मधील पुराजैवशास्त्रज्ञ प्राध्यापक झियुजिये वू आणि हवाई विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ डॉ. ख्रिस्तोफर बे यांच्या मते जीवाश्म नोंदींमध्ये नमूद केलेली काही महत्त्वाची वैशिष्ट्ये शास्त्रज्ञांनी दुर्लक्षित केली आहेत. शोधनिबंधात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, काही जीवाश्मांमध्ये काही वैशिष्ट्यांचा मिश्र नमुना होता, जो कोणत्याही ज्ञात मानवी प्रजातींशी जुळत नव्हता. पूर्वी एखादे जीवाश्म ‘होमो सेपियन्स’ किंवा ‘होमो इरेक्टस’ यांच्याशी जुळत नसे तेव्हा त्यांना ‘डेनिसोव्हन्स’ या गटात वर्गीकृत केले जात असे. ‘डेनिसोव्हन्स’ ही निएंडरथल्सशी संबंधित प्राचीन होमिनिन प्रजाती होती. परंतु, डॉ. बे यांनी सुचवले आहे की, या जीवाश्मांपैकी काहींना स्वतंत्र प्रजाती म्हणून वर्गीकृत करणे आवश्यक आहे, ज्यांना ‘होमो जुलुरेन्सिस’ असे नाव दिले जाईल.
अधिक वाचा: Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?
डेनिसोव्हन्स
डेनिसोव्हन्स (Denisovans) ही एक नामशेष झालेली प्राचीन मानवी प्रजाती आहे. आधुनिक मानव (होमो सेपियन्स) आणि निएंडरथल्स यांच्या समकालीन होती. डेनिसोव्हन्सचा शोध मानवजातीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला असून त्यांचा शोध जीवाश्म संशोधनातून पद्धतशीर घेण्यात आला आहे. २००८ साली सायबेरियातील डेनिसोव्हा गुहेत एक अंगठ्याचे हाड आणि काही दात सापडले. या जीवाश्मांचे डीएनए विश्लेषण केल्यावर असे लक्षात आले की, हे कोणत्याही ज्ञात प्रजातींशी (होमो सेपियन्स किंवा निएंडरथल्स) पूर्णपणे जुळत नाहीत. त्यामुळे या प्रजातीला ‘डेनिसोव्हन्स’ हे नाव दिले गेले.
डेनिसोव्हन्स साधारण ५०,००० ते ३००,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. डेनिसोव्हन्स प्रामुख्याने आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात वास्तव्य करत असावेत. जीवाश्मांचे डीएनए पुरावे आशिया विशेषतः सायबेरिया, तिबेट, आणि आग्नेय आशिया येथे आढळतात. डेनिसोव्हा गुहा (सायबेरिया), तिबेटीयन पठारातील हाडांचे जीवाश्म आणि काही दात या प्रजातीचे प्रमुख पुरावे आहेत. डेनिसोव्हन्स आणि निएंडरथल्स यांचे डीएनए ९९.७% एकसारखे आहेत. म्हणजेच त्यांचे पूर्वज एकाच प्रजातीचे होते. ते एकमेकांशी आंतरजातीय मीलन करत होते याचे पुरावे आधुनिक मानवांच्या जीनोममध्ये दिसून येतात. आधुनिक मानव, विशेषतः आग्नेय आशियातील लोकसंख्येमध्ये डेनिसोव्हन्सचा ३-५% डीएनए आढळतो. तिबेटी लोकांमध्ये हाय अल्टिट्यूड (उंच प्रदेशातील कमी ऑक्सिजन) सहन करण्याची क्षमता डेनिसोव्हन्सच्या जीन्समुळे निर्माण झाली असावी.
होमो जुलुरेन्सिसच्या शोधामुळे नेमकं काय घडलं?
बे यांच्या मते जीवाश्म पुराव्यांच्या नव्या वर्गीकरण पद्धतीमुळे ही मोठी प्रगती साधता आली आहे. काही जण याची तुलना एखाद्या जुन्या कौटुंबिक फोटो अल्बमशी करतात. जुन्या फोटो आल्बममधली काही छायाचित्रे धूसर किंवा ओळखण्यास कठीण असतात. बे आणि त्यांच्या संशोधन पथकाने चीन, कोरिया, जपान आणि आग्नेय आशिया येथील प्राचीन मानवी जीवाश्मांची मांडणी समजून घेण्यासाठी अधिक सोपी पद्धती विकसित केली आहे. “या अभ्यासामुळे होमिनिन जीवाश्म नोंदी अधिक स्पष्ट झाल्या आहेत. ज्या आतापर्यंत होमो इरेक्टस, होमो निएंडरथलेंसिस किंवा होमो सेपियन्स या प्रजातींमध्ये सहज वर्गीकृत करता येत नव्हत्या,”असे बे यांनी सांगितले. “आम्ही हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी सुरू केला होता, पण आम्हाला एका नवीन होमिनिन (मानवी पूर्वज) प्रजातीचा प्रस्ताव ठेवता येईल, तसेच आशियातील होमिनिन जीवाश्मांचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करता येईल, जे यापूर्वी अपेक्षित नव्हते. शेवटी यामुळे शास्त्रीय संवादातही मदत होईल.”
या संशोधनामुळे वैज्ञानिकांना आणि सामान्य लोकांना आशियातील मानवी उत्क्रांतीच्या जटिल कहाणीचा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो. यामुळे मानवाच्या प्राचीन नातेवाईकांबद्दल असलेले काही गूढ भाग स्पष्ट होण्यास मदत होते. बे यांचे सहलेखक झिउजिये वू हे बीजिंग, चीनमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टेब्रेट पॅलेंटॉलॉजी अँड पॅलिओअँथ्रोपोलॉजी’ या संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक आहेत. होमो जुलुरेन्सिसच्या टॅक्सोनॉमिक वर्गीकरण आणि वर्णनावर त्यांनी मुख्य संशोधन केले आहे.