इस्रायलच्या निर्मितीनंतर सुरू झालेले अमेरिका- इस्रायल संबंध अलिप्ततेच्या धोरणापासून ते आता गाढ मैत्रीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचा हा प्रवास नेमका झाला तरी कसा?
प्रारंभिक अलिप्तता
इस्रायलच्या स्थापनेनंतरच्या प्रारंभिक कालखंडात अमेरिकेकडून अलिप्ततेचे धोरण राखण्यात आले होते. तर झुकते माप अरब राष्ट्रांकडे होते. परंतु १९६२ सालापासून परिस्थितीत बदल होऊ लागला. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी १९६२ मध्ये इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर विशेष भर दिला. आणि १९६७ सालापासून भागीदारी खऱ्या अर्थाने मूळ धरू लागली. इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील नातेसंबंध १९७३ नंतर अधिक दृढ झाले, यासाठी मुख्यतः कारणीभूत ठरले ते राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन. त्यांनी योम किपूर (Yom Kippur War) युद्धादरम्यान इस्रायलला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता, हेन्री किसिंजर यांना इस्रायलला वाचवण्यासाठी “काहीही करावे” असे आदेश निक्सन यांनी दिले होते.
अधिक वाचा: सुएझ कालव्याने नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व कसे सिद्ध केले?
लष्करी सामंजस्य करार
सुरुवातीच्या कालखंडात अमेरिकेने इस्त्रायलला त्यांची बरीचशी शस्त्रे दिली आणि काही विकलीही. त्यांच्या विकास उपक्रमांना निधी देण्यासाठी यूएस बँकांकडून कमी व्याजदराने कर्ज दिले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी १९८० आणि १९९० च्या दशकात शस्त्रास्त्रांच्या विकास आणि निर्मितीवर एकत्र काम करण्यास सुरुवात केली. याव्यतिरिक्त, १९९९ मध्ये, अमेरिकेने इस्रायलला प्रतिवर्षी अब्जोवधींची लष्करी मदत देण्यास सहमती दर्शविणार्या १० वर्षांच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली, तसेच राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी इस्रायल आणि त्याचे अरब शेजारी यांच्यामध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली, राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्या काळात सुरू झालेले या दोन देशांमधील चिरस्थायी संबंध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या नेतृत्वाखाली तसेच अबाधित राहिले होते. अरब स्प्रिंगपासून अमेरिकेतील जनमत बदललेले असले तरी, वॉशिंग्टनमधील धोरणकर्त्यांसाठी या युतीचे महत्त्व कायम आहे.
चार अब्ज डॉलर्सचा अमेरिकन निधी
अलीकडच्या वर्षांत वॉशिंग्टनने तेल अवीवला प्रदान केलेल्या बिनशर्त समर्थनामागची सखोलता अधोरेखित करणे कठीण आहे, यात लष्करी निधी एकूण ४ अब्ज अमेरिकन डॉलर प्रतिवर्ष एवढा आहे. सर्वात अलीकडे संकटसमयी अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेच्या केंद्रस्थानी असलेल्या पेंटागॉनने इस्रायलला कॅरियर स्ट्राइक ग्रुप (strike group), चार विनाशिका (four destroyers), USS गेराल्ड फोर्ड मधील सर्वात मोठी यूएस युद्धनौका (USS Gerald Ford), F-35 लढाऊ विमाने, मार्गदर्शित क्षेपणास्त्र वाहक (Guided missile carriers) आणि विमानवाहू जहाज (aircraft carrier) मदतीसाठी पाठवले.
अमेरिकन थिंक टँक, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या मते, इस्रायलचे राजनैतिक संबंध “आता जगभर पसरले आहेत”. २०२३ सालच्या इस्रायल-हमास संघर्षाच्या प्रतिक्रियेत जागतिक नेत्यांनी इस्रायलचे जागतिक महत्त्व प्रदर्शित केले, ज्यात कॅनडा, भारत, यूके, फ्रान्स आणि जर्मनी या देशांच्या प्रमुखांनी हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचे समर्थन केले.
अधिक वाचा: इस्रायलची निर्मिती: ब्रिटिश का ठरले पॅलेस्टाईनच्या फाळणीस कारणीभूत?
घनिष्ट मैत्रीच्या दिशेने…
काही अरब राज्यांनी हमासला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी २० व्या शतकातील त्यांच्या धोरणांमधून नाट्यमय यूटर्न घेत मध्यममार्गी प्रतिसाद दिला आणि दोन्ही बाजूंना हिंसाचार संपवण्याचे आवाहन केले आहे. परंतु, उर्वरित जगाशिवाय देखील, इस्रायलला त्याच्या सर्वात मोठ्या मित्राच्या पाठिंब्याने बळ मिळाले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितले की, “तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःहून सक्षम असाल. पण जोपर्यंत अमेरिका अस्तित्त्वात आहे, तोपर्यंत तुम्हाला कधीही याची गरज पडणार नाही. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असू!” अशाप्रकारे इस्रायल- अमेरिका संबंधांच्या लोलकाचा प्रवास आता घनिष्ट मैत्रीच्या दिशेने सरकला आहे.