अफगाणिस्तानच्या संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आघाडीचा संघ म्हणून नावारूपाला येण्याच्या दिशेने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अफगाणिस्तानने यंदाच्या स्पर्धेत गतविजेते इंग्लंड आणि पाकिस्तान या तुलनेने बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तानच्या या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अफगाणिस्तान संघाला बराच संघर्ष करावा लागला आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अस्थिर परिस्थितीत आणि तालिबान राजवटीमुळे घरच्या मैदानावर खेळण्याची कोणतीही संधी न मिळताही जबरदस्त इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.
अफगाणिस्तानचा क्रिकेट इतिहास काय आहे?
अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना १९९५मध्ये झाली. विशेष म्हणजे ही स्थापना पाकिस्तानात शरणार्थी असणाऱ्या अफगाण व्यक्तींनी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २००१मध्ये त्यांना संबंधित सदस्य म्हणून मान्यता दिली. त्यानंतर २०१३मध्ये आयसीसीने अफगाणिस्तानला सहयोगी सदस्य करून घेतले. सहयोगी सदस्य होईपर्यंत अफगाणिस्तानचे खेळाडू पाकिस्तानातील द्वितीय श्रेणीतील क्रिकेट सामने खेळत होते. पाकिस्तानात खेळल्यानंतर टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानने आशियाई स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : विश्लेषण: तरुणांमध्ये एकटेपणा वाढतोय?
अफगाणिस्तानात क्रिकेटची मैदाने किती आहेत?
अफगाणिस्तान क्रिकेटपटूंच्या दुर्दशेस येथूनच सुरुवात होते. देशात कायमची असणारी युद्धजन्य परिस्थिती आणि तणावपूर्ण वातावरण यामुळे अफगाणिस्तानात मोकळे असे मैदानच नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले सर्व सामने त्रयस्थ केंद्रांवरच खेळतो. अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा सरावदेखील असाच दुसऱ्या देशात चालतो. आता तर अफगाणिस्तानात तालिबान सरकार आले आहे. त्यामुळे तेथे मैदान सोडा, रस्त्यावरचेही क्रिकेटही खेळले जात नाही.
मग इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही अफगाणिस्तानचे क्रिकेट कसे टिकले?
अफगाणिस्तानचे क्रिकेट टिकण्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यास भारताची अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मदत झाली. त्यांच्या यशात ‘बीसीसीआय’चा वाटा नक्कीच आहे. देशातील हिंसाचाराला कंटाळून अफगाणिस्तानचे खेळाडू परदेशातच आसरा घेतात. त्यातही भारतात हे खेळाडू अनेकदा येतात आणि क्रिकेटचे धडे गिरवतात. स्टेडियम सोडा अन्य आवश्यक सुविधाही नसल्यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू भारतातच खेळणे पसंत करतात. अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय सामने भारतातच आयोजित केले गेले आहेत. त्यामुळेच २०१५ मध्ये नॉएडा येथील स्टेडियमला अफगाणिस्तानने घरचे स्टेडियम (होम पीच) केले होते. अफगाणिस्तान संघ आतापर्यंत भारतात नॉएडाशिवाय डेहराडून आणि लखनऊ येथेही खेळला आहे. भारतात खेळण्याचा हा अनुभव त्यांना यंदाच्या स्पर्धेत निश्चित फायदेशीर ठरत आहे.
हेही वाचा : अमेरिकेतील ३३ राज्यांची इन्स्टाग्राम, फेसबूकच्या ‘मेटा’ कंपनीविरोधात तक्रार, नेमके प्रकरण काय?
अफगाणिस्तानात स्टेडियम उभारण्यासाठी भारताने मदत केली होती का?
अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध मैत्रीपूर्ण असेच आहेत. तालिबान सरकार येण्यापूर्वी भारताने अफगाणिस्तानात दोन मैदाने उभारण्यासाठी पावले टाकली होती. एक मैदान कंदहार, तर दुसरे मझार ए शरीफ येथे उभारले जाणार होते. यासाठी भारत सरकारने २०१४मध्ये १० लाख डॉलरची मदत मंजूर केली होती. दोन्ही मैदानांचे काम सुरूही झाले होते. मात्र, आता तालिबानच्या हस्तक्षेपानंतर मैदानाचे काम अर्धवट राहिले आहे.
अफगाणिस्तान संघाचा प्रायोजकही भारतीय का?
२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाला प्रायोजक मिळाला नव्हता. तेव्हा माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज मोहम्मद नबीने संपूर्ण संघाचा खर्च उचलला होता. या वेळी मात्र भारतातील दूध उत्पादन क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या अमूलने अफगाणिस्तान संघाला मुख्य प्रायोजकत्व दिले आहे. गेली दोन दशके अमूल आपले उत्पादन अफगाणिस्तानात निर्यात करत आहे. या व्यवसायातून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यातूनच हा व्यवहार झाला.
हेही वाचा : लोकसभेची आचार समिती म्हणजे काय? जाणून घ्या…
तालिबान सरकारची साथ मिळते का?
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तेव्हा कुणी खेळायचेच नाही असा त्यांनी फतवाच काढला होता. ज्या देशात क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याच देशाच्या संघावर विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यावर अफगाणिस्तानातील रस्त्यांवर कमालीचा जल्लोष करण्यात आला. तालिबानला खेळ म्हणून क्रिकेट मान्य आहे, पण ते त्याच्या प्रसारासाठी हातभार लावण्यास तयार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानातील खेळाडूंचे अर्थाजन हे आयसीसी, बीसीसीआय आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडून मिळणाऱ्या निधीवर अधिक होते. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील खेळाडू जगभरातील विविध लीगमध्ये खेळत असतात. तेथील करारामुळे या खेळाडूंना आपले आर्थिक नियोजन करता येते.