भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठी टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या आहेत. त्यात हे गर्भनिरोधक सुरक्षित व अत्यंत परिणामकारक असल्याचे तसेच कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे दिसून आले आहे. या संशोधन चाचणीचे निष्कर्ष गेल्या महिन्यात ‘ॲड्रॉलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या नव्या शोधाबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पुरुषांसाठी उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक पद्धती कोणत्या?

गर्भनिरोधाचे दोनच पर्याय सध्या पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. ते म्हणजे निरोधचा नियमित वापर आणि नसबंदी. निरोधचा वापर शुक्राणूंना बीजांडांच्या संपर्कात येण्यात प्रभावीपणे अडथळा निर्माण करतो. तसेच लैंगिक संक्रमित आजारांपासून संरक्षण देतो. पुरुष नसबंदी ही एक किरकोळ शस्त्रक्रिया आहे. हा कायमस्वरूपी उपाय आहे. त्यात शुक्राणू वाहून नेणाऱ्या नळ्या कापल्या जातात किंवा ब्लॉक केल्या जातात, ज्याला व्हॅस डेफरेन्स म्हणतात. ही शस्त्रक्रीया तुलनेने स्वस्त असून, यासाठी केंद्र सरकारकडून नसबंदी करणाऱ्या व्यक्तीला अनुदानही दिले जाते.

हेही वाचा : विश्लेषण: तरुणांमध्ये एकटेपणा वाढतोय?

गर्भनिरोधक इंजेक्शन कसे काम करते?

पुरुषांसाठी असलेल्या गर्भनिरोधक इंजेक्शनमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन नैसर्गिक स्रावांचा (हॉर्मोन्स) वापर करण्यात आला आहे. टोचता येणारे टेस्टोस्टेरॉन पुरुषांना दर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावे लागतात. स्रावांचे हे मिश्रण शरीराला शुक्राणू तयार करण्यापासून रोखण्याचे काम करते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर कामभावना, कामोत्तेजनामध्ये कोणताही बदल न होता शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय, शुक्राणूंची कमी झालेली संख्या एक वर्षापर्यंत टिकते.

या पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत?

या पद्धतीचा मुख्य तोटा असा की हे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचा प्रभावी होण्यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात. या कालावधीत गर्भधारणा होण्याची शक्यता असल्याने दर महिन्याला पुरुषांची चाचणी करावी लागते. इंजेक्शन म्हणून दिले जाणाऱ्या हार्मोन्सच्या मिश्रणाच्या वापराबाबत अनेक अभ्यास सध्या जगभरात सुरू आहेत. त्यात गोळ्या, जेल यांचा अभ्यास करण्यात आला आहे. बहुतेक अभ्यासांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी स्रावांवर परिणाम करणारे गर्भनिरोधक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : तालिबानचा कब्जा, युद्धजन्य परिस्थिती…विविध आव्हानांनंतरही अफगाणिस्तानात क्रिकेट कसे टिकले आणि बहरले?

हार्मोनल गर्भनिरोधकाचे फायदे काय?

ज्या लोकांमध्ये शुक्राणू तयार होतात त्यांच्यासाठी गर्भनिरेाधक इंजेक्शन हा एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. हे इंजेक्शन नसबंदीला एक चांगला पर्याय ठरू शकते. गर्भनिरोधनाच्या पद्धतीमध्ये सध्या वापरतात असलेल्या गर्भनिरोधक गोळीसाठीही हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.

हार्मोनल गर्भनिरोधकांचे तोटे आहेत का?

पुरळ येणे, रात्री घाम येणे, वजन वाढणे आणि संभोग क्षमता कमी होणे असे दुष्परिणाम काही वेळा दिसू शकतात. मात्र, ते सौम्य आहेत. हे गर्भनिरोधक इंजेक्शन घेतल्यानंतर ते प्रभावीपणे काम करण्यााठी सुमारे तीन ते सहा महिने लागतील. तसेच इंजेक्शन बंद केल्यानंतर शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठीही तेवढाच कालावधी लागतो. ही पद्धत वापरणाऱ्या २५ पैकी एका पुरुषामध्ये इंजेक्शनचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे त्याच्या शरीरातील शुक्राणूंची निर्मिती पूर्णपणे थांबवली जाऊ शकत नाही.

हेही वाचा : अमेरिकेतील ३३ राज्यांची इन्स्टाग्राम, फेसबूकच्या ‘मेटा’ कंपनीविरोधात तक्रार, नेमके प्रकरण काय?

पुरुषांच्या प्रतिसादाबाबत साशंकता

१५ ते ४९ वयोगटातील जवळजवळ ६५ टक्के स्त्रिया कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गर्भनिरोधक वापरतात. अनेक स्त्रियांना असे वाटते की गर्भनिरोधक वापरण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर आहे. २०१९ साली झालेल्या एका संशोधनातील निष्कर्षांनुसार १८ ते ४४ वर्षे वयोगटातील अंदाजे १७ दशलक्ष लैंगिकदृष्ट्या सक्रिय पुरुष आहेत. पुरुषांकडून गर्भ निरोधकांच्या वापरास तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How beneficial are injectable contraceptives for men what are the side effects print exp css
Show comments