भारतीय १६ संस्कारांमध्ये विवाह हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू विवाहात बांधण्यात येणारा सर्वात मंगल आणि पवित्र सूत्र-धागा म्हणजे ‘मंगळसूत्र’, अलीकडच्या फॅशन ट्रेण्ड मध्ये अनेक प्रकारची, वेगवेगळ्या डिझाइन्सची मंगळसूत्रे तयार करण्यात येतात. मॅचिंग कपड्यांनुसार वेगवेगळ्या रंगाची, धातूंची, हिऱ्या-माणकांची, मंगळसूत्रे वापरण्याची पद्धत सुरु झाली आहे. पारंपरिक धारणेनुसार महाराष्ट्रासारख्या ठिकाणी काळ्या मण्यांचे तर दक्षिणेकडे धाग्यांत ओवाळलेले धातूचे पेंडन्ट असलेले मंगळसूत्र वापरण्याची रीत आहे. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते. तरी मंगळसूत्राच्या समाजशास्त्रीय अंतर्भावाविषयी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यामुळेच नेमका मंगळसूत्राचा इतिहास किती जुना आहे हे जाणून घेणे गरजेचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय दागिन्यांच्या इतिहासकार डॉ. उषा बालकृष्णन नमूद करतात की, “आजच्या प्रमाणे हिरे, पेंडेंट पासून तयार करण्यात येणाऱ्या मंगळसूत्राची संकल्पना प्राचीन भारतीय विवाह सोहळ्यात कधीच नव्हती. त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, प्राचीन विवाह सोहळ्यात पवित्र धागा परिधान करण्याची कल्पना अस्तित्वात आल्यानंतर, वधूला दागिन्यांनी सजवण्याची प्रथा सामान्य झाल्यानंतर जात आणि समुदाय भेदांप्रमाणे मंगळसूत्र परिधानाचा विधी नव्हता, त्यामुळे हा विधी आधुनिकच म्हणावा लागेल.

अधिक वाचा : हिंदू पंचांगाप्रमाणे येणारा अधिक मास कसा ठरतो?

डॉ. बालकृष्णन आणि मीरा सुशील कुमार यांनी ‘इंडियन ज्वेलरी: द डान्स ऑफ द पीकॉक’ या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की, ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीतील धारणेनुसार “वैवाहिक जीवनात दागिने मांगल्याचे प्रतीक म्हणून कार्य करतात”. म्हणूनच वैधव्याचे सूचक म्हणून किंवा सांसारिक गोष्टींचा त्याग करताना, प्रतिकात्मक स्वरूपात दागिन्यांचा ही त्याग करण्याची परंपरा आहे. यासाठीच ‘इंडियन ज्वेलरी: द डान्स ऑफ द पीकॉक’ या पुस्तकाच्या लेखकांनी अथर्ववेदाचा दाखला दिला आहे. अथर्ववेदाच्या एका श्लोकात, एका विवाह सोहळ्यात वडील म्हणतात “मी सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली ही मुलगी तुला देतो.” यावरूनच प्राचीन भारतीय विवाह सोहळ्यात असलेले दागिन्यांचे महत्त्व लक्षात येते. मनुस्मृती मध्ये वधूच्या दागिन्यांचा उल्लेख ‘स्त्री-धन’ म्हणून आला आहे, या उल्लेखानुसार ही एकमेव मालमत्ता आहे जी तिची मानली जाते. ‘स्त्री-धन’ ही संकल्पना स्त्रियांच्या भविष्यातील सुरक्षिततेच्या कारणासाठी निर्माण झाली असावी, असे अभ्यासक मानतात. पुरुषप्रधान आणि असमान सामाजिक रचनेत, वैधव्य प्राप्त झाल्यावर आणि वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता म्हणून वैवाहिक दागिने ही स्त्रीची संपत्ती मानली गेली होती, किंबहुना मानली जात आहे. डॉ. बालकृष्णन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे मंगळसूत्राचा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात ‘लग्नाचा अलंकार’ म्हणून केलेला नाही. गृह्यसूत्रे (व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी समारंभ विहित करणारा हिंदू ग्रंथ) विवाह सोहळ्यासाठी मंगळसूत्र बांधण्याच्या प्रथेचा उल्लेख करत नाहीत.

“व्युत्पत्तिशास्त्रानुसार, मंगळसूत्र हा शुभ धागा होता. पारंपारिकरित्या आणि आजही शुभ प्रसंगी, हळद किंवा कुंकुवामध्ये बुडविलेला एक धागा मान किंवा मनगटासारख्या शरीराच्या नाडीच्या बिंदूभोवती बांधला जातो. मंगळसूत्र हे मुळात रक्षण करण्यासाठी, ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि धैर्य देण्यासाठी बांधलेले/ घातलेले तावीज होते. असे मत डॉ. बालकृष्णन व्यक्त करतात.

लग्नाच्या दागिन्यांच्या पुरातत्त्वीय पुराव्यांबद्दल बोलताना केरळ विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीथा नायर सांगतात की, ऐतिहासिक काळापासून अंदाजे इसवी सनपूर्व ५०० ते इसवी सन ५०० या कालखंडातील आपल्याला अनेक काळे मणी मिळतात. कदाचित हे मणी मंगळसूत्र तयार करण्यासाठी वापरले गेले असावेत, असा अंदाज आहे. परंतु, ते मणी फक्त विवाहित महिला परिधान करत होत्या की, अविवाहित महिला हे आज सांगणे कठीण आहे. असे असले तरी वराने वधूच्या गळ्यात तार बांधल्याचा एक प्राचीन साहित्यिक संदर्भ संगम साहित्यात देखील आहे, हा संदर्भ इसवी सनपूर्व ३ रे शतक ते इसवी सन ३ रे शतक या कालखंडातील आहे.

