हवामानातील बदलामुळे वातावरणात अनेक अनैसर्गिक बदल पाहायला मिळत आहेत. जगाच्या काही भागांत भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे; तर काही भागांत पूर परिस्थितीचे चित्र आहे. आता सौदी अरेबियाच्या वाळवंटात पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली आहे. सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिमुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव झाला आहे. सौदी प्रेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या अल-जॉफ प्रदेशाच्या काही भागांत मुसळधार पाऊस आणि लक्षणीय गारपीट झाली आहे. आता, या वाळवंटी प्रदेशाला बर्फवृष्टीने झाकले आहे. या रखरखीत प्रदेशात यापूर्वी कधीही न पाहिलेले दृश्य आता पाहायला मिळत आहे. तापलेल्या वाळवंटात बर्फवृष्टी होण्याची कारणे काय? या बदलामागचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
वाळवंटातील वाळूवर बर्फाची चादर
सौदी अरेबियामध्ये गेल्या आठवड्यापासून असामान्य हवामानाचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या बुधवारी राज्याच्या अल-जॉफ प्रदेशाच्या उत्तरेकडील सीमा, रियाध व मक्का या प्रदेशांत मोठ्या प्रमाणात गारांसह मुसळधार पाऊस पडला. ‘वॉचर्स डॉट न्यूज’च्या म्हणण्यानुसार, विचित्र हवामानाचा असीर, ताबुक व अल बहा या भागांवरही परिणाम झाला आहे. सोमवारी झालेल्या हिमवृष्टीने अल-जॉफच्या पर्वतीय भागांना आच्छादित केले. वातावरणातील या असामान्य बदलांनी स्थानिकांनाही धक्का बसला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रस्ते आणि दर्यांवर मोठ्या प्रमाणात गारा जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वापरकर्त्यांनी दावा केला की, वादळामुळे या प्रदेशात धबधबे आणि बर्फाच्या नद्यादेखील निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा : विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?
हिमवर्षाव होण्यामागील कारण काय?
‘यूएई’च्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (एनसीएम) सांगितले की, अरबी समुद्रापासून ओमानपर्यंत पसरलेली कमी दाबाची प्रणाली या असामान्य घटनेस कारणीभूत आहे. या हवामान पॅटर्नमुळे आर्द्रतेने भरलेली हवा सामान्यत: वातावरणात कोरडेपणा निर्माण करते; ज्यामुळे सौदी अरेबिया आणि शेजारील संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये गडगडाटी वादळे, गारपीट आणि पाऊस पडतो. ‘खलीज टाइम्स’च्या मते, एनसीएमने येत्या काही दिवसांत अल-जॉफच्या बहुतेक भागांमध्ये संभाव्य वादळांबाबतचा इशारा दिला आहे आणि मुसळधार पाऊस व गारांचीही शक्यता वर्तवली आहे; ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त या वादळांसह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज आहे. राज्याचे नागरी संरक्षण महासंचालनालय (डीजीसीडी) आणि ‘एनसीएम’ने रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
वाळवंटात पहिल्यांदाच बर्फ पडल्याची घटना घडली आहे का?
सौदी अरेबियामध्ये हिमवर्षाव दुर्मीळ आहे; परंतु ही घटना पहिल्यांदाच घडली, असे नाही. काही वर्षांपूर्वी ५८ अंश सेल्सिअस तापमान असणार्या सहारा वाळवंटाचे तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते; परिणामी त्या भागात अनपेक्षित हिमवर्षाव झाला. हवामान बदलाचे व्यापक प्रभाव या दुर्मीळ घटनेसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. जागतिक बँकेच्या मते, पश्चिम आशिया हा भाग हवामान-संबंधित प्रभावांसाठी सर्वांत असुरक्षित प्रदेशांपैकी एक आहे. वाढत्या सरासरी तापमानामुळे या प्रदेशात हवामानाचे स्वरूप बदलल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांनी असेही सुचवले आहे की, जागतिक हवामान बदलामुळे वाळवंटात होणार्या बर्फवृष्टीसह अशा असामान्य हवामानाच्या घटना वारंवार घडत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये मुसळधार पाऊस पडला; ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. दुबईतील पुराच्या घटनेनंतर लगेचच ही घटना घडली. या विसंगती आता अधिक सामान्य झाल्या आहेत. आखाती देशांनी या हवामानाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी मजबूत धोरणे विकसित करण्यावर आणि त्यांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.