‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या ताज्या माहितीनुसार केनियामधील पास्टर (चर्चचा कारभार चालविणारा) पॉल मॅकेन्झी यांच्या प्रभावाखाली येऊन २०० लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. पॉल मॅकेन्झी एका धार्मिक पंथाचा प्रमुख होता, ज्याने आपल्या उपदेशाने अनुयायांच्या मनाचा ताबा घेतला होता. एप्रिल महिन्यात केनियन पोलिसांनी ‘गुड न्यूज इंटरनॅशनल’ चर्चचा संस्थापक पॉल मॅकेन्झीला अटक केली. पूर्व केनियामधील शाकाहोला जंगलातील ८०० एकर जमिनीवर पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता तिथे ८० मृतदेह पुरल्याचे आढळून आले. या मृतदेहांपैकी अधिकतर मृत्यू हे उपासमारीमुळे झाले होते. तर काही मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले होते. कदाचित त्यांचा गळा आवळून खून केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चर्चचे काही अनुयायी जिवंत आढळले, मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. काही जणांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू ओढवला. महिनाभराची शोधमोहीम आणि उत्खननानंतर आता जवळपास २०० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर अन्त्यसंस्कार करण्यासाठी स्मशानातही जागा कमी पडली. त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीने रेफ्रिजरेटर कटेंनर देऊ केले, जेणेकरून मृतदेह काही दिवस जतन करता येतील आणि जागा झाल्यानंतर त्यांच्यावर अन्त्यसंस्कार केले जातील. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्यासाठी कोणते कारण कारणीभूत ठरले? गुड न्यूज चर्चमध्ये नक्की काय सुरू होते? पॉल मॅकेन्झीने अनुयायांना कोणती पट्टी पढवली होती, या प्रश्नांचा घेतलेला आढावा.

पॉल मॅकेन्झी कोण आहे?

मॅकेन्झी धर्मोपदेशक होण्यापूर्वी टॅक्सीचालक होता. त्यानंतर इवॅनजेलिकल (Evangelical) पंथाचा धर्मप्रचारक म्हणून तो काम करू लागला. या धर्मकार्यात तो दोन दशकांपासून कार्यरत आहे. इवॅनजेलिकल ही ख्रिश्चन धर्माची एक शाखा आहे. जे बायबल आणि येशूवर नितांत श्रद्धा ठेवतात.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकी खुलासा करत म्हणाले, “भाई खूप…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sukanya mone reveals she got call from manoj joshi wife at midnight 2 pm
सुकन्या मोनेंना मध्यरात्री २ वाजता फोन केला अन् विचारलेलं…; ‘आभाळमाया’तील ‘त्या’ सीनमुळे मनोज जोशींच्या पत्नीवर झालेला परिणाम
salman khan and salim khan effigies burnt in jodhpur
संतप्त बिश्नोई समाजाने सलमान आणि त्याच्या वडिलांचा पुतळा जाळला; सलीम खान यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भावना दुखावल्या…
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण
Lakhat Ek Aamcha Dada
Video: आईवरून मारला टोमणा आणि सूर्याने केली मारामारी; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्या दादा आणि शत्रू यांच्यात राडा होणार
Woman poisons boyfriend thinking he would inherit ₹252 crore.
Woman poisons Boyfriend : २५२ कोटींसाठी बॉयफ्रेंडवर विषप्रयोग, हत्या झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ! नेमकं काय घडलं वाचा

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या वार्तांकनानुसार इवॅनजेलिकल ख्रिश्चॅनिटी आणि त्याचे धर्मोपदेशक यांचे आफ्रिका खंडात पेव फुटले असून त्यांना चांगली लोकप्रियतादेखील मिळत आहे. केनियामध्ये १९६३ पर्यंत ब्रिटनची वसाहत होती. वसाहतवादापासून मुक्ती मिळाल्यानंतर केनियामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मनिरपेक्षतेचे वारे वाहू लागले, ज्यातून केनियामध्ये धार्मिक उलथापालथ झाली. या काळात रोमन कॅथोलिक किंवा अँग्लिकन चर्चेसपेक्षा इवॅनजेलिकल्सनी केनियाच्या समाजमनाची पकड घेतली. रोमन कॅथोलिक किंवा अँग्लिकन चर्च हे अधिकारश्रेणी आणि नियमांच्या अधीन राहून काम करतात. मात्र इवॅनजेलिकल चर्चेस हे वैयक्तिक धर्मोपदेशकाकडून चालविले जातात तसेच त्यांच्यावर पर्यवेक्षण किंवा देखरेख करणारी कोणतीही यंत्रणा नाही.

