जगभरात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. भारतातही सोन्याचे दर लाखाच्या घरात पोहोचले आहेत. अनेक देशांमधील नागरिक सोने विकायचे असल्यास सोन्यावर कर्ज देणाऱ्यांकडे पोहोचतात. सोने विकण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. परंतु, आता ही गरज संपेल, असे चित्र आहे. चीनमधील बाजारात चक्क सोन्याचे एटीएम आले आहे. आता एटीएम मशीन्स केवळ पैसे काढण्यापुरते मर्यादित राहिले नसून आता एटीएमद्वारे चक्क सोनेही विकता येणार आहे. काय आहे ही मशीन? हे अनोखे मशीन नक्की कसे कार्य करते? त्याविषयी जाणून घेऊ.

चीनमधील ‘गोल्ड एटीएम’ आहे तरी काय?

चीनच्या शांघायमधील एका शॉपिंग मॉलमध्ये आता एक एटीएम बसविण्यात आले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यास मदत करते आणि विशेष म्हणजे ही मशीन वापरण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसल्याने लोकांमध्ये ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे आणि जगभरात या मशीनची चर्चा सुरू आहे. शांघायमधील सर्वांत व्यग्र शॉपिंग सेंटरमध्ये ठेवलेल्या या एटीएमने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. हे मशीन चीनच्या किंगहूड ग्रुपने विकसित केले आहे. स्मार्ट गोल्ड एटीएम नावाचे हे मशीन सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासण, सोने वितळविणे, वजन करणे, तसेच सोन्याची शुद्धता तपासणे यांसाठी तयार करण्यात आले आहे.

या एटीएम मशीनमध्ये तीन ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि किमान ५० टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या वस्तू किंवा दागिने स्वीकारले जातात. प्राप्त माहितीनुसार, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक स्थानिक रांगेत उभे राहून वारशाने मिळालेले सोने आणि इतर सोन्याच्या वस्तूंची या एटीएमद्वारे विक्री करीत आहेत. या एटीएमचा वापर करण्यासाठी शॉपिंग सेंटरमध्ये मोठी गर्दी होत आहे. गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि मशीन वापरताना नागरिकांना मदत करणे यांसाठी कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत. कर्मचारी मशीनचा वापर करताना नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत, असे वृत्त ऑनलाइन मासिक ‘सिक्स्थ टोन’ने दिले आहे.

शॉपिंग सेंटर ग्लोबल हार्बरच्या दुसऱ्या मजल्यावर हे मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये सध्या सुरू असलेल्या सोन्याचा भावदेखील तपासला जातो आणि त्या आधारावरच व्यवसाय किंवा विक्री होते. मुख्य म्हणजे या मशीनमध्ये हा स्वयंचलित पर्याय असल्याने विक्रीची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानांसाठी हे मशीन खूपच फायदेशीर ठरणार आहे. मशीनमध्ये सोने टाकल्यानंतर ते वस्तूचे वजन करते, त्याची शुद्धता तपासते, चालू भावानुसार त्याची किंमत ठरवते व सेवा शुल्क वजा करून पैसे देते.

सोन्याची शुद्धता ठरवण्यासाठी सोने मशीनमध्ये वितळवले जाते. त्यामुळे अचूक शुद्धता कळते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एकूण २० मिनिटांचा कालावधी लागतो. मशीनमध्ये संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांच्या बँकेची माहिती भरावी लागते. तिथे असलेले कर्मचारी संपूर्ण प्रक्रिया तपासतात आणि अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार पूर्ण होतो, असे ‘सिक्स्थ टोन’ने सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात एटीएमचा वापर करण्यासाठी लोकांची गर्दी अचानक वाढली होती. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शॉपिंग सेंटरमध्ये मोठ्या रांगा लागल्या होत्या. या एटीएमचा वापर करून दररोज जवळजवळ ३० लोक सोन्याची विक्री करत असल्याची माहिती आहे. गर्दी असल्याकारणाने कर्मचारी मध्यरात्रीनंतरही थांबत होते आणि मॉल बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कॉरिडॉरमधून ग्राहकांना मदत केली जात होती. कर्मचारी सदस्य ले चुनशियांगने ‘सिक्स्थ टोन’ला सांगितले की, सुमारे ७० टक्के एटीएम वापरकर्ते हे ५० ते ७० वयोगटातील स्थानिक महिला आहेत.

तिने पुढे सांगितले, “त्या सहसा दिवसा शॉपिंग सेंटरमध्ये येतात आणि जुन्या शैलीचे सोन्याचे दागिने आणून विकतात व पैसे मिळवतात.” तिने असेही म्हटले की, अनेक जण मशीनमध्ये असलेल्या इतर पर्यायाचादेखील मोठ्या प्रमाणात वापर करतात, जसे की शुद्धतेची चाचणी करणे. या मशीनच्या एका डेमोमध्ये, ४० ग्रॅम सोन्याच्या नेकलेसला एक ग्रॅम सोन्यासाठी ७८५ युआन म्हणजेच अंदाजे ९,२०० रुपये मिळाले. त्यामुळेच अर्ध्या तासात ३६,००० युआन म्हणजेच सुमारे ४.२ लाख रुपये एटीएममध्ये जमा झाले.

लोकांनी या प्रणालीवर कशी प्रतिक्रिया दिली?

स्थानिक नागरिक झांग येवान यांनी ‘सिक्स्थ टोन’ला सांगितले, “दुकानांमध्ये अनेकदा सोन्याची प्रत्यक्ष किंमत अस्पष्ट असते आणि मला मूल्यांकनावर पूर्ण विश्वास नाही. मशीनमुळे ही प्रक्रिया कोणत्याही फेरफारशिवाय आणि पारदर्शक पद्धतीने होईल. किमतीतील फरक फार मोठा नसला तरी मी तंत्रज्ञान वापरण्यास प्राधान्य देईन.” चीनमधील सुमारे १०० शहरांमध्ये असणाऱ्या शॉपिंग सेंटर्स, ऑफिस इमारती व बँक शाखांमध्ये अशाच प्रकारच्या मशीन बसवण्यात आल्याची माहिती ‘सिक्स्थ टोन’ने आपल्या वृत्तात दिली. शांघायमध्ये लवकरच याच पद्धतीच्या आणखी मशीन्स बसवण्यात येणार आहे. कारण- नागरिकांमध्ये त्या मशीनची मागणी जोर धरत आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांची प्रतिक्रिया

एक्सवरील एका वापरकर्त्याने लिहिले, “यामुळे नक्कीच डॉलर नष्ट होईल.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ” ही प्रणाली नावीन्यपूर्ण आणि सोईस्कर आहे. चीन खरोखरच तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडत आहे आणि नवनवीन यशस्वी प्रयोग करीत आहे.” आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, “चीन अमेरिकेचा नाश करण्यास तयार आहे आणि त्यामुळे शक्य तितके सोने खरेदी करा.”

अलीकडील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूक करण्यात आणि पुनर्विक्री करण्यात लोकांचा रस वाढल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारताचाही यात समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी फेडरल रिझर्व्हमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर जागतिक किमतींमध्ये वाढ झाली. परिणामी भारतातील सोन्याच्या किमती पहिल्यांदाच प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांच्या पुढे गेल्या.