संजय जाधव
भारतात महागाईचा दर घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) या दोन मुख्य निर्देशांकाद्वारे ठरविला जातो. सध्या या दोन्हीत म्हणजे एकंदरीत महागाई दरांत दिलासादायी उतार दिसून येत आहे. ही ताजी आकडेवारी ही तात्पुरती उसंत की आश्वासक आणि स्थायी बदल हे लवकरच दिसून येईल.
सध्याची आकडेवारी काय सुचविते?
मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.६६ टक्के नोंदवण्यात आला. हा या दराचा १६ महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. अन्नधान्याच्या कमी झालेल्या किमती याला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. याचबरोबर भाज्यांच्या भावातील वाढ कमी झाल्याचेही कारण यामागे आहे. याच वेळी घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये १.३४ टक्के नोंदवण्यात आला. हा घाऊक महागाई दराचा मागील २९ महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. याच वेळी मार्चमध्ये सलग दहाव्या महिन्यात घाऊक महागाई दरात घसरण झालेली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ महागाईच्या दरात घसरण सुरू असल्याचे दिसत आहे.
अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांच्या सर्वसाधारण किमतींतील चढ-उतार महागाई दरातून दर्शविले जातात. क्रयशक्तीवर झालेला परिणामही यातून अधोरेखित होत असतो. महागाईचा दर जास्त असल्यास तो अर्थव्यवस्थेसाठी हानीकारक असतो. याच वेळी महागाईचा कमी दरदेखील अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पोषक नसतो. त्यामुळे महागाईचा मध्यम दर असणे हे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक ठरते.
ग्राहक किंमत निर्देशांक कसा ठरतो?
ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे किरकोळ महागाईचा दर ठरविला जातो. ग्राहकाने वस्तू खरेदी करताना तिच्या किमतीत झालेला बदल हा दर दर्शवतो. देशातील महागाई ठरवण्यासाठी हा प्रमुख दर असतो. कारण सेवांच्या किमतीत झालेला बदल घाऊक महागाईच्या दरात समाविष्ट नसतो. वस्तू व सेवांची ग्राहकाने प्रत्यक्ष खरेदी करताना त्यांच्या किमतीत झालेला बदल किरकोळ महागाई दरातून मोजला जातो. कुटुंबाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या गरजेसाठी वापरलेल्या सेवा अथवा वस्तूंचाही यात समावेश असतो, अशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याची व्याख्या केलेली आहे.
घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय?
वस्तूंची किरकोळ विक्री होण्याआधी किमतीतील बदल घाऊक किंमत निर्देशांकाद्वारे मोजला जातो. म्हणजेच ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचण्याआधी असलेला तिचा दर म्हणजेच घाऊक किमतीचे मूल्यमापन या निर्देशांकाद्वारे केले जाते. किमतीतील चढउतारामुळे उद्योग, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातील पुरवठा आणि मागणी यावर झालेला परिणाम घाऊक किंमत निर्देशांकातून स्पष्ट होतो. दोन कंपन्यांमध्ये झालेल्या वस्तूंच्या व्यापाराच्या किमतीवर या निर्देशांकात भर दिलेला असतो. उत्पादक आणि घाऊक किमती यामध्ये झालेला किमतीतील बदलाचा आढावा दरमहा घाऊक किंमत निर्देशांकातून घेतला जातो.
घाऊक- किरकोळ महागाईत फरक काय?
किरकोळ आणि घाऊक महागाईत मूलभूत फरक आहे. किरकोळ महागाई ही ग्राहकाच्या पातळीवर तर घाऊक महागाई उत्पादनाच्या पातळीवर मोजली जाते. सेवांचा समावेश किरकोळ महागाईत असतो मात्र घाऊक महागाईत नसतो. घाऊक महागाईत सर्वाधिक भर उत्पादित वस्तूंवर असतो तर किरकोळ महागाईत तो अन्नधान्यावर असतो. घाऊक महागाईसाठी आर्थिक वर्ष संदर्भ म्हणून वापरले जाते तर किरकोळ महागाईसाठी कॅलेंडर वर्षांचा वापर करण्यात येतो. घाऊक महागाई ही पहिल्या टप्प्यातील व्यवहार मोजते तर किरकोळ महागाई शेवटच्या टप्प्यातील महागाई मोजते.
किरकोळ महागाई दर का महत्त्वाचा?
रिझव्र्ह बँकेककडून पतधोरण ठरवताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार केला जातो. किरकोळ महागाई दराचे रिझव्र्ह बँकेचे उद्दिष्ट चार टक्के असून, तो दोन वा सहा टक्क्यांपर्यंत इथे-तिथे होणे गृहीत धरलेले असते. परंतु, मागील आर्थिक वर्षांत महागाईचा आलेख ७.७९ टक्क्यांपर्यंत उंचावला. महागाई आटोक्यात आणण्यासाठी, मागील वर्षीच्या मे महिन्यापासून यंदाच्या एप्रिलपर्यंत रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरात तब्बल अडीच टक्के वाढ करण्यात आली. आता रिझव्र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले असले तरी हा तात्पुरता थांबा असल्याचे संकेत दिले आहेत. चालू वर्षांत पहिल्यांदाच मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली आला आहे. तो उंचावल्यास रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर वाढीचे चक्र पन्हा सुरू होऊ शकते.