गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कुशीनगरमध्ये युद्धाला सुरुवात झाली. गौतम बुद्धांच्या शरीर धातूचे रक्षण करणाऱ्या मल्लांविरोधात शेजारील राज्ये, सरदार एकत्र आले होते. बुद्ध धातूवर नक्की कोणाचा अधिकार, हा प्रश्न युद्धासाठी कारणीभूत ठरला. शेवटी द्रोण नावाच्या पुजाऱ्याने पुढाकार घेत या संघर्षावर उपाय शोधला. हा उपाय इतिहासात ‘बुद्धधातू मुत्सद्देगिरी’ म्हणून ओळखला जातो. जी आजही कायम आहे. बुद्धधातू भारत आणि जगाच्या इतर भागात नेण्यात आले, त्याचबरोबर बौद्ध धम्माचाही भारताबाहेर प्रसार झाला. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात पुरातत्त्व या विषयाची पायाभरणी केली, यानंतर झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अनेक बौद्ध स्तूप आणि स्थळांचा शोध घेतला गेला. यात सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे योगदान मोलाचे ठरले. बौद्ध साहित्यात नमूद केलेल्या स्तुपांचा-स्थळांचा त्यांनी प्रत्यक्ष त्या जागी भेट देऊन शोध घेतला. त्यामुळे इतिहासातील एक अज्ञात पर्व जगासमोर उलगडण्यास मदत झाली.
अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?
‘ट्रॅव्हेलिंग रेलिक्स: स्प्रेडिंग द वर्ड ऑफ द बुद्धा’
डॉ. हिमांशु प्रभा रे प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धधातूच्या पुनर्शोधाची माहिती देणारे एक प्रदर्शन दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या (IIC) क्वाड्रँगल गार्डनमध्ये भरविण्यात आले आहे. ‘ट्रॅव्हेलिंग रेलिक्स: स्प्रेडिंग द वर्ड ऑफ द बुद्धा’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. या प्रदर्शनात गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बांधण्यात आलेल्या इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील बुद्धधातू असलेल्या स्तूपापासून १९ व्या- २० व्या शतकात या बुद्धधातूंचा घेतलेल्या शोधाचा प्रवास दर्शवण्यात आला आहे. यात नकाशे, बौद्ध पुरातत्त्वीय स्थळांची छायाचित्र, गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारी कथापटलं (नॅरेटिव्ह पॅनल) यांचा समावेश आहे. पुरातत्त्वशास्त्राच्या साधनांचा वापर करून अवशेष आणि स्तूपांच्या शोधामुळे भारतातील बौद्ध धम्माच्या इतिहासात महत्त्वाचा बदल घडून आला. पिप्रहवा येथे बुद्ध धातू सापडले, तर नागार्जुनकोंडा येथे, पुरातत्वशास्त्रज्ञांना मोती असलेली एक सोन्याची नळी, दातांचे अवशेष असलेले दगडाचे भांडे, आणि सोन्या-चांदीने तयार केलेला अस्थिकुंभ सापडला.
बौद्धधातू मुत्सद्देगिरी
या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलेल्या वस्तू या केवळ ऐतिहासिक कालखंडापुरत्याच मर्यादित नाहीत. किंबहुना त्यांचे आजच्या काळातील महत्त्व राजकीय मुत्सेद्देगिरीच्या रूपात अधोरेखित होते. या महिन्याच्या सुरुवातीला, भारतातून बुद्ध आणि त्यांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र धातू २६ दिवसांच्या सार्वजनिक पूजेसाठी थायलंडमध्ये पाठविण्यात आले. “बौद्धधातू मुत्सद्देगिरीसाठी वापरले जातात, बहुतेक वेळा सियाम (आता थायलंड) सारख्या बौद्ध देशांना दिले जातात. ते विशेषत: आग्नेय आशियातील राजकीय शक्ती आणि अधिकाराशी देखील संबंधित आहेत,” असे २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रे म्हणाल्या. ब्रिटिशकालीन पुरातत्त्वामुळे बौद्ध इतिहासाविषयी जागरूकता निर्माण झाली. त्यामुळे बौद्धधातू हे केवळ स्तुपातच राहावे असा आग्रह केला गेला. १९ व्या शतकात बौद्ध धम्माचा जो इतिहास लिहिला तो यापूर्वी कधीही लिहिला गेला नव्हता.