हे वाचा >> थांग वर्तनाचा! : धर्म, कर्मकांड, श्रद्धा, आध्यात्मिकता

मॅकेन्झीला रुथ काहिंदी नावाच्या महिलेचा पाठिंबा असल्याचेही म्हटले जात आहे. बाप्तिस्मा देणाऱ्‍या एका स्थानिक चर्चमध्ये दोघांची भेट झाली होती. मॅकेन्झीने धर्मोपदेश देण्यासाठी तिच्या घरी यावे, असा आग्रह तिने केला होता. त्या दोघांनी मिळून या चर्चची स्थापना केली होती. मात्र कालांतराने मॅकेन्झीची शिकवणुकीची पद्धत काहिंदीला खटकू लागली. तसेच मॅकेन्झीने काहिंदीवर जादूटोणा करीत असल्याचा ठपका ठेवला. ज्यामुळे २००८ साली दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेतील नेशन नावाच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना काहिंदीने सांगितले की, मॅकेन्झीचे लग्न झालेले होते. मात्र काही काळानंतर त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान काहिंदीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा एक ब्लॉगस्पॉट आहे. ज्यामध्ये पास्टर पॉल मॅकेन्झीने चर्चबद्दल माहिती दिली. गुड न्यूज इंटरनॅशनलची स्थापना १७ ऑगस्ट २००३ रोजी झाली असून चर्चच्या केनियामध्ये अनेक शाखा आहेत. चर्चचे मुख्यालय मलिंदी फुरुन्झी परिसरात आहे. चर्चचे ध्येय विशद करताना येथे म्हटले आहे की, “ख्रिस्ती धर्मातील सर्व गोष्टींवर मनापासून विश्वास ठेवून त्याप्रमाणे शिकवण देणे. या शिकवणुकीतूनच दुसरे जिसस क्राइस्ट भूमीवर अवतरतील.”

पॉल मॅकेन्झीने एका स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘अखेरचा संदेश’ (End Time Messages) या नावाने एक प्रवचनाचा कार्यक्रम केला होता. ज्यात तो म्हणाला की, देवाने निर्माण केलेले जग अखेरपर्यंत शिकवण, धर्मोपदेश आणि भविष्यवाणीवर आधारित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, जी मानवी बुद्धी आणि फसवणुकीपासून मुक्त आहे, हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यानंतर मॅकेन्झीने मलिंदीच्या किनारपट्टीलगत असलेल्या आणि विस्तीर्ण पसरलेल्या जंगलामध्ये आपल्या चर्चचे कॅम्प लावण्यास हळूहळू सुरुवात केली.

pastor end time massage
मॅकेन्झीच्या ब्लॉगवरील फोटो. ज्यामध्ये त्याच्या शेवटच्या संदेशाची माहिती देण्यात आली आहे.

मॅकेन्झीची कट्टरतावादी शिकवणूक मृत्यूस कारणीभूत?

टीव्ही चर्चासत्र आणि यूट्यूबवरील व्हिडीओमुळे मॅकेन्झीची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. मॅकेन्झीच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या टोकाच्या आणि अवास्तव मतांवरदेखील अनुयायी निष्ठा ठेवायला लागले. मॅकेन्झीने अनुयायांना सांगितले की, हे जग १५ एप्रिल (२०२३) रोजी नष्ट होणार आहे. त्यानंतर जगावर एक हजार वर्षे सैतानाचे राज्य असेल, अशी माहिती रॉयटर्सने दिली. मॅकेन्झीमुळे जे लोक मृत्यू पावले त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅकेन्झीने आपल्या अनुयायांना मृत्यू होईपर्यंत उपाशी राहण्याचा आणि त्यांच्या मुलांनाही मारण्याचा आदेश दिला. असे केल्याने १५ एप्रिलच्या आधीच तुम्ही स्वर्गात येशूची भेट घेऊ शकाल, असेही मॅकेन्झीने सांगितले.

मॅकेन्झीच्या योजनेमध्ये तीन टप्पे होते. पहिल्यांदा अनुयायांनी स्वतःच्या मुलांना मारावे, नंतर महिलांना आणि मग स्वतःचा नाश करावा. मात्र जेव्हा या घटनेचा तपास केला गेला, तेव्हा मॅकेन्झीने हे दावे फेटाळून लावले. तसेच मी कुणालाही उपाशी राहण्यास सांगितले नाही, असेही तो म्हणाला.

