-अनिल कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यम विश्लेषक असल्याचा आणि अनेक बडे नेते व अधिकाऱ्यांशी निकटचे संबंध असल्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील अजित पारसे याने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. त्याचे फसवणुकीचे कारनामे थक्क करणारे आहेत. कोण आहे हा अजित पारसे हे जाणून घेण्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

सायबर तज्ज्ञ व पारसे याचा संबंध काय?

मूळचा नागपूरचा असलेला पारसे सायबर पोलिसांकडून मिळालेली माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करून स्वतःला सायबर तज्ज्ञ समजायला लागला होता. बारावीपर्यंत शिकलेल्या पारसेकडे सायबर गुन्हेगारी किंवा माहिती व तंत्रज्ञानासंबंधातील कोणतीही पदवी किंवा पदविका नाही. तो नोकरीच्या शोधात काही महिने पुण्यात राहिला तर काही महिने हैदराबादमध्ये भावाकडे राहिला. हैदराबादवरून नागपुरात परत आल्यानंतर त्याने आपण समाजमाध्यम विश्लेषक असल्याचे सांगणे सुरू केले. 

पारसे कसा आला नावारूपास ?

लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून पारसेने अनेक क्लृप्त्या केल्या. त्यासाठी त्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत एका प्राध्यापकाला हाताशी धरले. संशोधनासाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधीचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) मिळवून देण्याचे त्याला आमिष दाखवले. त्याला बळी पडत प्राध्यापकाने त्याला आपल्या संस्थेचे सचिवपद दिले. त्या माध्यमातून नागपुरातील काही संघटना, सामाजिक संस्था, व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, प्राध्यापक, संस्थाचालक आणि धनाढ्यांमध्ये ओळख वाढवली. तसेच प्राध्यापकाने नागपुरातील मोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्याची ओळख करून घेतली. या माध्यमातून अजितने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले. पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधीचा मदत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक डॉक्टर्स, प्राध्यापक, संस्थासंचालक आणि बेरोजगार युवकांची फसवणूक केली. 

फसवणुकीची पद्धत कोणती?

लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अजित पारसेने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च केले. शहरातील चौकात बँनर्स लावले. वर्तमानपत्रातून स्वत:च्या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळवून घेतली. त्यातून त्याचे नाव झाले. नंतर पारसेने बडकस चौकातील डॉ. राजेश मुरकुटे यांना पीएमओ कार्यालयातून होमिओपॅथी महाविद्यालय काढण्यासाठी कोटींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली २ कोटी घेतले. सीबीआयची कारवाई थांबवण्याच्या नावाखाली दीड कोटी आणि दत्तक मुलीबाबत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक कोटी रुपयांची खंडणी उकळली. अनेकांना सीएसआर फंड मिळवून देण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. एकाही संस्थेला त्याने अद्यापर्यंत निधी मिळवून दिला नाही. 

राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केला का?

पारसेने नागपुरातील प्रमुख नेत्यांशी सलगी असल्याचे चित्र जनमानसात निर्माण केले. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. कालांतराने त्याने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवला. नेत्यांशी सलगी असल्याचे दर्शवल्याने पोलीसही त्याला विशेष वागणूक देऊ लागले. नेत्याकडून काम करून देण्याच्या नावाखाली पैसेही उकळायला लागला. नेत्यांचा मध्यस्थ म्हणूनही पारसेकडे पाहिले जात होते. नेत्यांच्या नावांचा वापर करून त्याने अनेकांना गंडाही घातला. त्याच्या कारनाम्याची माहिती झाल्यावर एका नेत्याने त्याची कानउघाडणी करून घरी येण्यास मज्जाव केला.

फसवणुकीसाठी ‘हनिट्रॅप’ हे मुख्य अस्त्र होते का?

अजित पारसे नेहमी मुंबई-दिल्लीतील महागड्या हॉटेल्स आणि बारमध्ये दिसत होता. त्याने नागपूरसह अन्य शहरातील अनेक तरुणी, विवाहित महिला, उच्चपदस्थ विवाहित महिलांना जाळ्यात ओढले होते. राज्यातील अनेक डॉक्टर, प्राध्यापक, व्यापारी, नेतेपुत्र आणि धनाढ्य व्यक्तींना हेरून त्यांना पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधीचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली दिल्लीत न्यायचा. तेथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन तेथे विदेशी तरुणींशी मौजमजा करायला लावायचा. त्यांचे छायाचित्र काढायचा. त्यानंतर ते छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची आणि कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करायचा. त्याला दारू आणि बारबालांवर पैसे उडवण्याचीही सवय होती.  

पारसेवर आतापर्यंत काय कारवाई झाली?

अजित पारसेविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ. मुरकुटे यांची तब्बल साडेचार कोटींनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याने शहरात वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या एम. वझलवार या संस्थेच्या संचालकाची लाखो रुपयाने फसवणूक केली. त्यासंदर्भात अंबाझरी पोलीस ठाण्यात पारसेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पारसेची ६ बँक खाती आणि लॉकर्स सील केले. त्याच्यासह कटात सहभागी नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि साथीदारांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

पोलिसांची भूमिका सौम्य का?

अजित पारसेने जवळपास सर्वच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देताना फोटो काढले आहेत. ते फोटो फेसबुक, इंस्टाग्राम आणि अन्य समाजमाध्यमांवर पोस्ट केले. त्यामुळे सायबर गुन्ह्यात पोलीस पारसेची मदत घेतात, यावर लोकांचा विश्वास बसला. मात्र, त्याची फसवणुकीची प्रकरणे समोर आली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, महिनाभरानंतरही त्याला अटक करण्याची हिंमत पोलिसांना दाखवता आली नाही. त्यामुळे पोलीस पारसेंबाबत सौम्य भूमिका घेत आहेत का, असा संशय निर्माण झाला आहे.

बेरोजगारांना कसा फसवायचा ?

अजित पारसेने राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून अनेक तरुण-तरुणींना महामेट्रो, रेल्वे, सिंचन विभाग, पोलीस, राज्य राखीव दल, शिक्षक आणि तलाठी अशा शासकीय विभागात नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेतले. त्या पैशातून त्याने महागड्या कार, विदेशी दुचाकी, सदनिका आणि सुपर बाजारासह अन्य व्यवसायाला सुरुवात केली. तरुणींना पैसे परत करण्याच्या बहाण्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. परंतु, अजित पारसेने कमावलेला काळा पैसा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही, हे विशेष.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did honeytrap scamster ajit parse manage to trick many amass millions and evade the law in nagpur print exp scsg