स्थलांतरित पक्ष्याला कुठच्या दिशेला उडायला शिकवायचे, हा प्रश्न पक्षी संवर्धकांसमोर होता. नॉर्दर्न बाल्ड आयबिस हा त्याच्या विशिष्ट काळ्या-आणि-हिरव्या पिसाऱ्यासाठी, टक्कल असलेले लाल डोके आणि लांब वक्र चोचीसाठी ओळखला जातो. युरोपमधील जंगलात या पक्ष्याचे अस्तित्त्व पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संवर्धकांसमोर हा प्रश्न होता. हे पक्षी जर्मनीमध्ये वॉल्ड्रॅप म्हणून ओळखले जातात. ज्यांनी एकेकाळी युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग व्यापला होता. १७ व्या शतकापर्यंत मोरोक्को आणि सीरियामध्ये फक्त काही वसाहती टिकून राहिल्यामुळे जंगलात त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली गेली. परंतु गेल्या दोन दशकांमध्ये, प्रजनन आणि पुनरुत्पादनाच्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. जीवशास्त्रज्ञ जोहान्स फ्रिट्झ आणि त्यांचा ऑस्ट्रियातील संवर्धक गट वाल्ड्रॅपटेम यांनी २००२ पासून मध्य-युरोपमधील पक्ष्यांची संख्या शून्यावरून जवळपास ३०० वर आणली आहे. परंतु प्राणीसंग्रहालयात वाढलेल्या आणि तिथेच जन्मलेल्या या पक्ष्यांना हिवाळ्यात कुठे स्थलांतर करावे हे सहज कळत नाही. सुरुवातीचे काही प्रयत्न अयशस्वी झाले कारण या पक्ष्यांना हिवाळ्यात योग्य ठिकाणी कुठे जावे हे समजले नाही आणि थंडीत गारठून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पक्षी संवर्धकांनी यातून बोध घेत धोरणात्मक पाऊल उचलले आहे.
पक्ष्यांबरोबर उडणे हे महत्त्वाचे
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फ्लाय अवे होम’ या चित्रपटात नायक पायलट अनाथ गुसना स्थलांतरित पक्ष्यांना मार्ग दाखवण्यासाठी एक लहान विमान चालवतो. याच चित्रपटातून प्रेरणा घेऊन वाल्ड्रॅपटेमचे शास्त्रज्ञ ‘फॉस्टर पालक’ म्हणून तरुण पक्ष्यांना लांब स्थलांतराच्या मार्गावर नेण्यासाठी अल्ट्रालाइट विमानाचा वापर करतात. प्रवासाची तयारी करण्यासाठी एका दिवसाची पिल्ले त्यांच्या जन्माच्या वातावरणातून बाहेर काढली जातात आणि त्यांच्या मानवी फॉस्टर पालकांकडे सोपवली जातात. हे मानवी पालक त्या एका दिवसाच्या पक्ष्यांशी आपले विश्वासाचे नातं तयार करतात. “आम्ही त्यांची चांगली काळजी घेतो आणि पाहतो की ते निरोगी पक्षी आहेत… तसेच, आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो,” असं बार्बरा स्टीनिंगर, वाल्ड्रॅपटेम पालक-आई, यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले.
फॉस्टर पालक विमानात बसून पक्ष्यांना प्रोत्साहन देतात. “या पक्ष्यांसह आकाशात उभं राहणं, त्यांना हवेत अनुभवणं, उड्डाणासाठी अगदी योग्य अनुभव घेणं हा जवळजवळ वेगळाच हृदयस्पर्शी आणि विलक्षण अनुभव आहे,” असं फ्रिट्झ यांनी द गार्डियनला सांगितले.
बदलत्या हवामानाचे आव्हान
सुरुवातीला, पक्ष्यांना बव्हेरिया ते मध्य इटलीमधील टस्कनीपर्यंत उडण्यास शिकवले गेले. मध्य युरोपमधील जंगली वाल्ड्रॅप्सने ऐतिहासिकदृष्ट्या उड्डाण केलेला हा मार्ग होता. २०११ साली या प्रयोगातील पहिले स्वतंत्र स्थलांतर झाले आणि त्यानंतर अनेक पक्षांनी सुमारे ५५० किमी अंतर पार केले. परंतु हवामान बदलाच्या परिणामांमुळे हे पक्षी आता हंगामाच्या उत्तरार्धात उडू लागले आहेत. यामुळे ते थंड, अधिक धोकादायक हवामानात आल्प्स पार करू शकतात आणि हवेच्या उबदार प्रवाहांच्या मदतीशिवाय वरच्या दिशेने उडू शकतात आणि त्यामुळे उडणाऱ्या पक्ष्यांना ऊर्जा वाचवण्यास मदत होते. म्हणूनच वाल्ड्रॅपटेमने गेल्या वर्षी बव्हेरिया ते दक्षिण स्पेनमधील अंडालुसियापर्यंतचा एक नवीन मार्ग सुरू केला. या वर्षीचा मार्ग अंदाजे २,८०० किमी आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३०० किमी लांब आहे. फ्रिट्झने या महिन्याच्या सुरुवातीला अप्पर बाव्हेरियामधील पॅटरझेल येथील एअरफील्डवरून ३६ पक्ष्यांच्या थव्यासह प्रस्थान केले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा प्रवास पूर्ण होईल.
अधिक वाचा: चक्क हुकूमशहा हिटलरने ‘कार’ भेट देऊ केलेला ‘हा’ भारतीय महाराजा कोण होता?
इतरांसाठी ब्लूप्रिंट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना धोका आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी आदर्श पर्यावरणीय परिस्थिती आणि निवासस्थान शोधण्यासाठी लांबचा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांना खाद्य, प्रजनन आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी, हवामानातील बदलामुळे विशिष्ट आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे स्थलांतरणाची पद्धत, मार्ग आणि वेळ दोन्ही बदलत आहे. पक्षांना नवीन वातावरण आणि परिस्थितींशी सामना करावा लागत आहे, त्यामुळे अन्न आणि निवासस्थानाच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे आणि प्रजातींमधील परस्परसंवादात व्यत्यय येत आहे. काही पक्ष्यांच्या प्रजातींनी पूर्णपणे स्थलांतर न करण्याचे किंवा ते आक्रमक प्रजाती ठरतील अशा ठिकाणी स्थलांतरित होण्याचे निवडले आहे, ज्यामुळे इतरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे नॉर्दर्न बाल्ड आयबिसचे संवर्धन लक्षणीय आहे. “आम्ही नॉर्दर्न बाल्ड आयबिससाठी विकसित केलेली ही पद्धत इतर स्थलांतरित पक्ष्यांच्या वाढत्या संख्येसाठी तातडीने उपयोगात आणणे आवश्यक आहे,” असे फ्रिट्झ यांनी द गार्डियनला सांगितले, “हा एक प्रमुख प्रकल्प आहे संवर्धनातील एक नवीन शक्यता दर्शवितो”.