‘रॉयटर्स’ने काही अनुयायांच्या नातेवाईकांशी चर्चा करून यातील तथ्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकाने सांगितले की, माझे चार नातेवाईक या प्रकरणामुळे मृत्यूमुखी झाले आहेत. मॅकेन्झी आपल्या कट्टर शिकवणुकीतून अनुयायांना त्यांच्या कुटुंबापासून आणि समाजापासून तोडण्याचे काम करायचा. मार्चमध्ये प्रसारित केलेल्या एका व्हिडीओत मॅकेन्झी म्हणाला, “शिक्षण ही वाईट गोष्ट आहे. शालेय अभ्यासक्रमातून मुलांना समलैंगिकता शिकवली जाते.”

२०१७ साली तपासयंत्रणांनी गुड न्यूज इंटरनॅशनलच्या जागेची तपासणी केली होती, तेव्हा तिथे ४३ मुले आढळून आली, जी नियमित शिक्षण घेत नव्हती. त्या वेळी चर्चने शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र कालांतराने चर्चमध्ये मॅकेन्झीने शिकवण देण्याचे वचन दिल्यानंतर हा गुन्हा मागे घेण्यात आला. २०१९ साली यंत्रणांनी मॅकेन्झीचे चर्च बंद करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर मॅकेन्झीने शाकाहोला जंगलातील कॅम्पमध्ये आपले बस्तान हलविले.

जगाच्या अंताची बतावणी आणि शेकडो मृत्यू

या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात एका स्थानिकाने त्याचा भाऊ आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. मॅकेन्झीच्या आदेशानंतर भाऊ आणि वहिनीने त्यांच्या मुलाला मरेपर्यंत उपाशी ठेवले, ज्यामुळे जंगल परिसरात मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिकाने नंतर न्यायालयातही दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी जंगलातील कॅम्प परिसरात झडती घेतली असता सदर मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मॅकेन्झीला अटक केली. पण न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला जामिनावर सोडले. या अटकेमुळे मॅकेन्झीची योजना फसली. जामीन मिळताच मॅकेन्झी त्वरित जंगलामधील कॅम्पमध्ये परतला आणि त्याने सांगितले की, जगाचा अंत होण्याची तारीख ऑगस्ट महिन्यातली नसून ती १५ एप्रिल आहे. (आधीच्या योजनेनुसार त्याने ऑगस्ट महिना ठरविला होता.)

हे वाचा >> धर्म नाकारण्यातच शहाणपणा!

१३ एप्रिल रोजी पोलिसांना गुप्त खबर मिळाली, त्यानुसार त्यांनी पुन्हा जंगल परिसरात धाड टाकली आणि त्यांना १५ लोक अतिशय कमजोर अवस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना चार लोकांचा मृत्यू झाला. या वेळी पुन्हा एकदा मॅकेन्झीला अटक करण्यात आली आणि जंगल परिसरात खोदकाम केल्यानंतर २१ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृतदेह आढळून आले.

पीडित अनुयायी आणि पॉल मॅकेन्झीचे पुढे काय होणार?

केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी सांगितले की, मॅकेन्झीवर आरोप झालेल्या प्रकरणाची माहिती आधीच का मिळाली नाही? त्याच्यावर वेळीच निर्बंध का घातले नाहीत? या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. १० मे रोजी केनियाच्या न्यायालयाने मॅकेन्झीचा जामीन फेटाळून लावला आणि त्याला ३० दिवसांची कोठडी सुनावली.

केनियाचे मंत्री किथुर किंडिकी म्हणाले, मॅकेन्झी आता आयुष्यभर तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच मृतदेह पुरण्यासाठी ज्या लोकांनी मॅकेन्झीला मदत केली, त्या लोकांनादेखील कायद्याप्रमाणे कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल.

या प्रकरणाला राजकीय वळण का लागले?

राष्ट्रपती रुटो यांच्या अकार्यक्षमतेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मॅकेन्झीसारख्या सैतानाला रोखण्यास आणि हे प्रकरण हाताळण्यात ते अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मॅकेन्झीला मार्च महिन्यात जामिनावर बाहेर सोडणे ही चूक होती, याबद्दल रुटो यांनी माफी मागितली आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती रुटो हे स्वतः कट्टर धार्मिक असून त्यांची पत्नी रकेलदेखील इवॅनजेलिकल धर्मोपदेशक आहे.