SAR technology in archaeology: वाळवंटात वाळूखाली दडलेली प्राचीन रहस्यं उलगडणे हे नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारक एकत्रिकरणामुळे पुरातत्त्वशास्त्रात नवी क्रांती होत आहे. त्यामुळे जमिनीच्या आत दडलेली स्थळं उघड होतं आहेत. रिकाम्या क्वार्टरपासून ते मंगोलियाच्या मैदानी भागांपर्यंत एआयने काळाच्या ओघात हरवलेल्या संस्कृतींचे ठसे उलगडायला सुरुवात केली आहे. विस्तीर्ण वाळवंटांच्या भूभागांचा शोध घेणे, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक मोठं आव्हान ठरलं आहे. वाऱ्यामुळए सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणाऱ्या वाळूच्या थरांनी आणि प्रचंड विस्ताराने ऐतिहासिक खजिन्यांना लपवून ठेवले आहे. त्यामुळे मानवजातीचा मोठा प्राचीन इतिहास आजही भूपृष्ठाखालीच दडलेला आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रातील क्रांतिकारक प्रगतीमुळे इतिहासाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे संशोधकांना वाळवंटाच्या वाळूखाली दडलेली प्राचीन स्थळं शोधणे शक्य झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाळवंट आणि पुरातत्त्वशास्त्रातील आव्हानं

रुब अल-खालीसारखा वाळवंटी भूभाग रिकामं क्वार्टर म्हणूनही ओळखला जातो. हे वाळवंट शेकडो हजारो चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. पारंपरिक पुरातत्त्वीय पद्धती म्हणजेच जमिनीवर सर्वेक्षण करणे हे श्रमप्रधान, खर्चिक आणि वेळखाऊ असते. या मर्यादांमुळे मोठ्या प्रमाणावर संभाव्य ऐतिहासिक स्थळं अजूनही अनभिज्ञच राहिली आहेत. सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आकलनाने मात्र या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवला आहे. या साधनांचा एकत्रित वापर करून संशोधक पुरातत्त्वीय शोधांची कार्यक्षमता आणि अचूकता लक्षणीयरीत्या वाढवत आहेत.

सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) आणि मशीन लर्निंग: हे कसं काम करतं?

सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे. हे रडार सिग्नल्सचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-प्रतिमायुक्त चित्र तयार करतं. ऑप्टिकल इमेजिंगच्या विरुद्ध SAR वनस्पती, बर्फ किंवा वाळूसारख्या अडथळ्यांमध्ये प्रवेश करू शकतं. त्यामुळे वाळवंटाच्या भूभागाखाली दडलेल्या वैशिष्ट्यांचा शोध घेण्यासाठी ते विशेषतः उपयुक्त ठरतं. पृष्ठभाग आणि उपपृष्ठीय रचनेतील सूक्ष्म बदल पकडून SAR डेटा पुरातत्त्वीय स्थळं ओळखण्यासाठी फायदेशीर ठरतं.

एआयची भूमिका

मशीन लर्निंग अल्गोरिदम विशेषतः, डीप लर्निंग अल्गोरिदम SAR डेटाचं विश्लेषण करून त्यातील नमुने आणि विसंगती ओळखतात. ज्ञात पुरातत्त्वीय स्थळांवर या अल्गोरिदमचं प्रशिक्षण घेऊन संशोधक जमिनीखाली गेलेल्या वसाहती, मार्ग किंवा इतर मानवनिर्मित रचना दर्शवणाऱ्या वैशिष्ट्यांना ओळखायला शिकवू शकतात. या तंत्राच्या वापरामुळे लागणाऱ्या श्रमांमध्ये मोठी कपात होते आणि अज्ञात स्थळं शोधण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.

क्रांतिकारक शोध: दुबई वाळवंटातील केस स्टडी

एआय-सक्षम SAR तंत्रज्ञानाच्या लक्षणीय प्रभावाचं प्रदर्शन दुबईच्या वाळवंटात अलीकडेच घडलं. तिथे संशोधकांनी ५,००० वर्षांपूर्वीच्या मानवी वावराचे ठसे शोधले. या शोधांमध्ये प्राचीन वसाहती आणि प्राचीन मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे या कठोर वातावरणात प्राचीन समुदाय कसे टिकून राहिले याची झलक मिळते. “उत्खनन न करता ही स्थळं शोधणं म्हणजे इतिहासाचे लपलेले अध्याय उलगडल्यासारखं वाटतं,” असं या प्रकल्पातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ मारिया गोंझालेझ सांगतात. “यामुळे प्राचीन संस्कृतींनी या परिस्थितींशी कशा प्रकारे जुळवून घेतलं यावर नवा आणि आगळा दृष्टिकोन मिळतो आहे.” जगभरातील इतर वाळवंटांमध्येही असेच यश मिळाले आहे. उदाहरणार्थ, मंगोलियामध्ये संशोधकांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो मध्ययुगीन स्थळं ओळखली आहेत. त्यामुळे सिल्क रोडवरील ऐतिहासिक व्यापारी मार्ग आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर प्रकाश पडला आहे.

