भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सेंच्युरियन इथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला. आफ्रिकेच्या विजयासह भारताचं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचं स्पष्ट झालं. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड बेडिंघम या खेळाडूला पदापर्णाची संधी दिली. बेघिंहम कोलपॅक करार स्वीकारुन इंग्लंडला रवाना झाला होता. इंग्लंडमध्ये डरहॅम संघासाठी तो चांगलं खेळत होता. तो इंग्लंडसाठी खेळण्यासाठी पात्र ठरला असता. पण ब्रेक्झिट आलं आणि सगळं चित्रच बदललं. ब्रेक्झिटनुसार इंग्लंड युरोपियन युनियनचा भाग राहिलं नाही आणि कोलपॅक कराराचं अस्तित्वच संपलं. बेघिंहमने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतल्यानंतर राष्ट्रीय संघापर्यंतची वाट सोपी नव्हती. काय आहे कोलपॅक? ब्रेक्झिटमुळे तो अर्थहीन का ठरला आणि या सगळ्याचा दक्षिण आफ्रिका क्रिकेटला कसा फायदा होतोय ते क्रमाक्रमाने समजून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलपॅक काय आहे?
युरोपियन युनियनचा भाग असलेल्या देशातील नागरिक युनियनशी संलग्न देशांमध्ये परदेशी न ठरता काम करू शकतात. म्हणजेच जर्मनीचा एखादा खेळाडू फ्रान्समध्ये कोलपॅक करार स्वीकारून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतो. क्रीडा संघ असो किंवा कार्यालयीन संरचना- स्थानिकांना म्हणजे मूळ लोकांना प्राधान्य मिळणं साहजिक. विदेशी मंडळींची संख्या मर्यादितच राहते. पण या करारान्वये संबंधित व्यक्ती विदेशी ठरत नसल्याने त्याला स्थानिक लोकांना मिळतात ते सगळं मिळतं.

युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग असणाऱ्या इतर देशांनाही हा करार लागू होतो. म्हणजे युरोपाच्या बाहेर असलेल्या, पण युनियनच्या कराराचा भाग असणाऱ्या देशातल्या खेळाडूंना या कोलपॅक कराराचा फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि कॅरेबियन बेटांचा समूह.

वाचलंत का: बॅटवर ओम, मंदिराला भेट, ‘जय श्रीराम-जय माता दी’ म्हणणारा दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज तुम्हाला माहितेय का?

इंग्लंडच्या डोमस्टिक क्रिकेटमध्ये १८ संघ आहेत. सामन्यात अंतिम अकरात किती विदेशी खेळाडू खेळणार ही संख्या निर्धारित असते. कोलपॅक करारान्वये आलेले खेळाडू विदेशी श्रेणीत मोडत नाहीत. त्यांचा विचार स्थानिक खेळाडू म्हणूनच होतो. तांत्रिकदृष्ट्या हा खेळाडू दुसऱ्या देशाचा असला तरी नियमानुसार स्थानिक गणला जातो. कोलपॅकमुळे निर्धारित विदेशी खेळाडूंच्या बरोबरीने आणखी विदेशी खेळाडूंना खेळवता येतं.

कोलपॅक नाव कुठून आलं?
मारोस कोलपॅक हा स्लोव्हाकियाचा हँडबॉलपटू. पण तो जर्मनीतल्या एका क्लबरोबर खेळत होता. पण परदेशी खेळाडू म्हणून त्याला त्याचं कंत्राट गमवावं लागलं. युरोपिय युनियनच्या कायद्याप्रमाणे त्यानं क्लबच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं. त्यात त्यानं म्हटलं, “मी जर्मनीत राहतो आणि अशा देशाचा नागरिक आहे जो युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग आहे. अशावेळी जर्मन हँडबॉल लीगमध्ये माझा बिगर युरोपियन युनियन खेळाडू म्हणून विचार होऊ नये.”

कोलपॅक ज्या क्लबचा सदस्य होता तिथे दोन बिगर युरोपियन युनियन सदस्य देशांचे खेळाडू होते. त्यामुळे कोलपॅकचं कंत्राट रद्द करण्यात आलं होतं. युरोपियन युनियन कोर्टाने 2003 मध्ये कोलपॅकच्या बाजूने निर्णय दिला.

दोन देशांकडून खेळणारा, कोहलीचा सहकारी आणि ३८ वर्षांचा चिरतरुण शिलेदार

तेव्हापासून युरोपियन युनियन आणि त्याच्याशी सलग्न देशातल्या खेळाडूंना सदस्य देशांदरम्यान करार करून स्थानिक खेळाडू म्हणून खेळण्याची मुभा मिळाली.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कोलपॅक का स्वीकारतात?
दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियन हे कोटोनोयू करारान्वये एकमेकांशी संलग्न आहेत. या करारात झिम्बाब्वे तसंच अनेक कॅरेबियन देशही सहभागी आहेत. आर्थिक स्थैर्य कोणालाही महत्त्वाचं असतं. इंग्लिश काऊंटी क्रिकेटच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी कमी मानधन मिळतं. दक्षिण आफ्रिकेचं चलन असलेल्या रँडचं मूल्यांकन कमी होत चालल्याने दक्षिण आफ्रिकेत मिळणाऱ्या मानधनाची जागतिक स्तरावरची किंमत कमी होत चालली आहे. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी आणि मानधन दोन्ही नियमितपणे मिळत राहतं.

