संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’ने २३ ऑगस्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करून इतिहास घडविला. ‘चंद्रयान-३’ मोहिमेंतर्गत चंद्रावरील अनेक छायाचित्रे व माहिती इस्रोला प्राप्त झाली असून चंद्रावर रात्र झाल्याने इस्रोने चंद्रपृष्ठावर अवतरण केलेला विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर यांवरील यंत्रणा स्लीप मोडवर (निद्रावस्था) ठेवली. आता चंद्रावर दिवस सुरू झाला असला तरी लँडर व रोव्हरशी संपर्क होत नसल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. लँडर व रोव्हर काही केल्या जागे होत नसल्याने पुन्हा ही मोहीम सुरू करण्याची भारताची आशा धूसर आहे.

‘इस्रो’ने विक्रम लँडर निद्रावस्थेत का ठेवले गेले?

इस्रोकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’च्या विक्रम लँडरचे अवतरण झाल्यानंतर या लँडरमधून बाहेर पडलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रपृष्ठाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. चंद्रापृष्ठावरील छायाचित्रे आणि अन्य माहिती या यंत्रणेने इस्रोकडे पाठविली. मात्र ४ सप्टेंबर रोजी इस्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना ‘स्लीप मोड’वर नेले. कारण चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांइतका असतो. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सूर्योदय झाल्याने चंद्रपृष्ठावर विक्रम लँडरचे अवतरण करण्यासाठी इस्रोकडून हा दिवस निवडण्यात आला. मात्र त्यानंतर १४ दिवसांनी सूर्यास्त होणार असल्याने ‘चंद्रयान-३’मधील सर्व यंत्रणा निद्रावस्थेत ठेवण्याचा निर्णय इस्रोने घेतला. यावेळी विक्रम लँडरमधील सर्व पेलोड बंद केले, मात्र त्यावरील रिसिव्हर यंत्रणा सुरू ठेवली. चंद्रावर पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर व रोव्हरशी संपर्क साधून ही मोहीम पुन्हा सुरू करण्याची इस्रोची योजना होती.

आणखी वाचा-स्वामित्व हक्क उल्लंघन म्हणजे काय? ह्यूमन्स ऑफ बॉम्बे वि. पिपल ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम हँडलचा वाद काय?

‘इस्रो’कडून लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे का?

चंद्रावर विक्रम लँडर ज्या भागात उतरले आहे, तिथे २२ सप्टेंबरच्या सुमारास सूर्याेदय झाल्यानंतर बॅटरी रिचार्ज होतील आणि त्यानंतर सर्व उपकरणे पुन्हा कार्यरत होतील, अशी इस्रोला आशा होती. त्यानुसार नवीन चांद्रदिवस सुरू झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर ‘जागे’ होण्याच्या आशा धूसर होत चालल्या असल्या तरी त्यांच्याशी संपर्क साध्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले. मुळात ‘चंद्रयान-३’ ही मोहीम एक चांद्रदिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवसांसाठीच तयार केली होती. विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरचे आयुष्यही १४ दिवसांचेच होते. मात्र या मोहिमेचे आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न इस्रो शास्त्रांकडून करण्यात येणार होता. सूर्योदयानंतर सूर्यप्रकाशामुळे लँडर व रोव्हर जागे होतील, अशी आशा या अवकाश संशोधन संस्थेला होती. मात्र अद्याप संपर्क होत नसल्याने ही आशा धूसर होत चालली आहे.

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यात अडथळे का येत असावेत?

चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांइतका असल्याने ‘चंद्रयान-३’मधील यंत्रणांची रचना पृथ्वीवरील १४ दिवसांसाठी कार्य करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. याचे मुख्य कारण म्हणजे या यंत्रणा सौरऊर्जेवर चालणाऱ्या आहेत. विक्रम आणि प्रज्ञानवरील यंत्रणांची रचना चंद्रावर रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आलेली नाही. चंद्राच्या रात्री संपूर्ण अंधार असल्याने सौरऊर्जेवर चालणाऱ्या या मोहिमेला वीज मिळत नाही. तापमान उणे २०० अंशांपेक्षा कमी होते. त्यामुळे या चांद्रमोहिमेतील यंत्रे गोठून नष्टही होऊ शकतात. इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी मात्र याबाबत सांगितले की, ‘‘विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागृतावस्थेत होण्याची शक्यता प्रत्येक तासागणिक कमी होत आहे. जोपर्यंत लँडरवरील ट्रान्समीटर चालू होत नाही, तोपर्यंत या यंत्रणांचे काय झाले ते कळण्याचा कोणताही मार्ग नाही.’’ इस्रोच्या अंतराळ यंत्रणा मोहिमेच्या शास्त्रज्ञांनीही आशा धूसर असल्याचे सांगितले. ‘‘चंद्रयान-३’ मोहिमेतील उपकरणे अतिशीत तापमान सहन करू शकतील, अशी आशा फक्त ५०-५० टक्के आहे,’’ असे ते म्हणाले.

