चीनमध्ये एका महिलेने दोन वेगवेगळ्या गर्भाशयातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या दुर्मीळ घटनेची चर्चा जगभरात होत आहे. ली नावाची महिला उत्तर-पश्चिम चीनमधील आहे. सप्टेंबरमध्ये शानक्सी प्रांतातील रुग्णालयात तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. जागतिक स्तरावर फक्त ०.३ टक्का महिलांना प्रभावित करणारी ही एक दुर्मीळ स्थिती आहे, ज्याला ‘युटेरस डिडेल्फीस’ म्हणून ओळखले जाते. ली नावाच्या या महिलेने एक मुलगा आणि एक मुलगी, अशा दोन निरोगी मुलांना जन्म दिला आहे. ही दुर्मीळ स्थिती नक्की काय आहे? ‘युटेरस डिडेल्फीस’ म्हणजे नक्की काय? चीनमधील प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘युटेरस डिडेल्फीस’ म्हणजे काय?

‘युटेरस डिडेल्फीस’ ही एक दुर्मीळ स्थिती आहे. या स्थितीत महिलेला एका गर्भाशयाऐवजी दोन गर्भाशये असतात. जेव्हा गर्भाशयाचा विकास होतो, तेव्हा शरीरातील म्युलेरियन नलिका एकत्रित होतात. परंतु, जेव्हा या नलिका एकत्रित होण्यात अडचणी येतात तेव्हा परिणामस्वरूप प्रत्येक नलिका स्वतंत्र गर्भाशय तयार करू शकते. अशा परिस्थितीत त्या महिलेच्या शरीरात दोन वेगवेगळी गर्भाशये तयार होतात. प्रत्येक गर्भाशयात अंडाशय आणि गर्भाशय नलिका असतात, अशी माहिती ‘WebMD’ने दिले आहे. काही प्रकरणांमध्ये ‘युटेरस डिडेल्फीस’ असलेल्या महिलांमध्ये दोन गर्भाशय ग्रीवा आणि योनीमार्गातील काही विसंगतींमुळे दोन स्वतंत्र योनीमार्गही तयार होऊ शकतात.

‘युटेरस डिडेल्फीस’ ही एक दुर्मीळ स्थिती आहे. या स्थितीत महिलेला एका गर्भाशयाऐवजी दोन गर्भाशये असतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस; हा आजार कसा होतो? याची लक्षणे अन् उपाय काय?

चीनमधील महिलेचे नेमके प्रकरण काय?

‘युटेरस डिडेल्फीस’ या परिस्थितीविषयी अनेकांना माहिती आहे. मात्र, ली हिचे प्रकरण आश्चर्यकारक होते. लीने नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करण्यात आणि वेगवेगळ्या गर्भाशयातून यशस्वीपणे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. रुग्णालयातील ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ काई यिंग यांनी ‘एससीएमपी’ अहवालात म्हटले आहे, “दोन गर्भाशयांत नैसर्गिक गर्भधारणेद्वारे गर्भधारणा होणे अत्यंत दुर्मीळ घटना आहे. अशा स्थितीची आजवर आम्ही केवळ दोनच प्रकरणे ऐकली आहेत.” यिंग यांनी पुढे लीच्या परिस्थितीची दुर्मीळतादेखील अधोरेखित केली, “ली नावाच्या महिलेने ३७ आठवड्यांनंतर दोन जुळ्या निरोगी मुलांना जन्म दिला आहे. लाखामधून एक, अशी घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. “लीने सी-सेक्शन शस्त्रक्रियेद्वारे साडेआठ महिन्यांत निरोगी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यातील मुलाचे वजन ३.३ किलोग्रॅम, तर मुलीचे वजन २.४ किलोग्रॅम आहे. ली आणि तिच्या नवजात बालकांना प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला,” असेही यिंग यांनी सांगितले.

लीने सी-सेक्शन शस्त्रक्रियेद्वारे साडेआठ महिन्यांत निरोगी जुळ्या मुलांना जन्म दिला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गर्भधारणा किती आव्हानात्मक?

‘युटेरस डिडेल्फीस’ असलेल्या महिलांसाठी गर्भधारणा विशेषतः आव्हानात्मक असू शकते. ‘मेयो क्लिनिक’च्या मते, ही स्थिती असलेल्या अनेक महिलांना गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. त्यामध्ये वारंवार गर्भपात, वेळेआधी जन्म, गर्भाचा विकास न होणे आणि प्रसूतीनंतरचे रक्तस्राव यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ली हिला यापूर्वी २७ आठवड्यांत अनिश्चित कारणांमुळे गर्भपात झाला होता. जानेवारीमध्ये ती पुन्हा गरोदर राहिल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक योजना आखली. विशेष म्हणजे बऱ्याच महिलांना हे माहीत नसते की, त्यांना ‘युटेरस डिडेल्फीस’ची समस्या आहे. कारण- या स्थितीची सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ‘मेयो क्लिनिक’च्या म्हणण्यानुसार, पेल्विक चाचणी किंवा अल्ट्रासाऊंडदरम्यान याचे निदान होऊ शकते.

हेही वाचा : समुद्राची पातळी वेगानं वाढण्याची कारणं काय? जगातील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?

काही प्रकरणांमध्ये टॅम्पन्स वापरताना अनियंत्रित रक्तस्राव झाल्यामुळे महिला वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी येतात. एका योनीमध्ये टॅम्पोन टाकल्यावर एका गर्भाशयातील रक्तस्राव थांबतो. मात्र, दुसरे गर्भाशयही मासिक पाळीचा प्रवाह निर्माण करीत असते. लीचे प्रकरणही असेच होते. बांगलादेशात २०१९ मधील अशाच एका घटनेत एका महिलेने वेळेआधी बाळाला जन्म दिल्यानंतर जवळजवळ एक महिन्यानंतर दुसऱ्या गर्भाशयातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता. चीनच्या राज्य प्रसारक टीव्हीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नोंदविलेल्या आणखी एका प्रकरणात अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील केल्सी हॅचर या महिलेने तिच्या दोन्ही गर्भाशयांतून जुळ्या मुलींना जन्म दिला होता. लीचे विलक्षण प्रकरण समोर आल्यानंतर, चिनी सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How chinese woman gave birth to twins from different wombs rac