-अन्वय सावंत
टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक बोरिस बेकरला ब्रिटनमधील न्यायालयाने अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बेकरने आपल्या टेनिस कारकीर्दीत भरघोस यश संपादन केले. त्याच्या खात्यावर एकूण सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. त्याने तीन वेळा विम्बल्डन (१९८५, १९८६, १९८९), दोन वेळा ऑस्ट्रेलियन (१९९१, १९९६) आणि एकदा अमेरिकन (१९८९) खुल्या टेनिस स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. मात्र, मैदानाबाहेर हे यश टिकवणे बेकरला अवघड गेले. आता दिवाळखोरी कायद्यांतर्गत त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेकर कोणत्या गुन्ह्यांत दोषी आढळला?
जून २०१७मध्ये बेकरला दिवाळखोर घोषित केल्यानंतर त्याने आपल्या खात्यातील हजारो डॉलरची रक्कम इतर खात्यांमध्ये वळवली. त्याने पहिली पत्नी बार्बरा आणि दुसरी पत्नी शार्ली ‘लिली’ बेकर यांच्या खात्यावरही पैसे जमा केले. तसेच त्याने जर्मनीतील एक मालमत्तेची माहिती दिली नाही. त्याने आठ लाख २५ हजार युरोचे बँक कर्ज आणि एका कंपनीतील गुंतवणूकही लपवून ठेवली. त्यामुळे लंडनमधील साऊथवॉर्क क्राऊन न्यायालयाने बेकरला दिवाळखोरी कायद्याअंतर्गत दोषी ठरवले.
बेकरला दिवाळखोर का घोषित करण्यात आले होते?
मूळचा जर्मनीचा, पण २०१२ सालापासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या बेकरने जून २०१७ मध्ये लंडनच्या न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्याच्या नावावर एका बँकिंग कंपनीकडून अंदाजे ३३ लाख युरोचे कर्ज होते. दोन वर्षांहूनही अधिक काळ त्याने या कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्याने बँकेला त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यापूर्वी आणखी २८ दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. दरम्यानच्या काळात स्पेनमधील मायोर्का येथील आपली मालमत्ता विकून त्यातून मिळणाऱ्या रकमेतून कर्जाची परतफेड करण्याचा तो प्रयत्न करणार होता. मात्र, बँकेने त्यासाठी नकार दिला.
तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना न्यायाधीश काय म्हणाल्या?
बेकरला दिवाळखोर घोषित केल्यानंतर तो अप्रामाणिकपणे वागला आणि तो स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्यांना दोष देत होता, असे सुनावणीदरम्यान फिर्यादी रेबेका चॉकले म्हणाल्या. त्यानंतर निकाल सांगताना साऊथवॉर्क क्राऊन न्यायालयाच्या न्यायाधीश डेबोरा टेलर यांनीही बेकरला खडे बोल सुनावले. बेकरला आपली चूक मान्य असल्याचे किंवा त्याला वाईट वाटत असल्याचे त्याच्या कृतीमधून जराही जाणवले नाही, अशी टिपण्णी टेलर यांनी केली. तसेच दिवाळखोरीमुळे तू तुझी कारकीर्द आणि प्रतिष्ठा गमावली आहेस, असेही बेकरला उद्देशून टेलर म्हणाल्या.
बेकरची आर्थिक अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ होती का?
एके काळी तीन कोटी ८० लाख पौंडच्या संपत्तीचा मालक असलेल्या बेकरला १९९९मध्ये टेनिसमधून निवृत्ती पत्करल्यानंतर आपले राहणीमान टिकवणे अवघड जाऊ लागले. २००२मध्ये साधारण १७ लाख युरोचा कर चुकवल्याप्रकरणी म्युनिक न्यायालयाने बेकरला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा रद्दही करण्यात आली आणि त्याला तीन लाख युरोचा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणाही बेकरने दाखवला नव्हता. या गोष्टींचा उल्लेखही दिवाळखोरी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला. त्यावेळी देण्यात आलेल्या इशाऱ्याकडे तू दुर्लक्ष केलेस. तुझी तुरुंगवासाची शिक्षा रद्द करून तुला आणखी एक संधी देण्यात आली होती. परंतु तू त्यातून धडा घेतला नाही, असे न्यायाधीश टेलर यांनी नमूद केले.