तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजूज’चे संस्थापक बैजू रवींद्रन यांनी आपल्या कंपनीवरील सर्व अधिकार गमावले आहेत. गेली अनेक वर्षे स्टार्टअपमध्ये तेजस्वी तारा म्हणून चमकलेल्या या कंपनीवर दिवाळखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. बीसीसीआयला पैसे न भरल्याने ‘बैजूज‘ दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जात आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठाने मंगळवारी बैजूजविरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईस परवानगी दिली आणि कंपनीच्या संचालक मंडळाला निलंबित करून, त्यांची मालमत्ता गोठवून अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनलची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बैजूज’नेही दिवाळखोरीप्रकरणी लढण्याचे आवाहन दिले आहे. मात्र, अनेकांचे असे मत आहे की, ही कंपनी लवकरच पूर्णपणे बंद पडेल. आता फर्मचे संस्थापक व अब्जाधीश राहिलेले बैजू रवींद्रन यांना आता रिझोल्युशन प्रोफेशनलला रिपोर्ट करावे लागणार आहेत. ‘एनसीएलटी’ने पंकज श्रीवास्तव यांची रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. बैजू रवींद्रन यांची कोटींच्या घरातील नेटवर्थ शून्यावर कशी आली? त्यांनी कंपनीवरील नियंत्रण कसे गमावले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा : देशातील १६ लाख लहान मुलं लसीकरणापासून वंचित, ‘डब्लूएचओ’ची धक्कादायक माहिती; कारण काय?

बैजू रवींद्रन आणि बैजूज

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रवींद्रन हे केरळच्या अझिकोडे गावातील भौतिकशास्त्र आणि गणिताच्या शिक्षकांचे पुत्र. “ते वर्गात येताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह यायचा. जरी आपल्यापैकी काहींनी त्यांच्या सामूहिक अध्यापन पद्धतींच्या परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आम्हाला यशस्वी होण्यास मदत केली होती”, असे एका माजी विद्यार्थ्याने वृत्तपत्राला सांगितले. “त्यांना (रवींद्रन) पारंपरिक वर्गखोल्यांचा तिरस्कार होता. ते अशा वर्गखोल्यांना कंटाळवाणे मानायचे. त्यांनी या वर्गखोल्या बदलण्याचेही वचन दिले होते,” असे त्याने पुढे सांगितले.

‘बैजूज’ची स्थापना

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रवींद्रन यांनी कन्नूरमधील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘बी.टेक.’ केले. त्याआधी त्यांनी एका शिपिंग कंपनीत काम केले आणि नंतर कोचिंगचा व्यवसाय सुरू केला. रवींद्रन यांनी २०१५ मध्ये ‘बैजूज’ची स्थापना केली आणि काही काळातच या कंपनीने अभूतपूर्व यश मिळवले. ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’नुसार, त्या वर्षीच्या जुलैमध्ये २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ॲपसाठी साइन अप केले. ‘Sequoia Capital’च्या नेतृत्वाखालील ‘सीरिज बी’ फेरीत कंपनीने २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला. त्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील केस स्टडी म्हणूनही कंपनीचा उल्लेख करण्यात आला.

२०१८ पर्यंत ‘बैजूज’ एक युनिकॉर्न ठरली होती. युनिकॉर्न म्हणजे एक अशी खासगी कंपनी; ज्याचे मूल्य एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कंपनीने अभिनेता शाहरुख खानलादेखील ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून साइन केले होते. “अनेकांनी त्यांच्या अतुलनीयतेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मला वाटते की, रवींद्रन यांनाही असा विश्वास होता की, त्यांना कधीच अपयश येणार नाही,” असे त्यांच्या एका परिचिताने वृत्तपत्राला सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार कंपनीने कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान कंपनीने यशाचे नवीन शिखर गाठले.

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नुसार, कंपनीच्या ॲपवरील ‘लाइव्ह क्लासेस’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. फर्मनेदेखील आक्रमकपणे स्वतःचा विस्तार केला. कंपनीने बर्‍याच परदेशी कंपन्यांकडून निधी उभारला. त्यांनी २०२० मध्ये ३०० दशलक्ष डॉलर्समध्ये व्हाइटहॅट ज्युनियर आणि २०२१ मध्ये १५० दशलक्ष डॉलर्समध्ये ‘टॉपर’ही खरेदी केले. फुटबॉलमधील सुपरस्टार लिओनेल मेस्सीलाही ग्लोबल ॲम्बेसेडर (जागतिक राजदूत) म्हणून साइन अप केले होते. परंतु, त्यानंतर कंपनीचा वाईट काळ सुरू झाला.

