नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर “जामतारा… सबका नंबर आयेगा” ही वेब सीरिज अनेकांनी पाहिली असेल. दोन सीझन असलेल्या या सीरिजने भारतीयांच्या सायबर क्राइमच्या ज्ञानात चांगलीच भर टाकली आहे. झारखंडमध्ये जामतारा नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एका गावातील मुले अचानक श्रीमंत होतात. तपासाअंती कळते की, या गावातील मुले डेबिट कार्डद्वारे फिशिंग करून, लोकांच्या बँक खात्यातील पैसे हडप करीत असतात. अर्थातच सायबर क्राइमच्या अगदी सुरुवातीच्या काळातील घोटाळे (सायबर स्कॅम) यात दाखवले गेले आहेत. या सीरिजमध्ये सनी नावाचे एक कमी शिकलेले पात्र आहे. सनी कमी शिकलेला असला तरी तो सायबर क्राइमच्या नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत असतो. सर्वांनाच सायबर क्राइम काय आहे? त्यापासून कसे सांभाळून राहायचे? याची माहिती असते. पण समस्या अशी आहे की, स्कॅमर्स जुन्या कल्पना वगळून नवनव्या युक्त्यांद्वारे फसवणूक करीतच राहतात. सध्या भारतात असाच एक मोठा सायबर घोटाळा झाला आहे; ज्यात १५ हजार भारतीयांना ७०० कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आला आहे.

हैदराबाद पोलिसांनी नुकताच एक मोठा सायबर घोटाळा उघडकीस आणला; जो चीनमधून चालवला जात होता. या घोटाळ्यात १५ हजार भारतीयांची फसवणूक झाली असून, ही रक्कम ७१२ कोटी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सही या घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये गमावून बसले आहेत. हा घोटाळा नेमका कसा घडला? घोटाळेबाजांनी कोणती नवी शक्कल लढवली? आणि लोक कसे फसले? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पार्ट टाइम जॉब आणि अधिक पैसे मिळवण्याची लालसा

एप्रिल महिन्यात शिवा नावाच्या एका व्यक्तीने त्याची ऑनलाइन फसवणूक झाली असल्याची तक्रार हैदराबाद पोलिसांकडे नोंदवली. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, फसवणुकीची रक्कम मोठी असल्यामुळे पोलिसांनीही याच्या मुळाशी जाण्यासाठी हरेक प्रयत्न केले. पोलिसांच्या निदर्शनास आले की, घोटाळेबाज व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक आणि पार्ट टाइम कामाचे प्रलोभन दाखवायचे. महागाईच्या या जगात आज अनेक जण अशा ऑनलाईन करता येणाऱ्या पार्ट टाइम जॉबच्या शोधात असतात; ज्यामुळे चार पैसे मिळतील, अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते.

हे वाचा >> सायबर गुन्हेगारीचं नवं ‘भक्ष्य’

पोलिसांच्या तपासातून कळले की, या घोटाळ्यातील पीडितांची सरासरी पाच ते सहा लाखांची फसवणूक झालेली आहे. पार्ट टाइम काम म्हणून यूट्यूबच्या व्हिडीओंना लाईक देणे, गूगल रिव्ह्युज लिहिणे, अशी कामे देण्यात येतात. दिलेला टास्क पूर्ण केल्यानंतर चांगले पैसे देण्याचे आश्वासन दिले जाते. जे लोक या कामांसाठी तयार होतात, त्यांना एक फेक ऑनलाईन विंडो लिंक दिली जाते. त्या ठिकाणी पीडिताच्या नावाचे वॉलेट असते. जसजसे टास्क पूर्ण होतात, तसतसे त्या वॉलेटमध्ये पैसे येऊन पडल्याचे दिसते. मात्र, सर्व टास्क पूर्ण होईपर्यंत त्यांना पैसे काढून घेता येत नाहीत.

ही पार्ट टाइम कामे गुंतवणूक केल्याशिवाय मिळत नाहीत. घोटाळेबाज सुरुवातीला पाचेक हजारांची छोटी रक्कम गुंतवण्यास सांगतात, त्याच्या बदल्यात ते खोट्या वॉलेटमध्ये चांगले पैसे देतात. फसवणूक झालेल्या काही जणांचा अनुभव आहे की, त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षाही दुप्पट पैसे नफ्याच्या रूपात दिसून आले. त्यानंतर पीडितांना आमिष दाखवून जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यास भाग पाडले जाते. जोपर्यंत पीडिताकडून लाखो रुपये गुंतवले जात नाहीत, तोपर्यंत हा प्रकार सुरूच राहतो. एकदा गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पीडितही आणखी पैसे ओतत राहतात.

