कालच आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली. या चॅम्पियनशिपचे आयोजन थायलंडची राजधानी बँकॉक येथे करण्यात आले होते. २५ व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा मॅस्कॉट हे ‘भगवान हनुमान’ होते. ही चॅम्पियनशिप मूलतः दोन वर्षांच्या अंतराने आयोजित केली जाते. परंतु करोनाच्या साथीमुळे २०२१ साली ही स्पर्धा रद्द करण्यात आली. दर खेपेस या चॅम्पियनशिपच्या मॅस्कॉटची निवड यजमान देश करतो. यावर्षीच्या चॅम्पियनशिपचे यजमानपद हे थायलंडकडे होते. कधीकाळी भारतीय संस्कृतीचा भाग असलेल्या थायलंडमध्ये आजही हनुमान ही देवता लोकप्रिय आहे. त्यामुळेच या वर्षीच्या चॅम्पियनशिपसाठी थायलंडकडून मॅस्कॉट म्हणून हनुमानाची निवड करण्यात आली. हनुमान हे रामभक्त आहेत, त्यांच्या रामभक्तीत झळकणारी गती, शक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता विलक्षण आहे. स्थिर निष्ठा आणि भक्ती या त्यांच्या शक्ती आहेत. तर आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा लोगो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कौशल्याचे, परिश्रमाचे, खेळाप्रतीच्या समर्पणाचे प्रतिनिधित्त्व करतो, त्यामुळेच या स्पर्धेसाठी मॅस्कॉट म्हणून ‘हनुमाना’ची निवड करण्यात आली, असे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मॅस्कॉट म्हणजे नक्की काय? हे जाणून घेणे रंजक ठरावे.
मॅस्कॉट म्हणजे नक्की काय?
आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या मैदानात अनेकदा वेगवेगळ्या वेशभूषा केलेले कलाकार पाहतो. कधी कोणी एखाद्या प्राण्याच्या स्वरूपात असतो तर कधी शस्त्रधारी योध्याच्या रूपात असतो, त्यांची वेषभूषाही साधी नसून भव्य दिव्य असते. यांना मॅस्कॉट असे म्हटले जाते. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांना १९३२ पासून मॅस्कॉटची परंपरा आहे. मॅस्कॉट म्हणजे शुभ चिन्ह. मॅस्कॉट या शब्दाचे मराठी भाषांतर शुभंकर- शुभ घडविणारा असे करण्यात येते. सार्वजनिक ओळख असलेल्या गटाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी ज्या शुभ चिन्हाचा वापर केला जातो, त्यास मॅस्कॉट असे म्हणतात. काही संस्कृतींमध्ये पारंपारिकरित्या मॅस्कॉट चिन्हांना नशीब-शुभ आणणारे/ घडविणारे समजले जाते. या चिन्हांमध्ये मानवी आकृती, प्राणी, पक्षी किंवा इतर सांस्कृतिक वस्तूंचा समावेश होतो. शाळा, क्रीडा संघ, सामाजिक संस्था, लष्करी युनिट किंवा एखादा ब्रॅण्ड आपली सार्वजनिक ओळख व्यक्त करण्यासाठी अशा स्वरूपाच्या चिन्हांचा उपयोग करतात. अशा स्वरूपाच्या मॅस्कॉट किंवा शुभंकरांचा वापर क्रीडा संघांचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. शुभ घडविणे हा या मॅस्कॉटच्या मागील पारंपरिक हेतू असला तरी आधुनिक जगात या मॅस्कॉटस् च्या वापरामागे मार्केटिंग-जाहिरात हा उद्देश असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. खेळाच्या संघांशी संबंधित हे शुभंकर बहुतेक वेळा त्या संघाच्या नावाने ओळखले जातात.
अधिक वाचा: हिंदू पंचांगाप्रमाणे येणारा अधिक मास कसा ठरतो?
मॅस्कॉट शब्दाचा अर्थ काय?