वाईट काळाला सुरुवात

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, कोरोना काळानंतर जग पूर्वपदावर आले. त्यानंतर ‘बैजूज’ची वाढ थांबली. साथीच्या रोगावरील निर्बंध, राजकीय संघर्ष व व्याजदरात होणारी वाढ यांमुळे बैजूज कंपनी अडचणीत आली. ऑनलाइन शिकवणीची मागणी कमी झाल्यानंतर कंपनीने २०२३ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. सीएनबीसीच्या म्हणण्यानुसार, त्यात जून महिन्यात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ‘सीएनबीसी’नुसार, जून २०२३ पर्यंत, फर्मला याच हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकावे लागले. ‘डेलॉइट’ आणि तीन प्रमुख बोर्ड सदस्यांनी फर्मशी संबंध तोडले. अनेक गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले. कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि प्रशासन पद्धतींबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये २०२२ ची आर्थिक माहिती भरली.

त्यातून कंपनीच्या आर्थिक स्थितीचे भयंकर चित्र समोर आले. त्यात कंपनीने शैक्षणिक व्यवसायात सुमारे २९० दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचे सांगितले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, ‘बैजूज’ने २०२३ च्याआर्थिक परिस्थितीसाठी निर्धारित केलेली डिसेंबर २०२३ ची अंतिम मुदतदेखील चुकवली. रवींद्रन यांनी गेल्या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देता यावा यासाठी कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवली होती. फेब्रुवारीमध्ये परदेशी गुंतवणूकदार आणि संस्थापक रवींद्रन बैजू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. परदेशी गुंतवणूकदारांनी रवींद्रन यांना पदच्युत करण्यासाठी मतदान केले.

आता भारतातील सर्वांत श्रीमंत व सर्वात शक्तिशाली क्रीडा संस्था ‘बीसीसीआय’नेही बैजूज कंपनीला न्यायालयात खेचले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, फर्मने २०१९ मध्ये बीसीसीआयबरोबर एक करार केला होता. ‘बीसीसीआय’ने भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील बोधचिन्हासाठी ‘बैजूज’ला प्रायोजकत्व दिले होते. ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान कंपनीने प्रायोजकत्वाचे थकलेले १९ दशलक्ष न भरल्याबद्दल कंपनीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. फर्म गेल्या काही महिन्यांपासून १.२ अब्ज मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वाटाघाटी करीत आहे. बैजूजच्या गुंतवणूकदारांनी एकामागोमाग एक काढता पाय घेतल्याने कंपनीचे संकट वाढले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, जगातील सर्वांत मोठे मालमत्ता व्यवस्थापक आणि फर्ममधील गुंतवणूकदार, ‘ब्लॅकरॉक’ने बैजूजचे मूल्य अंदाजे एक दशलक्ष डॉलर्स एवढेच ठेवल्यानंतर कंपनी आणखीनच अडचणीत आली. २०२२ मध्ये हेच मूल्य २२ दशलक्ष डॉलर्स इतके होते.

हेही वाचा : २ हजार नोकर्‍यांसाठी २५ हजार अर्ज, मुंबईत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती; भारतात बेरोजगारी वाढत आहे का?

बैजूजमधील आणखी एक गुंतवणूकदार ‘प्रोसस’ने बैजूजचे मूल्य तीन दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी केले आहे. मार्चमध्ये रवींद्रन म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना पैसे देऊ शकत नाही. कारण- कंपनी काही गुंतवणूकदारांबरोबर कायदेशीर विवादात अडकली आहे. “मला तुम्हाला कळवण्यास खेद होत आहे की, आम्ही अजूनही तुम्हाला पगार देऊ शकणार नाही. गेल्या महिन्यात भांडवलाच्या कमतरतेमुळे आम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे आणि आता निधी असूनही या प्रक्रियेत विलंब होत आहे,” असे रवींद्रन म्हणाले. एप्रिलमध्ये कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना फोनवरून कामावरून काढल्याबद्दल अनेक बातम्या आल्या होत्या. “बैजूजचे भवितव्य भारताच्या स्टार्ट-अप अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धडा आहे,” असे थिंक-टँक पॅसिफिक फोरमचे तंत्रज्ञान धोरण सहकारी व ग्रँट थॉर्नटन इंडियाचे माजी कार्यकारी संचालक विद्याशंकर सत्यमूर्ती यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How byju raveendran lost control of the ed tech firm byjus rac
Show comments