Pope Francis कॅथलिक धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. २१ एप्रिल रोजी व्हॅटिकनकडून पोप यांच्या निधनाच्या वृत्ताची माहिती देण्यात आली. काही महिन्यांपासून पोप फ्रान्सिस आजारी होते. रोममधील व्हॅटिकनच्या जेमेली रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पोप फ्रान्सिस यांचे स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता निधन झाले.

काही जणांच्या अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू न्यूमोनियाने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, आता व्हॅटिकनने त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट केले आणि अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांना डबल न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ३८ दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांच्या मृत्यूचे कारण सांगताना व्हॅटिकनने काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊ.

व्हॅटिकनने त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

पोप फ्रान्सिस यांना कुठे दफन केले जाणार?

जेव्हा पोपचा मृत्यू होतो तेव्हा अनेक परंपरा पार पडल्या जातात. सर्वप्रथम त्यांच्या कार्यकाळाचे प्रतीक असलेली अंगठी तोडली जाते, लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोपचा मृतदेह सार्वजनिकरीत्या प्रदर्शित केला जातो. त्यानंतर परंपरेनुसार त्यांचा मृतदेह पुरला जातो. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी या सर्व प्रथा-परंपरा बदलल्या. त्यांचा अंत्यसंस्कार एक महान व्यक्ती म्हणून न करता एक बिशप म्हणून करण्यात यावा, अशी त्यांची भूमिका होती. पोप फ्रान्सिस यांनी, त्यांना व्हॅटिकनच्या बाहेर दफन करण्यात यावे, अशी वैयक्तिक इच्छा व्यक्त केली होती. फ्रान्सिस यांनी त्यांच्या मृत्युपत्रात रोमच्या एस्क्विलिनो भागात असलेल्या सांता मारिया मॅगीओरच्या बॅसिलिका येथे दफन करण्याची विनंती केली होती. खरे तर पोपचा मृत्यू झाल्यास सेंट पीटर बॅसिलिका हे त्यांचे मुख्य दफनस्थान आहे. कुठलीही सजावट न करता, अगदी साध्या पद्धतीने त्यांना दफन करण्यात यावे, अशी त्यांची इच्छा होती.

व्हॅटिकनने त्यांच्या मृत्युपत्राचा संपूर्ण मजकूर प्रसिद्ध केला. या मृत्युपत्रात दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी लिहिले, “दफनविधीचा खर्च एका उपकारकर्त्याने दिलेल्या रकमेद्वारे भरला जाईल. हा खर्च मी सेंट मेरी मेजरकडून पोप बॅसिलिकाला हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली आहे. यासंबंधी आवश्यक सूचना मी लायबेरियन बॅसिलिकाचे कार्डिनल रोलांडस मॅक्रिकस यांना दिल्या आहेत.” सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह कासा सांता मार्ताच्या चॅपलमध्ये एका शवपेटीत ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सेंट पीटर बॅसिलिका येथे जनतेला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी सार्वजनिकरीत्या प्रदर्शित केला जाईल.

पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर आता पुढे काय?

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर व्हॅटिकनडून नऊ दिवसांचा शोक कालावधी जाहीर करण्यात आला आहे, ज्याला ‘नोव्हेन्डिएल’ म्हटले जाते. या कालावधीत त्यांचे पार्थिव त्यांच्या खासगी चॅपलमध्ये हलवले जाईल, त्यांना पांढऱ्या रंगाचा कॅसॉक परिधान केला जाईल आणि त्यांचे पार्थिव लाकडी शवपेटीत ठेवले जाईल. त्यांच्या निधनाच्या चार ते सहा दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. या काळात रोममधील वेगवेगळ्या चर्चमध्ये नऊ दिवस प्रार्थना सभा होतील. फ्रान्सिस यांनी रोममधील सेंट मेरी मेजरच्या बॅसिलिकामध्ये दफन करण्याची विनंती केली असली तरी मुख्य अंत्यसंस्कार सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये होण्याची शक्यता आहे.

पुढील पोपची निवड करण्याची प्रक्रिया सहसा पोपच्या मृत्यूनंतर १५ ते २० दिवसांनी सुरू होते. जगभरातील सुमारे १३५ कार्डिनल या गुप्त पद्धतीच्या मतदान प्रक्रियेस पात्र आहेत. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही उत्तराधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यात इटलीचे कार्डिनल मॅटेओ झुप्पी, व्हॅटिकनचे राज्य सचिव पिएत्रो पॅरोलिन व फिलिपिन्सचे कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगले यांचा समावेश आहे. पोप फ्रान्सिस हे मार्च २०१३ मध्ये पोप झाले होते. त्यांनी हा पदभार स्वीकारल्याच्या अगदी सुरुवातीपासूनच पोपच्या गाडीऐवजी बसने प्रवास, हॉटेलचे बिल स्वतः भरल्याने व पोपच्या अपार्टमेंटऐवजी व्हॅटिकन गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचा पर्याय निवडल्याने जगाला त्यांचा साधेपणा दिसून आला. त्यांच्या निधनानंतर अनेक जागतिक नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू कसा झाला?

स्ट्रोक आल्याने पोप फ्रान्सिस कोमामध्ये गेले आणि त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्या निकामी झाल्या, अशी माहिती आपल्या अधिकृत निवेदनात व्हॅटिकनने दिली आहे. ईसीजी चाचणीद्वारे त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यात आले आहे, असे त्यांच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. व्हॅटिकनने जारी केलेल्या निवेदनात पोप यांच्या डॉक्टर आंद्रिया आर्केंजेली यांनी लिहिले आहे की, फ्रान्सिस यांचा मृत्यू स्ट्रोक आणि हृदय व रक्तवाहिन्या निकामी झाल्यामुळे झाला. डबल न्यूमोनियामुळे त्यांना फुप्फुसाचाही त्रास होता. मात्र, डॉक्टर आर्केंजेली यांनी हेदेखील सांगितले की, फ्रान्सिस यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता.

मुख्य म्हणजे तरुणपणी त्यांच्या फुप्फुसाचा काही भाग काढून टाकण्यात आला होता. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि तपासणी केली असता, त्यांना डबल न्यूमोनियाचे निदान झाल्यावर त्यांना जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य म्हणजे त्यांच्या प्लेटलेट्सची पातळीदेखील कमी झाली होती, ज्याला थ्रोम्बोसायटोपेनिया म्हटले जाते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवत होता. २३ मार्च रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि त्याच दिवशी त्यांचे अखेरचे सार्वजनिक दर्शन झाले. ते सेंट पीटर्स स्क्वेअरमधून जाताना दिसले आणि सेंट पीटर बॅसिलिकाच्या मुख्य बाल्कनीतून त्यांनी लोकांना अभिवादनदेखील केले.