महाकुंभ मेळ्याची काल (२६ फेब्रुवारी) सांगता झाली. ४५ दिवस चाललेल्या या धार्मिक मेळाव्याची सांगता होत असतानाच, महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमावर स्नान करताना भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणाऱ्या या उत्सवाला भारतातून आणि अगदी भारताबाहेरूनही कोट्यवधी भाविक आले होते. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात उपस्थितांची अंदाजे संख्या ६४ कोटींहून अधिक झाली आहे. प्रचंड गर्दी असूनही आणि प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असूनही, प्रशासनाला भाविकांच्या आकडेवारीची नोंद ठेवणे शक्य झाले आहे. अशा गर्दीत प्रत्येक व्यक्तीची माहिती ठेवणे जवळजवळ अशक्य वाटत असले तरी तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले आहे. ते कसे? याविषयी जाणून घेऊ.
कृत्रिम तंत्रज्ञानाने महाकुंभ मेळ्यात गर्दी व्यवस्थापित करण्यात कशी मदत केली?
राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत हजारो लोक त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे आले. मोठ्या मेळ्याच्या व्यवस्थापनासह भाविकांची संख्या ट्रॅक करण्यासाठी एआय-सक्षम कॅमेरे आणि सीसीटीव्ही यांसह प्रगत तंत्रज्ञान तैनात करण्यात आले होते. अर्धकुंभ आणि कुंभ मेळ्याला उपस्थित असणारा मोठा जनसमुदाय हे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. मागील मेळ्यांमध्ये उपस्थित भाविकांची गणना करण्यासाठी अचूक पद्धतींचा अभाव होता. यावेळी आयोजकांनी यात्रेकरूंच्या संख्येवर अचूकपणे लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले होते, “आम्ही भाविकांच्या उपस्थितीची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञान (एआय)चा वापर करत आहोत. ही प्रणाली तत्काळ अलर्ट जनरेट करेल; ज्यामुळे अधिकाऱ्यांना संपूर्ण मेळ्यात भाविकांची प्रभावीपणे गणना आणि निरीक्षण करता येईल.”

महाकुंभ मेळा १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. परंतु, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आता नव्हे, तर एक वर्षापूर्वीच सुरू झाला. ‘इंडिया टुडे’च्या मते, गर्दीचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाधारित उपकरणे माघ मेळा २०२४ मध्ये वापरण्यात आली होती. त्यात मानवी हालचालींचे ट्रॅकिंग केले गेले होते. हे प्रगत कॅमेरे केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर गर्दीत विभक्त झालेल्या व्यक्तींना शोधणे आणि त्यांना पुन्हा एकत्र आणणे यासाठी मदत व्हावी याकरिताही तैनात करण्यात आले होते. पहिल्यांदाच अधिकाऱ्यांनी सतर्कतेसाठी पाण्याखालील ड्रोनचादेखील वापर केला होता; विशेषत: जेव्हा लाखो लोक गंगा, यमुना व सरस्वती या नद्या एकत्र येऊन भेटतात, त्या संगमावर स्नान करण्यासाठी घाटांवर जमले होते.
एआय तंत्रज्ञान व्यक्तींची गणना कसे करते?
संपूर्ण शहरात बसवलेले कॅमेरे हे ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे केंद्रीय सर्व्हरशी जोडलेले आहेत; ज्यामुळे रीअल-टाइम डेटा ट्रान्स्फर करता येतो. फुटेजवर प्रक्रिया करण्यासाठी दोन एआय मॉडेल एकत्र काम करतात. त्यातील एक मॉडेल एकूण गर्दीच्या घनतेचा अंदाज करते; तर दुसरे मॉडेल वैयक्तिक हालचाली ट्रॅक करते. हा डेटा फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यातील इनपुट वापरून अधिक स्पष्ट केला जातो आणि नंतर एका विशेष अल्गोरिदमद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते. ‘इंडिया टुडे’च्या म्हणण्यानुसार, अंतिम वर्गीकृत डेटा प्रयागराजमधील इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) येथील डॅशबोर्डवर प्रदर्शित केला जातो. अचूक निरीक्षण आणि गणनेसाठी प्रणाली वेगवेगळ्या ठिकाणी व्हर्च्युअल पॅरामीटर्स वापरते; जसे की विशिष्ट घाटांवर प्रवेश आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावरील ट्रॅकिंग.
या मोहिमेची जबाबदारी ‘आयसीसीसी’वर होती, ज्यात पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि तज्ज्ञांचे पथक यांचा समावेश होता. रीअल-टाइम अलर्टचे बारकाईने निरीक्षण करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. चेंगराचेंगरी रोखणे, बॅरिकेडचे उल्लंघन केल्यास त्याला प्रतिसाद देणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे व संभाव्य सुरक्षा धोके ओळखणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. मोठ्या स्क्रीनवर घाटावरील थेट फुटेज प्रदर्शित केले जात होते. पोलिस अधीक्षक व आयसीसीसी प्रभारी अमित कुमार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले होते की, एआय गर्दी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हजारो कॅमेऱ्यांद्वारे कुंभ मेळ्याचा परिसर आणि शहराचे निरीक्षण केले जात आहे.

महाकुंभमध्ये एआयचा वापर कसा झाला?
विभक्त झालेल्यांना मदत करण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित केंद्र स्थापन करण्यात आले होते. या सुविधेमध्ये व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र करेपर्यंत निवास, कपडे व अन्न पुरवले जात होते. केंद्राच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हरवलेल्या व्यक्तींची त्वरित डिजिटल नोंदणी, शोध घेण्यासाठी एआय कॅमेऱ्यांचा वापर, व्यक्तींना ओळखणे आणि पुन्हा त्यांची आपापसांत भेट करवून देणे यासाठी चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश होता. महाकुंभ मेळ्याला येणाऱ्या भाविकांना जगातील कोठूनही मार्गदर्शन करण्यासाठी एआय आधारित चॅटबॉट सादर करण्यात आले होते. चॅटबॉटने खाद्यपदार्थ, लॉकर्स, वॉशरूम व चेंजिंग रूम्सबद्दल आवश्यक माहिती प्रदान केली.
चॅटबॉटचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्यांशी भाषण आणि मजकूर या दोन्हींद्वारे संवाद साधण्याची क्षमता. भाविकांना धार्मिक विधी, गर्दीची परिस्थिती व आणीबाणीच्या सूचनांबद्दल रिअल-टाइम अपडेटदेखील यावर मिळत होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर केला गेल्यामुळे महाकुंभ मेळा हा जगभरातील भक्तांसाठी अधिक संस्मरणीय अनुभव ठरला आहे.
महाकुंभचे अंतिम स्नान
महाकुंभ दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जाणारा भव्य आध्यात्मिक सोहळा आहे. १३ जानेवारी (पौष पौर्णिमा) रोजी नागा साधूंच्या भव्य मिरवणुका आणि तीन ‘अमृत स्नानां’नी याची सुरुवात झाली. काल महाशिवरात्री दिनी या महाकुंभ मेळ्याची सांगता झाली. उत्सवाच्या अंतिम पवित्र स्नानासाठी मध्यरात्रीच्या सुमारास संगम काठावर मोठ्या संख्येने भाविकांचे आगमन झाले. काहींनी ब्राह्म मुहूर्तावर, तर अनेकांनी नियोजित वेळेआधीच पवित्र स्नान केले. जगातील सर्वांत मोठा आध्यात्मिक मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी देशभरातून यात्रेकरू आले होते.