आणखी वाचा-विश्लेषण: ऊस निर्यात बंदीचा निर्णय राज्य सरकारला का फिरवावा लागला?

मग ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे यश काय?

निद्रावस्थेत असलेल्या विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरशी पुन्हा संपर्क होत नसला तरी ‘चंद्रयान-३’ मोहीम हे एक मोठे यश आहे. चंद्रावर अंतराळ यानचे अलगद अवतरण करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. चंद्रावर केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच अलगद अवतरण केलेले आहे. त्याशिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणारा भारत हा एकमेव देश आहे. या चांद्रमोहिमेतील प्रज्ञान रोव्हरने चंद्रपृष्ठावर सुमारे १०० मीटरचा प्रवास केला असून चंद्रावरील अनेक घटकांची माहिती दिली. प्रज्ञान रोव्हरमधील सर्व पेलोडने विविध माहिती गोळा करून इस्रोकडे पाठविली. पेलोडने चंद्रावरील तापमानाची नोंद केली, तर चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्याकडून येणाऱ्या प्लाझ्मा कणांचे घनत्व, त्यातील बदल यांची माहिती घेतली. त्याशिवाय चंद्रावर गंधक व काही प्रमाणात ऑक्सिजन असल्याची माहिती प्रज्ञान रोव्हरकडून देण्यात आली. त्यामुळे ही चांद्रमोहीम सर्वस्तरीय यशस्वी झाली आहे.

चीनने लँडर, रोव्हर पुन्हा जागृतावस्थेत आणण्याचे यश कसे मिळविले?

‘चंद्रयान-३’ मोहिमेतील विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होण्याची शक्यता धूसर असली तरी चीनच्या चांद्रमोहिमेच्या यशाची चर्चा केली जात आहे. चीनने त्यांच्या चंद्र देवीच्या नावाने म्हणजेच चँग नावाने चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी झाल्या आहेत. ‘चँग-१’ आणि ‘चँग-२’ या पहिल्या दोन मोहिमांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि ‘चँग-३’ आणि ‘चँग-४’मध्ये लँडर होते. २ जानेवारी २०१९ मध्ये ‘चँग-४’ मोहिमेतील ‘चँग’ई४’ लँडर आणि ‘युतू-२’ रोव्हरने चंद्रपृष्ठावर अलगद अवतरण केले. सूर्यास्त झाल्यानंतर या लँडर व रोव्हरला निद्रावस्थेत ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर ही दोन्ही उपकरणे पुन्हा जागृतावस्थेत आली. त्यानंतर गेली चार वर्षे प्रत्येक सूर्योदयाच्या वेळी या यंत्रणांशी चीनच्या अवकाश संशोधन संस्थेचा संपर्क झाला आहे. चांद्ररात्री तापमान उणे २०० होत असतानाही त्याचा कोणताही परिणाम ‘चँग’ई४’ लँडर आणि ‘युतू-२’ रोव्हरवर झालेला नाही. या उपकरणांमध्ये ‘रेडियो आयसोटोप हीटर युनिट’ असल्याने कडाक्याच्या थंडीतही उपकरणांमध्ये बिघाड होत नाही. या यंत्रणांमध्ये ‘प्लुओनियम २३८’ आहे. जेव्हा चंद्रावर दिवस असतो, त्यावेळी बॅटरी सौरऊर्जेमुळे चार्ज हाेते. ‘प्लुओनियम २३८’मुळे या यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन कार्यरत होतात.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hopes of vikram lander and pragyan rover waking up faded will chandrayaan 3 mission end print exp mrj
Show comments