इस्रायल-हमास युद्धात गाझा शहरातील रुग्णालये संकटात सापडली आहेत. अनेक रुग्णालये जखमी रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि तिथे आश्रय घेतलेल्या विस्थापित नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहेत. युद्धाच्या नियमानुसार रुग्णालयांना विशेष संरक्षण असते. मात्र हा नियम इस्रायल-हमास युद्धात डावलला जात असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय सुविधांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत विशेष संरक्षण असतानाही हे का घडते, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
इस्रायल-हमास युद्धात गाझामधील रुग्णालयांची स्थिती काय आहे?
गाझामधील आरोग्य सुविधा गेले काही दिवस पुन्हा इस्रायल-हमास संघर्षाच्या कात्रीत सापडल्या आहेत. गाझा शहरातील अल शिफा या प्रमुख रुग्णालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला आहे. शिफा रुग्णालयातून हमासच्या बंदूकधारी अतिरेक्यांना घेऊन जात असल्याचा दावा करून एका रुग्णवाहिकेवर हल्ला करण्यात आला आणि हे इस्रायलनेही कबूल केले आहे. शिफा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात गेल्या आठवड्यात गोळीबार करण्यात आला. इस्रायलचे सैनिक आणि हमासचे अतिरेकी यांच्या संघर्षाचा फटका रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे या रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले. इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासचे दहशतवादी ढाल म्हणून रुग्णालयांचा वापर करत आहेत. तर रुग्णालयात आश्रय घेतलेल्या नागरिकांना बेपर्वाईने इजा करत असल्याचा आरोप इस्रायलवर पॅलेस्टाइनने केला आहे. शिफा रुग्णालयाच्या आसपास चकमकी वाढल्या असून त्याचा फटका रुग्णालयाला बसत आहे. ताज्या वृत्तानुसार, शिफा रुग्णालयाच्या परिसरात इस्रायली रणगाडे शिरले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही रुग्णालयांवरील हल्ल्याची दखल घेतली असून तात्काळ युद्धबंदी करण्याची सूचना केली आहे.
इस्रायलचे म्हणणे काय आहे?
हमासने रुग्णालये, शाळा आणि मशिदींसारख्या संवेदनशील ठिकाणांचा ताबा घेतला आहे. या संवदेशनशील ठिकाणांवर दहशतवादी तळ निर्माण केले असून दहशतवादी येथे दबा धरून बसल्याचा दावा इस्रायलने केला आहे. रक्तपात हाच हमासचा उद्देश असून केवळ आंतराष्ट्रीय समुदायाचे लक्ष जावे आणि त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी हमास रुग्णालये, शाळा या ठिकाणांचा वापर करत आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलचा इशारा शिफा रुग्णालयाकडे होता. या रुग्णालय संकुलाच्या तळात हमासचे म्होरके मुख्यालय चालवतात. इस्रायली सैन्याने याबाबत पुरावे दिले नसले तरी भूमिगत अतिरेक्यांचा तळ असलेल्या ठिकाणांसह शिफा रुग्णालयाचा सचित्र नकाशा जारी केला आहे. हमास आणि शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी याचा इन्कार केला आहे. इस्रायलने म्हटले आहे की हमासचे सैनिक जिथे असतील तिथे त्यांचा पाठलाग करण्यात येणार आहे. केवळ अतिरेक्यांना ठार करून नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘‘हमासचे दहशतवादी रुग्णालयातून गोळीबार करताना दिसले तर आम्हीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार करू,’’ असे इस्रायली सैन्यदलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड यांनी नुकतेच सांगितले. गेल्या आठवड्यात शिफा रुग्णालयातून जखमी रुग्णांना बाहेर काढणाऱ्या रुग्णवाहिकांच्या ताफ्यावर इस्रायली सैन्याने हल्ला केला. यात १२ जण ठार झाले. मात्र या हल्ल्याचा बचाव करताना इस्रायलने सांगितले की या रुग्णवाहिकांमध्ये हमासचे दहशतवादी सैनिक होते. इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते डॅनियल हॅगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने रुग्णालयाला वेढा घातलेला नाही, तर रुग्णालयाच्या पूर्वेकडील ठिकाणांहून रुग्णांना सुरक्षित बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. इस्रायली लष्कर रुग्णालयाच्या संपर्कात असून येथे उपचार घेत असलेल्या बालकांना वेगळ्या रुग्णालयात हलविण्यास मदत करणार आहे.
