काही दिवसांपूर्वी इस्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर येमेनच्या हुथी बंडखोर गटाने लाल समुद्रात मालवाहू जहाजांवर हल्ले केले होते. परिणामी अनेक कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग टाळत केप ऑप गुड होपचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आणि त्याचा फटका जागतिक व्यापाराला बसला. अशातच आता हुथी बंडखोर गटामुळे संपूर्ण जगाला आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता असून हुथींच्या हल्ल्यांमुळे आता जगभरातील इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं काय आहे? जगभरातील इंटरनेट सेवा बंद होण्याची भीती का निर्माण झाली आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – अंबानी प्री- वेडिंग: ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ आहे तरी काय? त्यामागची कारणे काय?
नेमकं काय घडलंय?
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी लाल समुद्रातील चार मोठ्या इंटरनेट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची केबल तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पश्चिम आशिया आणि युरोपच्या काही भागांतील इंटरनेट सेवाही खंडीत झाली. याशिवाय पश्चिम आशिया आणि भारतादरम्यानच्या १५ हजार किलोमीटरच्या केबलचेही नुकसान झाले आहे. तसेच दक्षिण पूर्व आशिया ते इजिप्तमार्गे युरोपला जोडणारी २५ हजार किलोमीटर लांबीच्या केबलवरही याचा परिणाम झाला आहे.
‘द आउटलेट’ने कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या केबलचे झालेले नुकसान फार गंभीर नसले, तरी हा संपूर्ण प्रकार चिंताजनक आहे. याशिवाय ”आम्ही नुकसान झालेल्या केबलच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून यासाठी आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो, असंही कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, ही केबल तुटण्यामागे नेमकी कारणं काय? याबाबत या अधिकाऱ्यांनी उत्तर देणं टाळले.
महत्त्वाचे म्हणजे एक महिन्यांपूर्वीच हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील आशिया आणि युरोपला जोडणारी इंटरनेट केबल तोडण्याची धमकी येमेन सरकारला दिली होती, त्यानंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेमागे हुथी बंडखोर असल्याची शक्यता वर्तवली जात असून या घटनेने आता जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
लाल समुद्रातून कोणत्या देशांना इंटरनेटचा पुरवठा केला जातो?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, लाल समुद्रांच्या दक्षिणेकडील भागात पसरलेल्या केबलद्वारे युरोप ते पूर्व आशियातील देशांना इंटरनेट पुरवठा केला जातो. खरं तर या भागातून होणाऱ्या सागरी वाहतुकीमुळेही येथील इंटरनेट केबलला धोका निर्माण झाला आहे. मात्र, हुथी गटाच्या हल्ल्यामुळे हा प्रदेश आणखी धोकादायक बनला आहे. द टेकस्पॉटने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील जवळपास १७ टक्के इंटरनेट केबल याच भागातून गेले आहेत.
विशेष म्हणजे, अशाप्रकारे इंटरनेट केबल तुटण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजीदेखील अचानकपणे या भागातील इंटरनेट केबल तुटल्या होत्या. त्यामुळे भारत, पाकिस्तान, पूर्व आफ्रिकेच्या काही भागांतील इंटरनेट सेवाही खंडीत झाली होती. केंटींक या संशोधन संस्थेचे संचालक डग मॅडोरी यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. पण, त्यांनी इंटरनेट बंद पडण्याच्या कारणांचा कोणताही उल्लेख केला नव्हता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, १८ फेब्रुवारीला हुथी गटाने रुबीमार जहाजावर केलेल्या हल्ल्यामुळे येथील इंटरनेट केबलचे नुकसान झाले होते. याशिवाय इस्रायली वृत्तसंस्था ग्लोब्सने या हल्ल्याच्या मागे हुथी बंडखोर गट असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, येमेन सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने हा दावा फेटाळत इंटरनेट केबल सुरक्षित असल्याचे म्हटले होते. या संदर्भात बोलताना येमेनमधील बंडखोर नेता अब्देल मलेक अल-हुथी याने हे आरोप फेटाळून लावत “समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबलला नुकसान पोहोचवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही”, अशी प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा – … म्हणून ‘या’ राज्याला मध्य भारतातून वाघ आणायचेत; सिमिलीपालचे काळे वाघ का आहेत विशेष?
तज्ज्ञ काय म्हणतात?
यासंदर्भात बोलताना रॉयल नेव्हीचे माजी कमांडर रिअर ॲडमिरल जॉन गॉवर म्हणाले, “माझ्या मते हुथी गटाला इंटरनेट केबल शोधायचे असतील तर त्यांना टर्मिनलवर हल्ला करावा लागेल. त्याशिवाय हुथींनी केबलचे नुकसान केले असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.” तसेच रॉयल नेव्हीचे माजी कमांडर टॉम शार्प यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ”माझ्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांना समुद्रातील केबल शोधता येईल, असे कोणतेही साधन त्यांच्याकडे नाही. शिवाय पाणबुडीलाही ही केबल शोधता येणार नाही” असे ते म्हणाले. दरम्यान, या घटनांमागे हुथी बंडखोर आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी हुथी गटाच्या हल्ल्यांमुळे या भागातील इंटरनेट केबलचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.