हैदराबाद पोलिसांकडे शिवा नावाच्या इसमाने सर्वांत आधी तक्रार दाखल केली होती. शिवाने २८ लाख रुपये गमावले आहेत. सुरुवातीला त्याला एक हजार रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याला काही लिंकवर जाऊन फाइव्ह स्टार रेटिंग देण्यासारखे टास्क देण्यात आले. त्यावर त्याला चांगला परतावा मिळत गेला. परताव्याच्या हव्यासापोटी शिवाने नंतर पुन्हा २५ हजार गुंतवले आणि असे करता करता तो २८ लाख रुपये घोटाळेबाजांच्या घशात घालवून बसला.

पोलिसांना काय आढळले?

शिवाने गुंतवलेली रक्कम सहा बँक खात्यांमध्ये वळती झाली होती. तिथून वेगवेगळ्या भारतीय बँक खात्यांमार्फत हे पैसे दुबईत पोहोचले. दुबईतून या पैशांनी क्रिप्टो करन्सी विकत घेतली जाते. पोलिसांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, घोटाळेबाजांनी भारतीय सिम कार्डाचा वापर करून भारतात बँक खाती उघडली आणि ती दुबईत बसवून हाताळली जात होती. दुबईत बसलेल्या घोटाळेबाजांचा मेंदू चीनमधून कार्यरत होत होता. चीनमधील हस्तकांच्या इशाऱ्यावर घोटाळेबाजांची साखळी कार्यरत होती.

हैदराबादचे पोलिस आयुक्त सी. व्ही. आनंद म्हणाले, “आम्ही या घोटाळ्याचे गांभीर्य पाहून केंद्रीय यंत्रणांना सूचित केलेले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सायबर गुन्हे विभागाला याची सर्व माहिती पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे आणि गल्लेलठ्ठ पगार असलेले उच्चशिक्षित कर्मचारीही या घोटाळ्याचे बळी ठरले असून, एकाने तर ८२ लाख रुपये गमावले आनहेत. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला”

या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण भारतात धाडी टाकून नऊ जणांना अटक केली आहे. घोटाळ्याचे पैसे वळते करण्यासाठी जी क्रिप्टो वॉलेट वापरण्यात आली, त्यातील काही वॉलेटचा संबंध दहशतवादी संघटना हिजबुल्ला याच्या वॉलेटशी जोडला असल्याचे समोर आले. अहमदाबादमधून अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचा चिनी हस्तकांशी संपर्क असल्याचे आढळले. ही व्यक्ती दुबई आणि चीनमध्ये बसलेल्या घोटाळेबाजांना भारतीय बँक खात्यांशी संबंधित माहिती आणि ओटीपी देण्याचे काम करीत होती.

आणखी एका अटक केलेल्या व्यक्तीकडून समजले की, त्याने ६५ भारतीय बँक खाती चिनी नागरिकाला हस्तांतरीत केली होती; ज्यामधून १२८ कोटींचे व्यवहार झाले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, केविन जून, ली लू लंघाझू व शाशा अशी चीनमधील घोटाळेबाजांची नावे असून, त्यांनी भारतीय बँक खात्यांमधून १२८ कोटी वळते करून घेतले. इतर बँक खात्यांतूनही जवळपास ५८४ कोटी रुपये क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरीत करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात एकूण ७१२ कोटींची लुबाडणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

सायबर क्राइमला लवकर बळी पडतात भारतीय नागरिक

भारतीय नागरिक डिप फेक घोटाळ्यांना जास्त बळी पडतात, असे निदर्शनास आले आहे. ‘मॅकॅफे अँटीव्हायरस’ने मे महिन्यात एक सर्वेक्षण केले होते; ज्याची माहिती ‘सीएनबीसी’ने दिली आहे. त्या सर्वेक्षणात आढळले की, फेक कॉल आलेल्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांना फोनवरील खरा आवाज आणि एआय आवाज यातला फरक ओळखता येत नव्हता. ६९ टक्के भारतीय लोकांना खरा आवाज आणि एआय आवाजातील फरक कळला नाही. दुर्दैव म्हणजे ८३ टक्के लोकांनी अशा फेक कॉल्सना बळी पडून आपले पैसे गमावले आहेत.

Story img Loader