गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने एका माजी नगरसेवकाच्या भावासह सहा जणांना एका घोटाळ्यासंबंधित अटक केली. या टोळीने बेकायदा पद्धतीने कॅनडा आणि अमेरिकेत किमान ८० लोकांना पाठवले. ज्यांचे दोन्ही देशांचे व्हिसा अर्ज अनेक वेळा नाकारले गेले, अशांना या टोळीने लक्ष केले. गेल्या सहा महिन्यांपासून या टोळीचे बेकायदा पद्धतीने काम सुरू होते. अर्ज नाकारल्यामुळे विदेशात जाऊ न शकणाऱ्या निराश व्यक्तींचा फायदा या टोळीने घेतला आणि विदेशात जाण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल ३० ते ७५ लाख रुपये आकारले. विदेशात बेकायदा पद्धतीने जाणारे बहुतेक लोक गुजरातचे होते. नेमका हा घोटाळा काय? या टोळीद्वारे वापरला जाणारा ‘मुंडी कट’ पासपोर्ट काय? आणि हा घोटाळा कसा उघडकीस आला? जाणून घेऊयात.
टोळीमध्ये कोणाचा समावेश?
मुंबई गुन्हे शाखेतील पोलिसांनी असा आरोप केला आहे की, या टोळीचा प्रमुख अजित पुरी आहे. तो या व्यवसायात शहरातील सर्वात मोठा खेळाडू असल्याचे मानले जाते. टोळीतील पुरी नावाच्या आरोपीचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २००० ते २०१० पर्यंत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्याला अनेक वेळा अटकही करण्यात आली आहे. परंतु, तो सध्या जामिनावर बाहेर होता. या टोळीत बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या डीटीपी ऑपरेटरसह बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) माजी नगरसेवकाच्या भावाचादेखील समावेश आहे, त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पुरी हा गुजरातमध्ये एजंटचे एक नेटवर्क चालवतो. हे लोक व्हिसा नाकारल्या गेलेल्या लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांना या टोळीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.
‘मुंडी कट’ पासपोर्ट काय आहे?
विदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने मागणी करण्यात आलेले पैसे भरल्यानंतर ही टोळी संबंधित देशाचा व्हिसा असलेल्या नागरिकाचा पासपोर्ट खरेदी करायची. अमेरिका किंवा कॅनडाचा व्हिसा असलेली व्यक्ती त्यांचा पासपोर्ट सुमारे पाच लाख रुपयांना विकायची. त्यानंतर इतर सदस्य पासपोर्टवरील फोटो इच्छुक नागरिकाच्या फोटोने बदलायचे, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले. डीटीपी ऑपरेटर सुधीर सावंतला या प्रकरणात अटक करण्यात आली. तोच अशा पद्धतीचे बेकायदा ‘मुंडी कट’ पासपोर्ट तयार करायचा. ही टोळी पासपोर्टधारकाचे वयदेखील इच्छुकाच्या वयाशी जुळवायची. पासपोर्टला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणखी एक आरोपी संजय चव्हाणचीदेखील मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
विमानतळ सुरक्षेचीही फसवणूक
एअरलाइन काउंटरना प्रवाशाची ओळख स्वतंत्रपणे पडताळण्यासाठी पासपोर्ट पडताळणी तपशील उपलब्ध नसतात. तसेच इमिग्रेशन अधिकाऱ्यांजवळ व्हिसा किंवा बोर्डिंग पास तपशील उपलब्ध नसतात, याचाच फायदा घेत टोळीने एक प्रणाली स्थापित केली. संबंधित व्यक्तीला दोन फोल्डर बाळगण्याचे निर्देश दिले जायचे. एकामध्ये मूळ व्हिसा असलेला ‘मुंडी-कट’ पासपोर्ट आणि दुसऱ्यामध्ये त्या व्यक्तीचा मूळ पासपोर्ट, ज्याचा बनावट व्हिसा आणि बोर्डिंग पास त्यांच्या बॅगेत लपवलेला असायचा. प्रवाशाला मार्गदर्शन करणारा नगरसेवकाचा भाऊ रोशन दुधवडकर होता, जो विमानाने प्रवास करण्याच्या बहाण्याने विमानतळावर उपस्थित असायचा. रोशन दुधवडकर हा संबंधित इच्छुक व्यक्तीला एक नवीन सिम कार्ड, फोन आणि ब्लूटूथ डिव्हाइस द्यायचा. ब्लूटूथ डिव्हाइस आणि स्वतः एक नवीन सिम वापरून, तो व्यक्तींना प्रक्रिया सांगायचा.
इच्छुक व्यक्ती सीआयएसएफ सुरक्षा आणि चेक-इन काउंटरला त्यांचा ‘मुंडी-कट’ पासपोर्ट दाखवायचे. तसेच त्यांचे सामान तपासण्यासाठी, त्यांचा बोर्डिंग पास मिळविण्यासाठी आणि सुरक्षा तपासणीसाठी दुधवडकर हा त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना द्यायचा. चेक-इनदरम्यान एअरलाइन काउंटर पासपोर्टबद्दल अलर्ट देणार नाही हे त्यांना ठावूक होते, कारण त्यांना पासपोर्टच्या आतील माहितीमध्ये प्रवेश दिला जात नाही. पुढील प्रक्रियेत प्रवासी ‘मुंडी-कट’ पासपोर्ट त्यांच्या मूळ पासपोर्टशी बदलायचे.
त्यानंतर प्रवासी एका फोल्डेबल रबर सीलचा वापर करून ‘मुंडी-कट’ पासपोर्ट आणि बोर्डिंग पासवर बनावट इमिग्रेशन स्टॅम्प लावायचे. त्यानंतर ते त्यावर १० रुपयांच्या नाणी च्युइंगम लावून चिकटवायचे आणि शौचालयात फ्लश करायचे. अखेरच्या प्रक्रियेत प्रवासी हे एअरलाइन कर्मचाऱ्यांना व्हिसा आणि इमिग्रेशन स्टॅम्पसह ‘मुंडी-कट’ पासपोर्ट दाखवायचे आणि विमानात चढायचे. पोलिसांच्या माहितीनुसार, विमानतळाच्या आत आगमन झाल्यानंतरची तपासणी फार कठोर नसते; ज्यामुळे प्रवाशी पकडला जाण्याची शक्यताही फार कमी असते.
हा घोटाळा कसा उघडकीस आला?
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, दुधवडकर दर महिन्याला थायलंडला विमानाने जात असल्याचे आणि कोणीतरी अमेरिका किंवा कॅनडाला जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले आणि यासंबंधित तपास केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हे शाखेला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. दुधवडकरला अटक झाली आणि या टोळीचा पर्दाफाश झाला. एका अधिकाऱ्याने हेदेखील स्पष्ट केले की, अशा टोळ्यांची बेकायदा कृत्ये ओळखता यावी म्हणून पोलिस आणि विमानतळ अधिकारी आवश्यक पावले उचलत आहेत.