भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांना आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांतील पाच सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले, असे म्हणायला हरकत नाही. तशात इंग्लिश ड्रेसिंगरूममध्ये मतभेद असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाते. इंग्लंडच्या या निराशाजनक कामगिरीचे कारण काय आहे, संघावर विश्वचषकासारख्या स्पर्धेत अशी नामुष्की का ओढवली, याचा घेतलेला हा आढावा.

नामांकित फलंदाजांकडून निराशा…

भारतीय खेळपट्ट्यांवर एकीकडे फलंदाज खोऱ्याने धावा काढत असताना इंग्लंडच्या फलंदाजांना मात्र छाप पाडण्यात अपयश आले. इंग्लंड संघाकडून सलामीवीर डेव्हिड मलानने सहा सामन्यांत २३६ धावा केल्या आहेत. इतर फलंदाजांना मात्र लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सलामीवीर जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, कर्णधार जोस बटलर आणि अनुभवी जो रूट यांनी सपशेल निराशा केली. रूट, ब्रूक, बटलर आणि बेअरस्टो यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तरीही त्यांना विश्वचषक स्पर्धेत धावा करताना अडचणी येताना दिसत आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मलान १५व्या स्थानी आहे. तो इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यावरून इंग्लंडच्या संघाची अवस्था समजू शकते.

maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?

हेही वाचा… विश्लेषण: वाघांची संख्या वाढतेय… पण मृत्यूंचे प्रमाणही का वाढतेय? परिस्थिती आटोक्यात कधी येणार? 

अष्टपैलू खेळाडूंना अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश…

गेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या जेतेपदात निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या बेन स्टोक्सने या वेळी मात्र निराशा केली. तो या स्पर्धेत केवळ फलंदाज म्हणून खेळत असल्याचा इंग्लंडला फटका बसला आहे. सॅम करनला काही सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लिआम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली हे चांगले अष्टपैलू खेळाडू संघाकडे असताना काही सामने वगळता त्यांना छाप पाडता आली नाही. शीर्ष फलंदाजी फळीने निराशा केल्यानंतर इतके चांगले अष्टपैलू खेळाडू असतानाही त्यांना संघाला अडचणीच्या स्थितीकडून बाहेर काढणे जमले नाही.

इंग्लंडची गोलंदाजीही बोथट…

मुळातच अष्टपैलू अधिक असल्याने संघाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत फिरकीपटू आदिल रशीद व मार्क वूड या प्रमुख गोलंदाजांवर संघाची मदार होती. या दोन्ही गोलंदाजांना निर्णायक क्षणी प्रभाव पाडता आलेला नाही. वोक्स, विली यांनी काही सामन्यांत संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात त्यांना अपयश आले. तसेच भारतीय खेळपट्ट्यांमधून वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. मोईन अली ‘आयपीएल’मध्ये सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. मात्र, रशीदला म्हणावी तशी साथ त्याच्याकडून मिळाली नाही. एकीकडे भारतासह इतर संघांचे गोलंदाज स्पर्धेत छाप पाडत असताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी निराशा केली.

इंग्लंडला गेल्या विश्वचषक स्पर्धेत कसे मिळाले विजेतेपद?

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे २०१५मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे सुरुवातीच्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. या अपयशानंतर इंग्लंडच्या संघाने मॉर्गनला कर्णधार म्हणून स्वातंत्र्य दिले. २०१९ पर्यंत इंग्लंडने तब्बल ८८ एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी ३० हून अधिक खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. यानंतरच विश्वचषकासाठीचा संघ निवडण्यात आला. या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेपूर्वी जास्तीतजास्त एकदिवसीय सामने खेळले होते. २०१५ ते २०१९ यादरम्यान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने १५ द्विपक्षीय मालिका जिंकल्या. त्यामुळे घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघ अग्रस्थानी होता. तसेच संघातील खेळाडूंना चांगला सरावही मिळाला होता. तसेच सर्व खेळाडूंना आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता होती. त्याचा फायदा संघाला जेतेपद मिळवताना झाला.

संघातील वातावरणाबाबत इयॉन मॉर्गन काय म्हणाला?

इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन म्हणाला. मात्र, संघातील वातावरण चांगले असल्याचे इंग्लंडचा अष्टपैलू लिआम लिव्हिंगस्टोनने सांगितले. ‘‘संघातील प्रत्येकजण मॉर्गनचा आदर करतात. मात्र, संघातील वातावरण चांगले असून सर्वांच प्रयत्न कामगिरी उंचावण्याचा आहेत,’’ असे लिव्हिंगस्टोन म्हणाला. २०१९मध्ये मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. मात्र, संघात सर्व काही सुरळीत नसल्याचे मॉर्गनला वाटते. ‘‘सर्वांना इंग्लंड संघाकडून अपेक्षा होत्या, मात्र आतापर्यंतची कामगिरी पाहता त्यांना अपेक्षापूर्ती करता आलेली नाही. नक्कीच संघात सर्व काही सुरळीत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी सामने गमावले आहेत, ते नक्कीच प्रश्न उपस्थित करणारे आहेत,’’ असे मॉर्गन म्हणाला.

एकदिवसीय क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे इंग्लंडला फटका?

२०१९चा विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले. त्यांच्या मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या संघांसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमले. कसोटीची जबाबदारी न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅककलमकडे देण्यात आली. तर एकदिवसीय संघाचे प्रशिक्षकपद मॅथ्यू मॉट यांच्याकडे सोपवण्यात आले. तेव्हा इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा ही इयॉन मॉर्गनकडे होती. यानंतर मॉर्गनने २०२२च्या मध्याला निवृत्ती घेतली. यानंतर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जोस बटलरवर आली. बटलरच्या नेतृत्वाखाली संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्येही संघ आपली ही लय कायम राखेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला होता. यादरम्यान इंग्लंडचा तारांकित अष्टपैलू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यातच जोफ्रा आर्चर दुखापतीतून वेळेत सावरला नाही. २०२३मध्ये इंग्लंडमध्ये ॲशेस मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेमुळे इंग्लंडला एकदिवसीय क्रिकेटकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्यांना विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध चार आणि आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायला मिळाली. स्टोक्सने यानंतर आपली निवृत्ती मागे घेतली. त्यामुळे संघाला विश्वचषकापूर्वी म्हणावी तशी लय मिळाली नाही. २०१९ ते २०२३ यादरम्यान इंग्लंडने केवळ ४२ एकदिवसीय सामने खेळले. तसेच चार वर्षांत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जेसन रॉयला विश्वचषक संघातून वगळण्यात आले. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने केवळ १३ खेळाडू वापरले. या वेळी मात्र सुरुवातीच्या चार सामन्यांतच सर्व खेळाडूंना संधी देण्यात आली. यावरून संघाची स्थिती समजते.