आपण जेव्हा रस्त्यावर गाडी चालवत असतो, तेव्हा दुसऱ्या एखाद्या वाहनाने आपल्या वाहनाला ओव्हरटेक केलं आणि ते वाहन पुढे गेलं तर आपल्याला राग येतो. आपल्या मनात प्रश्न येतो की, आपणही आपल्या गाडीचा वेग वाढवावा आणि ओव्हरटेक करणाऱ्या चालकाला धडा शिकवावा किंवा बेजबाबदारपणे गाडी चालवत त्याच्याजवळ जावं आणि त्याच्याशी हुज्जत घालावी. खरं तर, असं करण्यात काहीही अर्थ नसतो, पण समोरच्या व्यक्तीची कृती पाहून तुमच्या वागण्यात अचानक बदल होतो. यामुळे आपल्याच जीवाला धोका निर्माण होतो. गेल्या तीन वर्षांत असे वागण्याची इच्छा अनेकांची झाल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. पण असं नेमकं का होतं? यामागे काही मूलभूत शारीरिक कारणं आहेत का? याबाबत शास्त्रज्ञांचं मत काय आहे? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…
वास्तविक, करोनामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. करोना लॉकडाऊनमध्ये लोकांना बराच काळ घरात राहावं लागलं. यामुळे कमी अधिक प्रमाणात प्रत्येकजण तणावाचा सामना करत होतं. तणावाच्या स्थितीत मानवी शरीरात ‘ओव्हरराइडिंग फंक्शन्स’ सक्रिय होतात. या दरम्यान, व्यक्ती त्याच्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध वाटेल तसं वागतो. पण त्याच्या शरीराच्या हालचाली सामान्य राहतात. जेव्हा आपण अत्यंत तणावाखाली असतो. अशा वेळी जेव्हा आपल्याला धोका जाणवतो, तेव्हा आपली ‘लिंबिक प्रणाली’ (Limbic System- मेंदूचा असा भाग जो आपल्या व्यावहारिक किंवा भावनिक प्रतिसादाशी संबंधित असतो) सक्रिय होते. यातूनच आपण भांडण करणार की सुन्न होणार? याची प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते.
मनात असे धोकादायक विचार का येतात?
जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा तार्किक वर्तन, योग्य निर्णय घेणे आणि परिणामांचा विचार करण्यासाठी जबाबदार असलेला मेंदुचा भाग निष्क्रीय ठरतो. अशा वेळी ‘लिंबिक सिस्टीम’ अतार्किक, भावनिक आणि कधीकधी आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊ लागते. जेव्हा ‘लिंबिक सिस्टीम’ खूप सक्रिय असते, तेव्हा बेपर्वा, धोकादायक गोष्टी करण्याचा विचार आपल्या मनात येतो. ही आपली इच्छा आहे म्हणून असं होत नाही. तर आपला मेंदू अशा धोकादायक क्रियांच्या परिणामांचा विचार करणं बंद करतो, म्हणून अशा प्रकारचे विचार मनात येतात. ज्याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो.
मनाच्या या अवस्थेमुळे लोकांच्या दैनंदिन कामकाजात आणि निवडींमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे जेव्हा ‘लिंबिक सिस्टीम’ पूर्णपणे सक्रिय असते, तेव्हा ती कमी करणे किंवा इतर पर्यायांचा विचार करणं फार कठीण असतं. कोविडच्या काळात लोकांना भेटण्यावर अनेक मर्यादा होत्या. अशा वेळी एखादी संधी मिळाली, तर लोक परिणामांची चिंता न करता लोकांना भेटण्यासाठी बाहेर पडत असत. लोकांमध्ये वाढलेल्या मानसिक तणावपूर्ण स्थितीमुळे अशा घटना घडतात.
२९ वर्षंपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांचा रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू
एका अभ्यासानुसार, लोक नेहमी आनंददायी अनुभवाच्या शोधात असतात. त्यांना एखादी संधी मिळाल्यास ते जोखीम पत्करण्यास तयार असतात. तसेच वाहन चालवण्याचा कमी अनुभव असणे, हाही तरुणांचे सर्वाधिक अपघात होण्यामागील महत्त्वाचं कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मानवी मेंदूचा पूर्ण विकास वयाच्या २५ वर्षांनंतर होतो. जगभरातील १० ते २९ वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण रस्ते अपघात आहे. एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी जवळपास तीन चतुर्थांश (७३ टक्के) मृतांमध्ये २५ वर्षाखालील तरुणांचा समावेश आहे.
असे अपघात रोखण्याचे उपाय काय आहेत?
दुसर्या चालकावर ओरडण्यापूर्वी किंवा त्याला ओव्हरटेक करण्याआधी ‘लिंबिक प्रणाली’शी संबंधित जोखीमेबाबत काही सेकंद आधी विचार करावा. यामुळे तुम्ही कठीण परिस्थितीतून स्वत:ला वाचवू शकता. एखादे वाहन तुमच्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असेल, तर तुम्ही तुमचे मन शांत ठेवावं. त्याच्या पुढे जाण्याचा किंवा त्याच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करू नये.