मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात तीन दिवसांत १३ जणांच्या कळपातील १० वन्य हत्तींचा मृत्यू झाला आहे. एका निवेदनात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विजय एन. अंबाडे म्हणाले की, विषयुक्त कोदोच्या सेवनाने हत्तींचा मृत्यू झाला असावा. हत्तींचे लागोपाठ झालेले मृत्यू हा वनाधिकार्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. हत्तींच्या या मृत्यूचे नेमके कारण काय? कोदो मिलेट नक्की काय आहे? कोदो मिलेट विषयुक्त होण्यामागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
कोदो मिलेट म्हणजे काय?
कोदो मिलेट (पास्पालम स्क्रोबिकुलॅटम) याला भारतात कोडरा वा वरागू, असेही म्हणतात. भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड व पश्चिम आफ्रिकेत या पिकाची लागवड केली जाते. भारत कोदो मिलेट उत्पादनात जागतिक आघाडीवर आहे. मिलेटचा उगम भारतात झाला, असे मानले जाते. मध्य प्रदेश या पिकाच्या सर्वांत मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. २०२० च्या संशोधन अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. कोदो मिलेटच्या लागवडीसाठी उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेश सर्वांत योग्य आहेत. मध्य प्रदेशव्यतिरिक्त मिलेटची लागवड गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि तमिळनाडूच्या काही भागांत केली जाते. कोदो मिलेटपासून तयार होणार्या काही प्रसिद्ध पदार्थांमध्ये इडली, डोसा, पापड, चकली, लापशी व पोळी यांचा समावेश होतो.
हेही वाचा : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?
शेतकरी कोदो मिलेटची लागवड का करतात?
भारतातील अनेक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कोदो मिलेट हे मुख्य अन्न आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे पीक सर्वांत जास्त दुष्काळ प्रतिरोधक आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याचे आर्थिक मूल्यही चांगले आहे. संशोधक सांगतात की, कोदो मिलेटमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. संशोधकांचा असाही दावा आहे की, मिलेट ग्लुटेनमुक्त, पचायला सोपे, अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे आणि त्यात कर्करोगविरोधी गुणधर्मही असू शकतात. २०१९ च्या एका संशोधन अहवालामध्ये असे म्हटले आहे, “मिलेटच्या बियांच्या आवरणामध्ये आहारातील फायबरची उपस्थिती मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे; ज्याचा परिणाम ग्लुकोज व कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होतो आणि त्याचा फायदा पचनप्रक्रियेवर होतो.”
यापूर्वीही कोदो विषबाधेची प्रकरणे नोंदवण्यात आलीत का?
कोदो मिलेट विषबाधेची सर्वांत जुनी प्रकरणे १९२२ मधील भारतीय वैद्यकीय राजपत्रात आहेत. ४ मार्च १९२२ रोजी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे विषबाधेची सुमारे चार प्रकरणे नोंदवली होती आणि त्याचे तपशील सहायक शल्यचिकित्सक आनंद स्वरूप यांनी लिहिले होते. रुग्णांमध्ये एक ५० वर्षीय महिला, एक २२ वर्षांचा पुरुष आणि १२ व नऊ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता; ज्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णांना अनेक तास सतत उलट्या होत होत्या आणि थंडीमुळे ते थरथर कापत होते. त्यांनी ‘कोदोन’ (कोडो) पिठापासून तयार करण्यात आलेली भाकरी खाल्ल्याचे रुग्णांनी पोलिसांना सांगितले. सेवनानंतर तासाभराने त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते बेशुद्ध पडले.
प्राण्यांना कोडो विषबाधा झाल्याचे पहिले प्रकरण फेब्रुवारी १९२२ मध्ये आढळून आले होते. तिल्हार येथील एका जमीनदाराने सांगितले की, कोदोची भाकरी खाल्लेला त्यांचा कुत्रा आजारी पडला. कोदो मिलेट खाल्ल्याने हत्तींच्या मृत्यूचे पहिले प्रकरण १९८३ साली नोंदवण्यात आले होते. ‘कोदो पॉयजनिंग : कॉझ, सायन्स अॅण्ड मॅनेजमेंट’ या २०२१ च्या संशोधन पत्रानुसार, जेव्हा संशोधकांनी मायकोटॉक्सिन, सायक्लोपियाझोनिक अॅसिड (सीपीए)चे संबंध कोदो मिलेटशी स्थापित केले तेव्हा १९८५ मध्ये कोदो विषबाधेची कारणे प्रथम प्रकाशात आली.
कोदो मिलेट विषारी कसे होते?
वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनाच्या जर्नलमध्ये प्रकाशित २०२३ च्या संशोधन पत्रानुसार, कोडो बाजरीची लागवड प्रामुख्याने कोरड्या आणि अर्धशुष्क प्रदेशात केली जाते. परंतु, कधी कधी वसंत ऋतू आणि उन्हाळ्यासारखी विशिष्ट पर्यावरणीय परिस्थिती विषबाधेस कारणीभूत ठरते; ज्यामुळे पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या अहवालात पुढे लिहिण्यात आले आहे, “मिलेटला बुरशीजन्य संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, त्यानंतर जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग होतो. हे संक्रमण धान्य आणि चारा उत्पन्नावर विपरीत परिणाम करते. एर्गॉट हा एक परजीवी बुरशीजन्य एंडोफाइट आहे; जो गवतामध्ये वाढतो. अशा बाधित कोदो धान्याच्या सेवनाने अनेकदा विषबाधा झाल्याचे आढळून येते,” असेही अहवालात म्हटले आहे.
अभ्यासकांनी असेही नमूद केले आहे की, ‘सीपीए’मुळे प्राण्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल विकार होऊ शकतात आणि आतड्यात रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती (आरओएस) चे उत्पादन वाढवू शकते; ज्यामुळे जठरांत्रीय मार्गात जळजळ निर्माण होऊन, त्या मार्गाचे नुकसान होऊ शकते. आजारी हत्तींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही अशीच लक्षणे नोंदवली होती. संशोधकांनी उंदरांवर विषारी धान्याच्या प्रभावाची चाचणीदेखील केली आहे; ज्यात गतिशीलता पूर्णपणे कमी होण्याची लक्षणे दिसून आली.
कोदो मिलेटच्या विषबाधेवर उपचार काय?
कोदो विषबाधेच्या बाबतीत संशोधकांनी बायोकंट्रोल एजंट्सचा वापर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ दुसऱ्या जीवाशी लढण्यासाठी एखाद्या जीवाचा वापर, असा होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अनेक सूक्ष्म जंतू बुरशीजन्य विकास आणि मायकोटॉक्सिन स्राव कमी करतात. परंतु, उपचारासाठी हे पुरेसे होणार नाही. हेदेखील सुचवण्यात आले आहे, “शेतकऱ्यांनी मायकोटॉक्सिन्स लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी हर्मेटिक/हवाबंद उपकरणे लावणे आणि योग्य साठवण यांसारख्या चांगल्या कृषी पद्धती आणि कापणीनंतरचे व्यवस्थापनही योग्यरीत्या करावे. ओलसर वातावरणात बुरशी वेगाने पसरत असल्याने कापणी केलेल्या ढिगांचे पावसापासून संरक्षण करावे.”
कोदो विषबाधेमुळे आतापर्यंत किती मृत्यू झाले?
मध्य प्रदेशातील वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की २०२२ मध्ये विषारी कोदो मिलेट खाल्ल्याने एका हत्तीचा मृत्यू झाला. परंतु, कोदो मिलेटच्या विषबाधेमुळे मनुष्याचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कारण- विषबाधा झालेल्या व्यक्तींना उत्तेजक पेय, गरम चहा किंवा दूध देऊन बरे करता येते. कोदो मिलेट विषबाधेची चिन्हे आणि लक्षणे एक ते तीन दिवस टिकून राहतात.
हेही वाचा : शरीरात शिरून मांस खाणारा ‘झोंबी फंगस’ काय आहे? नवीन अभ्यासात संशोधकांना काय आढळले?
कोदो मिलेट विषारी आहे की नाही, हे कसे तपासायचे?
छत्तीसगढच्या बिलासपूर येथील कानन पेंडारी प्राणी उद्यानातील अतिरिक्त उपसंचालक डॉ. पी. के. चंदन म्हणाले, “उघड्या डोळ्यांनी हे शोधणे कठीण आहे. या वनस्पती ताज्याच दिसतात; परंतु जास्त आर्द्रता आणि इतर घटकांमुळे त्या विषारी होत असाव्यात. मिलेटला विषबाधा झाली आहे का, हे तपासण्यासाठी तुम्हाला रासायनिक ट्रेस विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९८६ च्या शोधनिबंधात म्हटले आहे की, मायकोटॉक्सिन सामान्यत: शेतीशी निगडित वस्तू आणि उत्पादनांमध्ये उपस्थित असतात. हे मिलिग्रॅम प्रमाणात आढळून येते. कोदो मिलेटमधील मायकोटॉक्सिन निश्चित करण्यासाठी क्रोमॅटोग्राफिक (मिश्रणातील घटक वेगळे करणे) क्रोमॅटोग्राफी (टीएलसी), गॅस क्रोमॅटोग्राफी (जीसी), उच्च-कार्यक्षमता लिक्विड क्रोमॅटोग्राफी (एचपीएलसी) आणि द्रव क्रोमॅटोग्राफी (मास स्पेक्ट्रोमीटर) यांसारख्या पद्धती वापरल्या जातात. परंतु, ही तंत्रे वेळखाऊ असल्याने ‘एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट असेस’ (ELISA), लॅटरल फ्लो असेस (LFAs) व बायोसेन्सर मायकोटॉक्सिन शोधण्यासाठी लोकप्रिय साधने ठरत आहेत.