कोटा सिस्टममुळे कोलपॅक स्वीकारण्याचा निर्णय?
सामाजिक परिस्थिती आणि सर्वसमावेशकतेचा विचार करुन दक्षिण आफ्रिकेत राष्ट्रीय संघासाठीही कोटा सिस्टम अंगीकारण्यात आली आहे. ‘क्रिकेट साऊथ आफ्रिके’च्या नियमानुसार अंतिम अकरामध्ये सहा कृष्णवर्णीय खेळाडूंचा समावेश असणं आवश्यक आहे. 2016 मध्ये यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ‘ट्रान्सफॉर्मेनशल टार्गेट’ अशी योजना आखली. कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी असा कोटा असल्याने इतर खेळाडूंना मिळणाऱ्या संधी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.

कोलपॅकसाठीचे नियम, अटी काय आहेत?
कोलपॅक करारासाठी पात्र ठरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. कोलपॅकसाठी खेळाडूकडे इंग्लंडमध्ये काम करण्यासाठीचं चार वर्षांचं वैध वर्क परमिट असायला हवं. किंवा त्या खेळाडूने विशिष्ट आंतरराष्ट्रीय सामने खेळलेलं असणं अनिवार्य आहे. कोलपॅक करार स्वीकारल्यानंतर तो खेळाडू मूळ देशासाठी खेळू शकत नाही. इंग्लंड काऊंटी संघ किंवा राष्ट्रीय संघ हेच त्याचं प्राधान्य होतं. कोलपॅक कराराची कालमर्यादा संपल्यानंतर तो खेळाडू मायदेशात खेळू शकतो.

कोलपॅक करार स्वीकारणाऱ्या खेळाडूने इंग्लंड काऊंटी संघाचं सात वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतरच तसंच नागरिकत्व मिळवल्यानंतर त्याचा इंग्लंड राष्ट्रीय संघासाठी विचार होऊ शकतो. आधीच्या नियमाप्रमाणे चार वर्षं काऊंटी संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर खेळाडूचा इंग्लंड संघ निवडीत विचार होत असे मात्र आता ही अट तीन वर्षं करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या किती खेळाडूंनी कोलपॅक स्वीकारलं?
दक्षिण आफ्रिका संघासाठी कोलपॅक म्हणजे ब्रेनडेन. त्यांचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दिशेने जात असल्याने त्यांचं अपरिमित नुकसान झालं. कोलपॅकच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या चाळीसहून अधिक खेळाडूंनी देश सोडला आणि इंग्लंड गाठलं. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसही कोलपॅक स्वीकारण्याच्या बेतात होता. पण मित्र एबी डीव्हिलियर्सने त्याचं मन वळवलं. २००४ मध्ये क्लाऊ हेंडरसन हा कोलपॅक स्वीकारणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला. वर्ल्डकप २०१५ दरम्यान ऐन भरात असताना कायले अबॉटला संघाबाहेर करण्यात आलं. काही दिवसातच अबॉटने कोलपॅक स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या ड्युआन ऑलिव्हरने सगळ्यांना धक्का देत कोलपॅक स्वीकारलं. दक्षिण आफ्रिकेने गुणवान खेळाडूंची एक मोठ्ठी फळी कोलपॅकमुळे गमावली.

ब्रेक्झिटमुळे काय झालं?
ब्रेक्झिटसह इंग्लंड युरोपियन युनियनच्या संलग्ननेतून बाहेर पडलं. इंग्लंड आणि युरोपियन युनियन हे नातं आर्थिक-सामाजिक-व्यापारी पातळीवर तुटल्याने कोलपॅकचं अस्तित्वच संपुष्टात आलं. कोलपॅक लागू होणार नसल्यामुळे अनेक विदेशी खेळाडू जे स्थानिक खेळाडू म्हणून खेळत होते त्यांची नोंद विदेशी खेळाडू म्हणून केली जाऊ लागली. अंतिम अकरात ठराविक विदेशी खेळाडूच खेळू शकतात. 1 जानेवारी 2021 पासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे नोंद झालेल्या कोलपॅक खेळाडूंची नोंदणी रद्द झाली. पैसेही नाही, करारही रद्द आणि संधीही नाही अशी विचित्र स्थिती निर्माण झाल्यामुळे कोलपॅक स्वीकारलेले असंख्य खेळाडू मायदेशी परतू लागले. कायले अबॉट, रायली रुसो, वेन पारनेल, सिमोन हार्मेर, ड्युआन ऑलिव्हर हे परतले. बेडिंघमची कहाणीही अशीच काहीशी. दक्षिण आफ्रिकेच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बरीच वर्ष खेळल्यानंतर बेडिंघमने २०२० मध्ये कोलपॅक स्वीकारलं. तो इंग्लिश काऊंटी संघ डरहॅमसाठी खेळू लागला. त्याची कामगिरीही चांगली होत होती. पण ब्रेक्झिट लागू झालं आणि कोलपॅक गेलं. मायदेशी परतण्यावाचून बेडिंघमकडे पर्याय राहिला नाही. परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याने बॅट परजली. २०२३ सरताना बेडिंघमचं दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण याच काळात दक्षिण आफ्रिका बोर्डातर्फे आयोजित ट्वेन्टी२० लीग स्पर्धा होते. आफ्रिकेचे सगळे प्रमुख खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतील. बोर्डाने या दौऱ्यासाठी पर्यायी संघ निवडला आहे. या संघात ड्युआन ऑलिव्हर आहे. कोलपॅक रद्द झाल्यानंतर परतलेल्या खेळाडूंपैकी तो एक आहे. हळूहळू ‘कोलपॅक रिटर्न्ड’ खेळाडूंची संख्या वाढते आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How brexit helped south africa cricket as kolpak returned players increasing psp