Nazca Lines geoglyphs Peru: पेरूच्या लीमा शहराच्या दक्षिणेला सुमारे ४०० किमी अंतरावर उजाड नाझ्का पांपा प्रदेशात शेकडो (कदाचित हजारो) प्राचीन जिओग्लिफ्स- कातळशिल्प आढळतात. पुरातत्त्वशास्त्रातील सर्वात मोठ्या कोड्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नाझ्का लाइन्स १९२० च्या दशकाच्या मध्यावर योगायोगाने शोधल्या गेल्या. या कातळशिल्पांपैकी सुमारे ४३० कातळशिल्प शोधण्यासाठी जवळपास एक शतक लागले. परंतु पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI)’ मदतीने ३०३ नवीन कातळशिल्पांचा शोध लागला. या लेखात, ‘नाझ्का लाइन्सचा इतिहास’ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामाध्यमातून पुरातत्त्वशास्त्रात AI कशा प्रकारे क्रांती घडवून आणत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्राचीन भूचित्रकला
जिओग्लिफ्स म्हणजे जमिनीवरील दगड, माती किंवा गोट्यांवर तयार केलेला आकृतिबंध. नाझ्का मधील काही कातळशिल्प २००० वर्षांहून अधिक प्राचीन आहेत. येथील काही ठिकाणी दगड आणि माती काढून प्रतिमा तयार करण्यात आल्या होत्या. वाळवंटातील वरचा मातीचा थर ऑक्सिडाइझ होऊन गडद तांबूस रंगाचा झाला आहे. त्यामुळे कोरलेल्या रेषा त्यांच्या सभोवतालच्या जमिनीच्या तुलनेत उठून दिसतात. हा प्रदेश जवळपास पाऊस किंवा वाऱ्याविना असतो, त्यामुळे या रचनांवर जमिनीची धूप होण्याचा परिणाम फारसा झालेला नाही. परिणामी हे जिओग्लिफ्स- कातळशिल्पे हजारो वर्षांपासून टिकून आहेत.
नाझ्का लाइन्स
नाझ्का लाइन्स १९२० च्या दशकाच्या मध्यात गिर्यारोहकांनी शोधल्या. १९२६ साली पेरूचे पुरातत्त्वज्ञ टोरीबियो मेजिया झेस्पे यांनी या लाइन्सचा शास्त्रीय अभ्यास करणारे पहिले संशोधक होण्याचा मान मिळवला. नंतर १९३० च्या दशकात हवाई उड्डाणांची प्रगती झाल्यानंतर पेरूच्या आकाशातून उड्डाण करणाऱ्या पायलट्सनी अनेक नवीन जिओग्लिफ्स शोधून काढली. या आकृत्यांमध्ये चौकोनी आकार, गोलाकार शिडीचा आकार, नागमोडी रेषा तसेच हमिंगबर्ड आणि कोळ्यांसारख्या शिल्पित आकृतींचा समावेश होता.
जिओग्लिफ्स- कातळशिल्पे ओळखण्यात आव्हाने कोणती?
नाझ्का लाइन्स जमिनीवरून ओळखणे जवळपास अशक्य आहे. किंबहुना आकाशातून घेतल्या जाणाऱ्या शोधांनाही मर्यादा आहेत. या रेषा हवाई दृश्यातून दिसत असल्या, तरी यासाठी जमिनीलगत उड्डाण करणाऱ्या विमानांची आवश्यकता असते. त्यातही लहान जिओग्लिफ्स शोधणे कठीण असते, त्यामुळेच नाझ्का लाइन्सच्या शोध प्रक्रियेचे काम अत्यंत मेहनतीचे आणि वेळखाऊ ठरले.
एआय आणि ड्रोनमुळे शोध प्रक्रियेला गती
प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणात क्रांतिकारी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ३०३ नवीन जिओग्लिफ्स शोधण्यात आली. संशोधकांनी नाझ्का पांपा मध्ये ६०० चौरस किमीहून अधिक क्षेत्र ड्रोनच्या जमिनीलगतच्या उड्डाणाद्वारे आणि नंतर एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) उपयोग करून डेटा विश्लेषण केले.
एआयमुळे काय साध्य झाले?
प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन या आकृती शोधणे शक्य असले तरी वैमानिकांना नेमके कुठे पाहायचे हे माहीत असणे आवश्यक होते. पांपा (दक्षिण अमेरिकेतील विस्तीर्ण सपाट भूभाग) इतका प्रचंड आहे की “आवळ्याच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचे काम ऑटोमेशनशिवाय अशक्य होते,” असे आयबीएमचे भौतिकशास्त्रज्ञ मार्कस फ्रिटाग यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले.
नवीन जिओग्लिफ्स लहान असूनही कशी सापडली?
