भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर इस्रो चांद्रयान-४ या सर्वात महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी तयारी करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी या मोहिमेला मंजुरी दिली आहे. चांद्रयान-४ मोहिमेसाठी २,१०४.०६ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे, या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेमुळे २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरण्याच्या भारताच्या अंतिम उद्दिष्टाचा पाया रचला जाईल. चांद्रयान-४, २०२७ मध्ये प्रक्षेपित होणार आहे. भारताच्या चंद्र संशोधन कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. काय आहे चांद्रयान-४ मोहीम? भारतासाठी या मोहिमेचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

चांद्रयान-४ मोहीम २०४० च्या मानवी मोहिमेसाठी (क्रू मिशन) महत्त्वाची का?

चंद्रावर अंतराळयान उतरवणे, नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर सुरक्षित परतणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यासह भविष्यातील क्रू मिशनसाठी आवश्यक असलेले प्रमुख तंत्रज्ञान प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चांद्रयान-३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर चांद्रयान- ४ मोहिमेच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. चांद्रयान-४ दोन टप्प्यात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्यासाठी मोहिमेत पाच अंतराळ मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत.

हेही वाचा : पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या तब्येतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?

दोन रॉकेटच्या मदतीने याचे दोन टप्प्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेत चांद्रयान-३ प्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रपोलशन मॉड्यूल तर असतीलच; मात्र त्यासह अतिरिक्त दोन मॉड्यूल असणार आहेत. ही मॉड्यूल्स चंद्रावर सुरक्षित उतरण्यासाठी, नमुने गोळा करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. आतापर्यंत केवळ अमेरिका आणि चीनसह काही मोजक्या देशांनीच हा पराक्रम केला आहे. या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून, चांद्रयान-४ २०४० मधील भारताच्या नियोजित चंद्रावरील क्रू मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या प्रणालींच्या विकासात थेट योगदान देईल.

चंद्रावर अंतराळयान उतरवणे, नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर सुरक्षित परतणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. (छायाचित्र-इस्रो/एक्स)

या मोहिमेत चंद्राच्या कक्षेत डॉकिंग आणि अनडॉकिंग, अचूक लँडिंग तंत्र आणि पृथ्वीच्या वातावरणातून अंतराळयान सुरक्षित परत येण्यासारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांचे प्रमाणीकरण करण्यात येईल. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मोहिमेच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, “चांद्रयान-४ ही मोहीम केवळ चंद्रावरील खडकांना परत आणण्यापुरती मर्यादित नाही, तर ही मोहीम माणसांना चंद्रावर पाठवण्याची आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आहे.”

महत्त्वाकांक्षी मोहीम

चांद्रयान-४ ही भारताची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये लक्षणीय प्रगतीचा भाग म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमांमधील अनेक मोहिमांना आता गती मिळणार आहे; ज्यामध्ये व्हीनस ऑर्बिटर मोहीम आणि २०३५ पर्यंत भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाच्या विकासाचा समावेश आहे. केंद्राने गगनयान मोहिमेची व्याप्ती वाढवून भारतीय अंतराळ स्थानकाच्या (BAS) पहिल्या मॉड्यूलच्या विकासालाही मान्यता दिली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळ स्थानक स्थापित करण्याकरीता बॉल रोलिंग सेट करण्यासाठी २०२८ पर्यंत आठ प्रक्षेपण करण्याच्या व्यापक मोहिमेचे आव्हान इस्रोसमोर असणार आहे.

हेही वाचा : डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?

गगनयान मोहिमेच्या यशावर या सर्व योजना अवलंबून आहेत. कारण इस्रो २०२५ पर्यंत या प्रकल्पाच्या पहिल्या अनक्युड प्रक्षेपणाची तयारी करत आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या दशकांमध्ये भारताला जगात आघाडीचे स्थान देणार आहे. इस्रोच्या प्रत्येक यशस्वी मोहिमेमुळे भारतीय अंतराळवीराच्या चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या ध्येयाच्या भारत जवळ जात आहे. भारताची अंतराळ क्षेत्रातील वाटचाल पाहता, हे ध्येय भारत लवकरच गाठेल हे नक्की.