अधिक वाचा : जे. रॉबर्ट ओपेनहाइमर आणि डॉ. होमी जे. भाभा: कसे होते दोन अणुशास्त्रज्ञांमधील ऋणानुबंध?

विविध समुदायांकडून मंगळसूत्राचा वापर

डॉ. बालकृष्णन आणि कुमार यांनी त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केल्याप्रमाणे विवाहादरम्यान मंगळसूत्र बांधण्याच्या प्रथेचा धर्मापेक्षा परंपरेशी अधिक संबंध आहे. पारंपारिकपणे एक पवित्र धागा पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही बांधत, विद्यार्थ्याच्या जीवनात आश्रम प्रवेशाच्या वेळी गुरू बांधत असत. काळाच्या ओघात स्त्रियांसाठी पवित्र धागा बांधण्याची प्रथा कमी होत असताना, पवित्र धागा “स्त्रीच्या वैवाहिक स्थितीला पवित्र करण्यासाठी आणि तिला सामाजिक मान्यता देण्यासाठी “तिरु-मंगलम किंवा मंगळसूत्रम्” म्हणून प्रसिद्ध झाला. डॉ. बालकृष्णन म्हणतात, “अनेकदा, या धाग्यामध्ये शुभ वृक्षाचे पान, वाघाचा पंजा किंवा त्या समुदायातील प्रतिकात्मक गोष्टींसारख्या आकृतिबंध पेंडन्ट म्हणून वापरला जात होता.

वर्षानुवर्षे, मंगळसूत्राचे आकृतिबंध हे जाती आणि समुदायांनुसार वेगवेगळे असायचे. उदाहरणार्थ, तामिळनाडू आणि केरळमध्ये, मंगळसूत्र ‘ताली’ म्हणून ओळखले जाते, ते ताडाच्या झाडाच्या आकृतिबंधाचे प्रतिनिधित्त्व करत असावे असे अभ्यासक मानतात, परंतु आज या गोष्टीला कुठलाही साहित्यिक पुरावा उपलब्ध नाही, आजही गोंड, सावरा आणि मुंडा जमातींमध्ये, वर वधूच्या गळ्यात ताडपत्राची तार बांधतो,” असा संदर्भ बालकृष्णन यांनी दिला आहे. ‘ताली’तील भिन्नता सहसा समुदाय किंवा जमातीद्वारे आदरणीय नैसर्गिक किंवा अलौकिक घटना दर्शवतात. उदाहरणार्थ, अमई-तालीमध्ये कासवाचे प्रतीक आहे. दुसरीकडे, पुलीपली-ताली, वाघाच्या पंजाचा एक संच दर्शवते. शैव ब्राह्मण तालीमध्ये लिंगमचे किंवा जातीच्या चिन्हाच्या तीन आडव्या रेषा असतात.

अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

तामिळनाडूमधील चेट्टियानाडूच्या नट्टुकोट्टाई चेट्टियारचा हार हा तालीचा सर्वात सुंदर प्रकार आहे. या समुदायाची उत्पत्ती पुहारच्या प्राचीन सागरी बंदराच्या परिसरात झाली आहे आणि त्यांचे संरक्षक देवता भगवान शिव आहेत, तर त्यांचे सर्वात महत्त्वाचे मंदिर चिदंबरममधील नटराज मंदिर आहे. त्यामुळेच चेट्टियारचा हार हा आडव्या मण्यांच्या दोन ओळींनी तयार झालेला एक भव्य अलंकार आहे, हाराच्या पारंपारिक एम आकाराच्या मध्यभागी चिदंबरमच्या मंदिराची प्रतिकृती असते. या प्रतिकृतीत, शिव आणि पार्वतीला त्यांच्या वाहनावर, नंदीवर बसलेले चित्रित केले जाते. चेट्टीनाडच्या स्थापत्यकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक तपशीलांनी दोन्ही बाजूंच्या पंज्यासारखे तुकडे सुशोभित केले जातात.”

मंगळसूत्र बांधण्याची प्रथा हिंदूंव्यतिरिक्त इतर धार्मिक गटांमध्येही रुजली आहे आणि अनेकदा त्यांच्या स्वत:च्या श्रद्धा प्रणालींना सूचित करण्यासाठी ती स्वीकारली जाते. “उदाहरणार्थ, केरळमधील सीरियन ख्रिश्चन मंगळसूत्र घालतात, परंतु त्यावर क्रॉस असतो. इतर काही समुदाय आहेत ज्यांच्यामध्ये मंगळसूत्र हा प्रकारच अस्तित्वात नाही. मंगळसूत्राच्या समान कल्पना आणि उद्दिष्टाचा अंतर्भाव करून, वैवाहिक संस्थेने इतर काही प्रतिकांचा समावेश केलेला दिसतो. उदाहरणार्थ, मंगळसूत्राव्यतिरिक्त जोडवी, बिचवा किंवा पायाची अंगठी आणि काचेच्या बांगड्या स्त्रीची वैवाहिक स्थिती दर्शवतात. एकुणात, मंगळसूत्र भारतीय परंपरेत सर्वत्र आढळत असले तरी त्याच्या अस्तित्वाचे अगदी ठोस व ठाम पुरावे मात्र तुलनेने कमी सापडतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did the concept of mangalsutra thaali develop in indian culture and sanskaras svs
Show comments