जपानी संशोधकांच्या एका टीमने आयबीएमच्या सहकार्याने असे तंत्रज्ञान विकसित केले की, जे हवाई छायाचित्रांमधील अतिशय फिकट आकृतीदेखील ओळखू शकते. घेतलेल्या हवाई छायाचित्रांमधील एआयने ९८% प्रतिमा वगळल्या ज्यामुळे फक्त २% किंवा ४७,४१० साइट्स शिल्लक राहिल्या ज्यांचे संशोधकांनी प्रत्यक्ष स्वत:च विश्लेषण केले.
अधिक वाचा: Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ़ दर्गा हे शिवमंदिर होते का? ऐतिहासिक संदर्भ काय सुचवतात?
शोधाची प्रक्रिया
यामागाटा विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. मसातो साकाई यांच्या नेतृत्वाखालील टीमने या आकृतींवर काम केले. त्यांनी सुरुवातीला १,३०९ शक्यता निवडल्या. या ठिकाणी पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जाऊन “ग्राउंड-ट्रुथिंग” केले.
नवीन आकडेवारी
सध्यापर्यंत ३०३ नवीन नाझ्का जिओग्लिफ्स शोधण्यात यश आले आहे. मात्र डॉ. साकाई यांचे मत आहे की, अजून किमान ५०० आकृती शोधल्या जाण्याची शक्यता आहे. ड्रोन आणि एआयचा उपयोग नाझ्का रेषांच्या शोध प्रक्रियेमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक जलद आणि अचूक निष्कर्ष मिळत आहेत.
महत्त्व का आहे?
या जलद गतीने झालेल्या शोधांमुळे नाझ्का लाईन्सबद्दल आणि त्या निर्माण करणाऱ्या सांस्कृतिक समूहाबद्दल अधिक सखोल माहिती मिळते. त्यांनी लिखित स्वरूपात काहीही मागे न ठेवल्याने पेरूमधील कधीकाळी प्रगत असलेल्या प्रि-इन्का संस्कृतीबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.
पूर्वीच्या कल्पना आणि सध्याचा दृष्टिकोन
१९७० पर्यंत पुरातत्त्वज्ञांना असे वाटत होते की, या जिओग्लिफ्सला खगोलशास्त्रीय महत्त्व आहे. काही थक्क करणाऱ्या सिद्धांतांमध्ये परग्रहवासी आणि प्राचीन अंतराळवीरांनी ही केली असावीत, असेही मत मांडण्यात आले. मात्र आजचे पुरातत्त्वज्ञ या जिओग्लिफ्सच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भर देतात.
समुदायासाठी पवित्र स्थान
डॉ. साकाई यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, ‘विविध समुदायाच्या विधींसाठी जिओग्लिफ्स ही पवित्र स्थाने म्हणून कार्यरत होती आणि त्यांना नियोजित, सार्वजनिक वास्तुकला मानले जाऊ शकते. नवीन सापडलेल्या जिओग्लिफ्स मुख्यतः ‘पांपामधील वाटांजवळ’ आढळल्या आहेत. या वाटा धार्मिक विधी आणि प्राणीपालनासंबंधी माहिती सामायिक करण्यासाठी केल्या गेल्या असाव्यात.
अधिक वाचा: बारसू : उद्धव व राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या कातळशिल्पांचे महत्त्व काय?
नाझ्का लाईन्स आणि पुरातत्त्वशास्त्रातील क्रांती
या संशोधनाने केवळ नाझ्का लाईन्सचा अधिक चांगला अभ्यासच केला नाही, तर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) पुरातत्त्वशास्त्रात कशी क्रांती घडवू शकते हेही दाखवले आहे.
संशोधनाचा वेग
१९४० ते २००० पर्यंत नाझ्का जिओग्लिफ्सच्या नवीन आकृत्या शोधण्याचा वेग वर्षाला सरासरी १.५ होता. २००४ ते २०२० दरम्यान, रिमोट सेन्सिंगद्वारे उच्च-प्रतिरेषा प्रतिमा उपलब्ध झाल्यामुळे हा वेग वाढून वर्षाला १८.७ झाला. सध्याच्या संशोधनाने ही गती १६ पट वाढवली आहे.
नवीन युगाचा आरंभ
संशोधनानुसार, “जसे हवाई छायाचित्रणामुळे पुरातत्त्वशास्त्रात क्रांती झाली, तसेच एआयच्या साहाय्याने शोध प्रक्रियेचा वेग आणि अचूकता क्रांतिकारक पातळीवर पोहोचू शकते.” नाझ्का रेषांच्या नव्या शोधांमुळे केवळ या प्राचीन संस्कृतीचा अधिक चांगला अभ्यास होणार नाही, तर पुरातत्त्वशास्त्रात एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा महत्त्वाचा ठरतो हेही स्पष्ट झाले आहे.