राखी चव्हाण
उपराजधानी नागपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरणाचे निकष डावलून केल्या जाणाऱ्या सिमेंटीकरणाचा हव्यास नडला आणि नुकत्याच झालेल्या अवघ्या चार तासांच्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून टाकली. गेल्या दहा वर्षांच्या काळात शहराचे झपाट्याने झालेले सिमेंटीकरण शहराच्या मुळावर उठले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात वेढले गेले. हे घडले कसे आणि का?
अंबाझरी तलावाला मेट्रोचा विळखा
अंबाझरी तलाव दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहतो. आजतागायत त्याचा फटका परिसरातील वस्त्यांना कधी बसला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत अंबाझरी तलावाच्या काठावरील शेकडो झाडांचा बळी घेत येथे मेट्रोसाठी सिमेंटचे मोठमोठे खांब उभारण्यात आले. आतापर्यंत तलावाच्या मातीची पाळ झाडांच्या मुळांनी बांधून ठेवली होती, मात्र ही झाडेच तोडण्यात आल्याने पाळ कमकुवत झाली आणि मध्यरात्रीच्या ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ही पाळ फुटली असती तर मात्र उत्तराखंडसारखी स्थिती शहरात निर्माण झाली असती.
आणखी वाचा-‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?
निकष धाब्यावर…?
शहराला स्मार्ट सिटी करण्याच्या नादात झपाट्याने शहराचे सिमेंटीकरण करण्यात आले. शहरातील रस्ते सिमेंटचे झाले, पण हे रस्ते करताना निकष पाळण्यात आले नाही. सिमेंटचे रस्ते करताना रस्ता खोल खणून मग त्यावर तीन स्तर सिमेंटचे द्यावे लागतात. उपराजधानीत मात्र जुने डांबरीकरण असणारे रस्ते वरवर खरवडून त्यावर सिमेंटचा स्तर टाकण्यात आला आणि अर्ध्या रस्त्यावर सिमेंटचे गट्टू लावण्यात आले. हे रस्ते तयार झाल्यानंतर लागलीच तडे जाण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारच्या पावसाने या रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा केली. अंबाझरी परिसरातील रस्त्या अक्षरशः वाहून गेला. पाण्याचा वेग एवढा जोरदार होता की सिमेंट रस्त्यांचे तुकडे आणि गट्टू वाहत आले.
सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था अजूनही ब्रिटिशकालीनच का?
शहरातील सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था अजूनही जुनीच असल्याने त्याचा मोठा फटका बसला. ही व्यवस्था अजूनही ब्रिटिशकाळातील असून अनेक ठिकाणी ती बदलण्यात आली नाही. त्यामुळे शहरात दरवर्षी पावसाळ्यात रस्ते तुंबतात. मात्र, यावेळी ते फक्त तुंबलेच नाही तर रस्त्यावर पाणी आल्याने वाहून गेले. शहरातील रस्त्यांवर चार ते पाच फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याने ते रस्ते आहेत की नद्या असा प्रश्न पडला. त्यामुळे महापालिकेच्या नाले सफाई योजनेच्या मर्यादा उघड्या पडल्या.
आणखी वाचा-अमेरिकेचे सरकार १ ऑक्टोबर रोजी ‘शटडाऊन’? सरकार शटडाऊन होणे म्हणजे काय, ते कसे होते?
नाग नदी स्वच्छता अभियानाचे काय?
शहराची ओळख असणारी नाग नदी दरवर्षी स्वच्छ केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. स्वच्छता अभियानावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अंबाझरीपासून पारडीपर्यंत सहा टप्प्यांत हे अभियान राबवले जाते, पण गेल्या आठ वर्षांत ही नदी स्वच्छ झाली नाही. त्यामुळे ही नदी आहे की नाला हा प्रश्न दरवर्षी नागरिकांना पडतो. शहरात पुरसदृश स्थिती निर्माण होण्यास ते एक महत्त्वाचे कारण ठरले.
सधन वस्त्यांनाही फटका का?
पावसाचा फटका सखल भागातील झोपडपट्टीलाच नाही तर उच्चभ्रू वस्त्यांनादेखील बसला. पुराचे पाणी शिरल्यामुळे मध्यरात्री नागरिकांना जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपूर या शहरातील सधन वस्त्या म्हणून ओळखल्या जातात, पण या वस्त्यांनाही पुराच्या पाण्याने विळखा घातला. रामदास पेठेतील उच्चभ्रूंच्या घरातही पाणी शिरले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. अंबाझरी परिसरातील डागा ले-आऊटमध्ये रस्ते आणि घरात चार फुटांवर पाणी गेले. या वसाहतीतील वाहने पूर्णपणे पाण्याखाली गेली. रस्त्यावर चारचाकी वाहने अक्षरशः तरंगत होती. सेंट्रल बाजार मार्ग तसेच पंचशील चौकाकडून रामदास पेठकडे येणाऱ्या मार्गावरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले तर बंगल्यांमध्येही तीन फुटांपर्यंत पाणी होते.
rakhi.chavhan@expressindia.com