अधिक वाचा: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !
बुद्धधातूंचा प्रवास आणि भारतीय पुरातत्त्व
बौद्ध पुरातत्त्वीय स्थळांवर मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्यामुळे बौद्ध धम्माविषयीची समज अधिक वाढली. महाराजा रणजित सिंग यांच्या पंजाब दरबारातील जनरल (इटालियन सैनिक) जीन-बॅप्टिस्ट व्हेंचुरा यांनी १८३० साली (सध्याच्या पाकिस्तानातील) माणिक्याला बौद्ध स्तूपाच्या उत्खननासाठी वैयक्तिकरित्या निधी दिला. त्यांना अलेक्झांडर किंवा त्याच्या घोड्याशी संबंधित अवशेष शोधायचे होते. परंतु त्याऐवजी बुद्धधातू उजेडात आले. त्यानंतर, रावळपिंडी शहराजवळ इस्लामाबादपासून ३६ किमी आग्नेयेला इतर १५ पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेतला गेला. या शोधामुळे भारतीय इतिहासातील एक अज्ञात पान उलगडले गेले. १८९१ साली श्रीलंकेतील बौद्ध कार्यकर्ते आणि थिऑसॉफिस्ट अनगारिका धम्मपाल यांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाला एकत्र आणण्यासाठी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी पुन्हा एकदा बौद्धधातूंनी या एकत्रिकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
प्रदर्शनातील एका छायाचित्रात १९४९ साली इंग्लंडमधून सांचीचे अवशेष कलकत्ता (आताचे कोलकाता) बंदरात परत आल्याचे दाखवले आहे, ज्यात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी आहेत. डॉ. रे हे बौद्धधातू परत आणणे ही स्वतंत्र भारताची यशोगाथा मानतात. नागार्जुनकोंडा येथील पुरातत्त्वीय स्थळ हे धरणाच्या प्रकल्पामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे हा प्रकल्प उभा राहण्यापूर्वी १९५४ ते १९५९ या कालखंडात पंतप्रधान नेहरू यांनी या ठिकाणी उत्खनन करण्यास परवानगी दिली. भारत सरकारने जागेचे उत्खनन होईपर्यंत धरणाचे काम स्थगित केले. या ठिकाणी उत्खननात २० अस्थिकुंभ, मातीची भांडी, अस्थिरक्षा आणि मोती असलेली सोन्याची नळी सापडली. भिक्खू आणि भिक्खुनी यांनी बौद्ध धातूंबरोबर प्रवास केला. प्रवासा दरम्यान ते ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी स्तूप उभारले. IIC मधील प्रदर्शनांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील द्रास ते तामिळनाडूमधील कावेरीपट्टीनम आणि गुजरातमधील जुनागढ ते आसाममधील सूर्य पहारपर्यंत भारतातील बौद्ध स्थळे दाखवणारा नकाशा आहे.
अधिक वाचा: Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!
बौद्ध धम्माचा प्रभाव
बौद्ध स्थळांवर, विशेषत: सारनाथ येथील उत्खननाने स्वातंत्र्योत्तर भारतावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. त्या वेळी सापडलेल्या महत्त्वपूर्ण रचनांपैकी एक सारनाथ होते, वाराणसी येथील प्राचीन मूलगंधा कुटी विहारामध्ये गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश (प्रवचन) केला होता, असे मानले जाते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात अशोक स्तंभाचे सारनाथ येथे उत्खनन करण्यात आले. या स्तंभावर असलेले धम्मचक्र हे भारताचे राष्ट्रीय चिन्हे म्हणून समाविष्ट केले गेले. डॉ. रे यांच्या मते सारनाथ हे अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. या स्थळाने भारतातील राजकीय विचारप्रणालीला आकार दिला. नंदलाल बोस यांच्या संविधानातील २२ चित्रांमध्ये मौर्य सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसार करणाऱ्या प्रतिमा आणि बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या उपदेशाचे चित्रही समाविष्ट आहेत. एकूणच आपल्या संविधानाच्या निर्मितीवर बौद्ध पुरातत्त्व आणि इतिहासाचा हा प्रभाव आहे.