‘Mascot’ हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Mascotte’ पासून आला आहे. ‘Mascotte’ म्हणेज भाग्यशाली वस्तू असा आहे. या शब्दाचा उपयोग घरामध्ये नशीब आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे वर्णन करण्यासाठी केला जात असे. या शब्दाची प्राथमिक नोंद १८६७ सालात करण्यात आली होती. तसेच १८८० साली एडमंड ऑड्रन या फ्रेंच संगीतकाराने लिहिलेल्या ‘ऑपेरा ला मॅस्कॉट’ मुळे हा शब्द प्रयोग लोकप्रिय झाला. तसेच १८८१ साला पासून इंग्रजी भाषेमध्ये हा शब्दप्रयोग करण्यात येवू लागला. इंग्रजी भाषेत वापरण्यात येणारा ‘Mascot’ हा शब्द एखाद्या जिवंत प्राण्याचा/ मानवाचा लोगो किंवा चिन्ह म्हणून वापर करण्यासंदर्भात वापरण्यात येत होता. परंतु काही अभ्यासकांच्या मते पूर्वी फ्रान्स मध्ये मॅस्कॉट हा शब्द अपशब्द अथवा शिवी म्हणूनही लोकांना ज्ञात होता. जुगाऱ्यांमध्ये या शब्दाचा प्रयोग प्रचलित होता. काही अभ्यासकांनुसार हा शब्द ‘masco’ (मास्को) या शब्दापासून व्युत्पन्न झाला आहे ज्याचा अर्थ जादूगार किंवा चेटकीण असा होतो. १९ व्या शतकापूर्वी, ‘मॅस्कॉट’ हा शब्द अचेतन वस्तूंशी संबंधित होता ज्यामध्ये सामान्यतः केसांचा शेपटा/ बटा किंवा नौकानयन जहाजावरील फिगरहेड सारख्या गोष्टींचा समावेश होत होता. त्यानंतर मात्र नशीबवान वस्तूंसाठी या शब्दाचा वापर करण्यात येवू लागला.
क्रीडा क्षेत्रात वापरण्यात येणारे मॅस्कॉट
सुरुवातीला क्रीडा संस्थांनी वेगवेगळ्या प्राण्यांना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘मॅस्कॉट’ किंवा शुभंकर म्हणून वापरण्याचा विचार केला होता. आता प्रचलित मॅस्कॉट अस्तित्त्वात येण्यापूर्वी विविध वेशभूषेतील कलाकार तसेच प्राणी खेळाच्या मैदानात आणले जात होते; याचा मुख्य उद्देश विरोधी संघावर दबाव निर्माण करणे हा होता. कालांतराने या प्राण्यांची जागा काल्पनिक मॅस्कॉटने घेतली. २० व्या शतकाच्या मध्यात अमेरिकेत कठपुतळी बाहुल्यांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाला. याच बाहुल्यांचा वापर मॅस्कॉट म्हणून करण्यात आल्याने हा प्रकार प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरला होता. त्यामुळे मॅस्कॉट वापरण्याची/ठेवण्याची प्रथाच क्रीडा क्षेत्रात रूढ झाली.
अधिक वाचा: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
या मॅस्कॉटची निवड कशी केली जाते
बऱ्याचदा मॅस्कॉटची निवड एखादा गुणधर्म दर्शविण्यासाठी केली जाते. खेळात प्रतिस्पर्धी असतात, त्यांच्या विरुद्ध स्पर्धात्मक भाव दर्शविण्यासाठी एखाद्या योध्याची अथवा शिकारी प्राण्याची निवड मॅस्कॉट म्हणून केली जाते. हे मॅस्कॉट स्थानिक किंवा प्रादेशिक वैशिष्ट्यांचे प्रतीक देखील असू शकतात. अमेरिकेतील नेब्रास्का कॉर्नहस्कर्स हे इंटरकॉलेजिएट अॅथलेटिक्स संघ आहेत, जे नेब्रास्का-लिंकन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात. नेब्रास्का कॉर्नहस्कर्सचा या संघाचा मॅस्कॉट ‘हर्बी हस्कर’ आहे. हर्बी हस्कर हा नेब्रास्का-लिंकन विद्यापीठ ज्या भागात आहे त्या क्षेत्राच्या कृषी परंपरेचे प्रतिनिधित्त्व करतो. असे असले तरी हे मॅस्कॉट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे आपण पाहू शकतो. मूळ अमेरिकन जमातींवर आधारित काही मॅस्कॉट वादग्रस्त ठरले होते. ‘संस्कृतीचा अपमान केल्याचा’ आरोप त्याप्रसंगी करण्यात आले होते. याच प्रथेप्रमाणे या वर्षी थायलंडने त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या भगवान हनुमानाची निवड केली होती. यापूर्वी १९८२ साली भारताने यजमान पद भूषविलेल्या आशियाई खेळासाठी अप्पू नावाचा हत्ती मॅस्कॉट होता. थायलंड मधील रामायणाला रामाकीन, रामा कियात असे संबोधले जाते. रामाकीन, रामा कियात म्हणजे रामाख्यान; रामाचे आख्यान. थायलंडच्या नाटक, संगीत, साहित्य यांवर सखोल रामाख्यानचा परिणाम झालेला आहे. राम, सीता, हनुमान हे त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हनुमानास मॅस्कॉट म्हणून निवडण्यामागे हनुमानाची रामभक्ती, निष्ठा, गती अशा विविध गुणांनी खेळाडूंना उत्तेजन मिळावे हा उद्देश होता.