फटाक्यांमुळे दिवाळीत होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक फटाके निर्मितीचा आदेश २०१८ मध्ये दिला होता. त्यानुसार ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ अर्थात ‘नीरी’द्वारे या पर्यावरणपूरक फटाक्यांच्या निर्मितीचे निकष निश्चित करण्यात आले. फटाके हा प्रकारच पूर्णपणे पर्यावरणपूरक असू शकत नाही. मात्र त्यातील घटकांचे प्रमाण, काही पदार्थांवर निर्बंध यांमुळे हानी काही प्रमाणात कमी होते. पर्यावरणपूरक म्हणून ओळखले जाणारे फटाके म्हणजे नेमके काय, त्यांचे निकष काय याबाबतचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय?

ज्या फटाक्यांमुळे तुलनेने वायुप्रदूषण कमी होते त्यांना पर्यावरणपूरक फटाके म्हणतात. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच दिसतात. त्यात फुलबाजे, स्काय शॉट असे प्रकार असतात. पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही मिळतात. हे फटाके पेटवल्यानंतर त्यामध्ये पाण्याचे कण तयार होतात. यामुळे फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होते. फटाके जळाल्यानंतर तयार होणाऱ्या पाण्याच्या रेणूमध्ये सल्फर आणि नायट्रोजनचे कण विरघळतात.

हेही वाचा – इस्रायलला एक लाख भारतीय मजुरांची गरज; युद्धामुळे इस्रायलवर कोणते परिणाम झाले?

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय?

सर्वोच्च न्यायालयाने बेरियम आणि प्रतिबंधित रसायनांपासून तयार करण्यात आलेल्या फटाक्यांवर नुकतीच बंदी घातली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, याविषयीचे निर्देश फक्त दिल्लीतच नाही तर प्रत्येक राज्यासाठी लागू आहेत. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. बेरियमचा वापर होत असलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. त्यामुळे फटाक्यांमध्ये प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घातक रसायने आणि घटक वातावरणात उत्सर्जित न होणे हे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशांतसुद्धा नमूद केले होते.

पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये कोणते घटक असतात?

पर्यावरणपूरक म्हणून ओळखले जाणारे फटाके हे नेहमीच्या फटाक्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येतात. नेहमी वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांपेक्षा सरासरी ३० ते ४० टक्के प्रदूषण पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे कमी होऊ शकते असा दावा विविध संशोधन अहवालांतून करण्यात आला आहे. तसेच या फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढविणारी रसायने नसतात. यामध्ये ॲल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बन वापरले जात नाही किंवा त्याची मात्रा कमी असते, त्यामुळे वायूप्रदूषणाचा धोका कमी होतो. यापूर्वी काही ठराविक संस्था या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके सहज मिळतात. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांपेक्षा थोडे महाग असतात. म्हणजे सर्वसाधारण फटाके २५० रुपये असल्यास त्याच प्रकारचे पर्यावरणपूरक फटाके ४०० रुपयांपर्यंत मिळतात.

हेही वाचा – विश्लेषण : राज्यात ‘क्रांतिकारी’ साखरेची निर्मिती?

फटाके आणि वायूप्रदूषण हे समीकरण काय?

मुंबईतील हवेचा दर्जा हा सध्या गेले काही दिवस मध्यम स्वरुपाचा आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई भागात संध्याकाळी ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्याची मुभा दिली आहे. इतर वेळी मुंबईत फटाके उडवण्यावर बंदी आहे. हवेतील धुलीकणांचे पीएम २.५ आणि पीएम १० अशा दोन आकारांत वर्गीकरण केले जाते. अडीच मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना पीएम २.५ म्हणतात तर २.५ ते १० मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना पीएम १० म्हणतात. हे कण उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे ते अगदी सहज नाकावाटे किंवा घशामधून शरीरात जातात. त्यामुळे दमा, हृदयविकार, ब्राँकायटिस आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात. फटाके उडवल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर पीएम २.५ चे कण हवेत पसरतात आणि ते दीर्घकाळ हवेतच साचून राहातात.

नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांबद्दल जागरूकता किती?

यंदा पर्यावरणपूरक फटाक्यांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, अनेकदा ग्राहकांना पर्यावरणपूरक फटाके कसे ओळखावे हे माहीत नसल्यामुळे विक्रेते घातक पदार्थ असलेल्या फटाक्यांची विक्री करतात. तसेच पर्यावरणपूरक फटाक्यांमधील घटक माहीत नसल्यामुळे ग्राहकांकडून ते नकळतपणे खरेदी केले जातात किंवा या फटाक्यांबद्दल विचारणा केली जात नाही. मात्र फटाक्यांच्या पुडक्यांवर ते पर्यावरणपूरक आहेत का, त्यातील घटक यांचा उल्लेख करणे बंधनकारक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How clean are eco friendly crackers really print exp ssb
Show comments