प्राचीन व्यापारी मार्गांचा पुनःशोध

एआय-सक्षम SAR तंत्रज्ञानाचा सर्वात क्रांतिकारक पैलू म्हणजे प्राचीन व्यापारी जाळ्याचं नकाशांकन करण्याची त्याची क्षमता. अरेबियन द्वीपकल्पात संशोधकांनी वसाहतींना जोडणारे मार्ग शोधले आहेत. जे प्रागैतिहासिक आणि सुरुवातीच्या ऐतिहासिक काळातील विस्तृत व्यापाराचा उलगडा करतात. या शोधांमुळे वस्तू, कल्पना आणि लोकांचे प्रदेशांमध्ये झालेले स्थलांतरण पुन्हा उलगडता येत आहे. त्यामुळे प्राचीन जागतिक संपर्कांचं अधिक सखोल आकलन होत आहे.

पुरातत्त्वशास्त्रात एआयच्या आकलनातील आव्हाने

एआयमध्ये पुरातत्त्वशास्त्र बदलण्याची प्रचंड क्षमता असली तरी त्याच्या आकलनाबरोबर काही आव्हानेही येतात;

१. खर्च आणि गुंतागुंत: SAR तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपग्रह, हवाई प्लॅटफॉर्म आणि डेटा प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. शिवाय, डेटा समजून घेण्यासाठी एआय, भूशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्रातील तज्ज्ञांमधील सहकार्य महत्त्वाचं असतं.

२. डेटा समजून घेण्यातील अडचणी: नैसर्गिक रचना कधी कधी मानवनिर्मित संरचनेप्रमाणे दिसू शकतात. त्यामुळे चुकीचे निष्कर्ष (फॉल्स पॉझिटिव्ह) मिळू शकतात. या आव्हानांना तोंड देण्यासाठी अल्गोरिदममध्ये सातत्याने सुधारणा आणि बहुविद्याशाखीय तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक आहे.

४. नैतिक प्रश्न: पूर्वी अज्ञात पुरातत्त्वीय स्थळं शोधणे आणि त्यांची नोंद करणे यामुळे मालकी हक्क, संरक्षण आणि सांस्कृतिक वस्तूंच्या जबाबदार वापराबाबत प्रश्न उपस्थित होतात.

डॉ. ली वेई, सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील रिमोट सेन्सिंग तज्ज्ञ सांगतात की, “या अल्गोरिदमचे अधिक परिष्करण केल्याने लपलेली पुरातत्त्वीय स्थळं शोधण्यासाठी एआयची अचूकता आणि उपयुक्तता वाढेल. त्यामुळे ते जगभरातील संशोधकांसाठी अनिवार्य साधन ठरेल.”

हाय-टेक पुरातत्त्वशास्त्राचं भवितव्य

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा समावेश पुरातत्त्वशास्त्रासाठी एका नवीन युगाची सुरुवात दर्शवतो. वाळवंटांपासून जंगलांपर्यंत आणि ध्रुवीय प्रदेशांपर्यंत ही साधनं पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली दडलेली असंख्य रहस्यं उलगडण्याची क्षमता राखतात. त्यामुळे मानवजातीच्या भूतकाळाविषयी अद्वितीय आकलन होऊ शकतं. दुबई, मंगोलिया आणि इतर ठिकाणांवरील प्रकल्पांच्या यशामुळे प्राचीन संस्कृतींचा शोध घेण्याच्या आणि त्यांना समजून घेण्याच्या पद्धतींमध्ये प्रचंड बदल घडवण्याची एआयची क्षमता दिसून येते. एआय अल्गोरिदम आणि SAR तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे आपल्या सामायिक मानवी वारशाच्या लपलेल्या कहाण्या उजेडात येत राहतील. त्यामुळे या सांस्कृतिक खजिन्यांचं संवर्धन पुढील पिढ्यांसाठी सुनिश्चित होईल. “एआयमुळे सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि समजून घेण्याची आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते,” असं युनेस्कोच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं. “अशा नवकल्पना प्राचीन संस्कृतींच्या ज्ञानाला पुढे नेण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.”

हा क्रांतिकारक बदल दर्शवतो की, ज्यावेळेस प्रगत तंत्रज्ञान पुरातत्त्वशास्त्राशी दोडलं जातं, त्यावेळेस वाळवंटाखाली लपलेल्या अनभिज्ञ इतिहासाला उजेडात आणणाऱ्या असीम शक्यता उलगडतात!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How ai is uncovering 5000 year old mysteries buried beneath deserts svs