-चिन्मय पाटणकर
देशात सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांमध्ये बांधकाम क्षेत्राचा समावेश होतो. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत देशातील प्रमुख आठ शहरांतील सदनिकांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्क्यांनी वाढल्याची माहिती नाइट फ्रँक इंडियाच्या जाहीर केलेल्या इंडिया रिअल इस्टेट या अहवालातून समोर आली. करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांतून सावरत स्थावर मालमत्ता क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांत आलेल्या गतीच्या अनुषंगाने घेतलेला हा परामर्श….

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

सहामाहीतील सदनिका विक्रीची स्थिती काय?

करोनापूर्व काळातील मंदीसदृश्य स्थिती, करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांत बसलेला आर्थिक फटका यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात व्यवहार मंदावले होते. मात्र जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत देशात सदनिकांच्या विक्रीचे प्रमाण साठ टक्क्यांनी वाढले. देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये मिळून १ लाख ५८ हजार ७०५ सदनिकांची विक्री झाली. तर २०२१मध्ये पहिल्या सहा महिन्यांदत ९९ हजार ४१६ सदनिकांची विक्री झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सदनिका विक्रीमध्ये झालेली ही वाढ गेल्या नऊ वर्षांतील सर्वाधिक आहे.

आठ शहरांतील सदनिका खरेदीचे आकडे काय सांगतात ?

नाईट फ्रँकच्या अहवालात मुंबई, राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली), बेंगळुरू, चेन्नई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या आठ शहरांतील सदनिका विक्रीची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक ४४ हजार २०० सदनिकांची विक्री मुंबईत झाली. त्या खालोखाल राजधानी प्रदेशात (दिल्ली) २९ हजार १०१ आणि बेंगळुरूमध्ये २६ हजार ६७७ सदनिका विकल्या गेल्या. तर पुण्यात २१ हजार ७९७ सदनिकांची विक्री झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सदनिकांच्या विक्रीचे प्रमाण मुंबईत ५५ टक्के आणि पुण्यात २५ टक्के वाढले. प्रमुख आठ शहरांत झालेल्या सदनिका विक्रीपैकी २८ टक्के सदनिकांची विक्री एकट्या मुंबईत झाली. एकीकडे सदनिकांची विक्री वाढलेली असताना देशभरात नवे गृहप्रकल्प सादर करण्याचे प्रमाणही गेल्यावर्षीच्या तुलनेत ५६ टक्क्यांनी वाढले. नवे गृहप्रकल्प सादर करण्याचे प्रमाण मुंबई ३२ टक्क्यांनी वाढले, तर पुण्यात नवीन गृहप्रकल्प सादरीकरणात १५ टक्क्यांनी घट झाली.

नक्की वाचा >> विश्लेषण : घरांच्या किमती ठरतात कशा?

किमतीमध्ये झालेली वाढ किती?

देशभरातील प्रमुख आठ शहरांमध्ये सदनिकांच्या किमती सरासरी तीन ते नऊ टक्क्यांनी वाढल्या. त्यात मुंबईत सहा टक्के, बेंगळुरूमध्ये नऊ टक्के आणि दिल्लीमध्ये सात टक्के वाढ झाली. तर पुण्यात सहा टक्के वाढ झाली. २०१५ पासून पहिल्यांदाच देशभरातील सदनिकांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विक्रीबाबत बांधकाम व्यावसायिक काय म्हणतात?

बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले, की करोना प्रादुर्भावाच्या आधी रेरा कायदा, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे बांधकाम क्षेत्रात आणि ग्राहकांमध्येही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर मार्च २०२०पासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने परिस्थितीच बदलली. टाळेबंदी, आर्थिक अनिश्चितता अशा कारणांनी सदनिका खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी त्यांचा निर्णय पुढे ढकलला. दुसरी लाट ओसरल्यानंतर सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले. तिसऱ्या, चौथ्या लाटेची चर्चा होऊ लागली तरी आता टाळेबंदी होणार नाही, साथरोग गंभीर स्वरूपाचा नसेल याचीही ग्राहकांना कल्पना आली. त्यामुळे ग्राहक सदनिका खरेदीकडे वळले. करोना काळात स्वतःच्या घराचे महत्त्व लक्षात आले. तसेच घरातून काम करण्यासाठी एखादी जास्तीची खोली असावी म्हणून दीड बीएचके, टू बीएचके सदनिका खरेदी करण्याकडे कल वाढला. गेल्या काही वर्षांत सिमेंट, पोलादाचे भाव वाढल्याने, रेडी रेकनरची दरवाढ, मेट्रो अधिभार लागू झाल्याने घरांच्या किमतीही काही प्रमाणात वाढल्या. परंतु गेल्या काही महिन्यांतील सदनिका विक्री उच्चांकी म्हणता येईल. अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या पडून राहिलेल्या सदनिकाही विकल्या गेल्या, व्यावसायिक नवीन प्रकल्पांची तयारी करू लागले आहेत. त्यामुळे सध्याची सदनिकांची मागणी पाहता चालू वर्ष आणि पुढील वर्षही बांधकाम क्षेत्रासाठी सकारात्मक आहे असे म्हणता येईल.

दरवाढीचे आव्हान कोणते?

वाढती चलनवाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने कंबर कसली आहे. मात्र किमतीच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. करोना प्रादुर्भावामुळे आधीच फटका सहन केलेले हे क्षेत्र धीम्या गतीने देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र वाढत्या दरवाढीमुळे या क्षेत्रापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने जवळपास ४० टक्के बांधकाम व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय टिकण्याबाबत अनिश्चितता वाटत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या एप्रिल २०२२ च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

व्यावसायिकांपुढील आव्हाने कोणती?

सदनिकांची विक्री, गृहकर्जांचे कमी झालेले दर आणि मुद्रांक शुल्कामुळे गेल्या वर्षभरात सदनिकांची विक्री पूर्वपदावर येण्यास मदत झाली, तसेच बांधकाम व्यावसायिकांनीही दरवाढ न केल्याने सदनिकांच्या किमती स्थिर राहिल्या. मात्र एप्रिल ते जून या तिमाहीचा आढावा घेतल्यास या विक्रीवर थोडा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.

खर्चात झालेली वाढ आणि वाढलेल्या व्याजदरांमुळे बांधकाम क्षेत्रावर ताण आहे. त्यामुळे काही काळासाठी सदनिकांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, असे क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले. मात्र ही दरवाढ थोड्या काळासाठीची आहे आणि येत्या काळात बांधकाम क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येईल अशी त्यांना आशा वाटते. इतिहासाचा आढावा घेतल्यास दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते. सदनिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे वाढलेल्या खर्चावर बांधकाम व्यावसायिक मात करू शकतील. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने बराच विस्कळीतपणा सहन केला आहे, असे नाईट फ्रँक इंडियाच्या संशोधन विभागाचे संचालक विवेक राठी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing sales in jan jun at 9 year high in top 8 cities print exp scsg
Show comments