पॅलेस्टाइनचे म्हणणे काय आहे?
इस्रायली सैन्याच्या हल्ल्यानंतर आणि बॉम्बस्फोटानंतर घरांमधून पळून जाणाऱ्या अनेक पॅलेस्टिनी कुटुंबांनी रुग्णालये, वैद्यकीय केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे. युद्धामध्ये रुग्णालयांना विशेष संरक्षण दिले जाते. असा नियम असल्याने पॅलेस्टिनी नागरिकांनी रुग्णालयांमध्ये आश्रय घेतला आहे. या जागा इतर पर्यायांपेक्षा सुरक्षित असल्याचा विश्वास या नागरिकांना वाटतो. मात्र इस्रायलच्या सैन्याने या नियमाचे उल्लंघन केले असून रुग्णालयांवरही हल्ले केले असल्याचे पॅलेस्टाइनचे म्हणणे आहे. शिफा रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये या रुग्णालयात सुमारे १५०० रुग्ण, १५०० वैद्यकीय कर्मचारी आणि १५ हजार विस्थापित नागरिक अडकून पडले आहेत, असा दावा पॅलेस्टाइन प्रशासनाने केला आहे. एका ब्लॅकआऊटमध्ये शिफा रुग्णालय अंधारात बुडाले आणि अनेक वैद्यकीय उपकरणे बंद करण्यात आली. त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. ‘इनक्युबेटर’मधील अनेक नवजात बालकांनाही जीव गमवावा लागला. पॅलेस्टाइनची लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी इस्रायलने पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून १९० वैद्यकीय कर्मचारी ठार झाले आहेत. इस्रायलच्या सैन्यांनी २० रुग्णालये आणि ३१ रुग्णवाहिकांवर हल्ले केले आहेत.
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा काय सांगतो?
गाझामधील रुग्णालयांवरील हल्ल्याच्या दाव्या-प्रतिदाव्यानंतर युद्ध नियंत्रित करणारे आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा युद्धादरम्यान रुग्णालयांना विशेष संरक्षण प्रदान करतो. परंतु लढाऊ सैनिक लपण्यासाठी किंवा शस्त्रे ठेवण्यासाठी त्यांचा वापर केल्यास रुग्णालये त्यांचे संरक्षण गमावू शकतात, असे रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने (आयसीआरसी) म्हटले आहे. मात्र अशा वेळी रुग्णांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हल्ल्यांपूर्वी अनेकदा इशारा व सूचना देणे आवश्यक आहे, असे आयसीआरसीच्या कायदा अधिकारी कॉर्डुला ड्रोगे यांनी सांगितले. ‘‘शिफा रुग्णालयात हमासचे दहशतवादी केंद्र असल्याचे सिद्ध करण्यात इस्रायल यशस्वी झाले तरी आंतरराष्ट्रीय कायद्याचे सिद्धांत कायम राहतील,’’ असे ओहायो येथील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाच्या लष्करी नीतिशास्त्र तज्ज्ञ जेसिका वोल्फेंडेल यांनी सांगितले. शक्य तेवढ्या निष्पापांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली जाणे आवश्यक आहे. जर नागरिकांची हानी लष्करी उद्दिष्टापेक्षा विषम असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अशा हल्ल्यांना परवानगी नाही, असे त्यांनी सांगितले. रुग्णालये, शाळा किंवा प्रार्थनागृहे लष्करी उद्देशांसाठी वापरली जात असल्याने त्यांचा संरक्षित दर्जा गमावला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी भरभक्कम पुरावे देणे आवश्यक असल्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे वकील करीम खान यांनी सांगितले.