भारतात तसेच जगभरात अनेक ठिकाणी प्राचीन गुहाचित्रे सापडली आहेत. प्रामुख्याने त्यामध्ये प्राण्यांच्या चित्रांचा समावेश असून काही चित्रांमध्ये मानवाकृतीही आढळतात. गुहांमधील अनेक चित्रे ही शिकारचित्रे आहेत. टोळ्यांच्या रूपात एकत्र राहणाऱ्या त्या वेळच्या माणसाने नंतर येणाऱ्या टोळीसाठी लिहिलेला तो संदेशच होता, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच त्यावेळचे ते ‘सोशल नेटवर्किंग’च मानायला हवे. या गुहाचित्रांबद्दल जगभरात सुरू असलेल्या संशोधनामध्ये अनेक तज्ज्ञांना पडलेल्या प्रश्न होता तो या चित्रांमधील ठिपक्यांचा. चित्रांमधील हे ठिपके नेमके काय सांगायचा प्रयत्न करत आहेत? अलीकडेच लंडनमधील एका फर्निचर संवर्धकाने या ठिपक्याचा उलगडा केला… त्याविषयी
आणखी वाचा : विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?
गुहाचित्रांचा कालखंड नेमका कोणता?
जगभरात सापडणारी बहुसंख्य गुहाचित्रे ही अश्मयुगातील आहेत. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे त्याचे ढोबळ टप्पे आहेत. यातील पुराश्म युगाच्या उत्तर कालखंडापासून प्रामुख्याने गुहाचित्रे अस्तित्वात आलेली दिसतात. त्यानंतर बहुसंख्य गुहाचित्रे ही मध्याश्मयुगातील असून त्यानंतर नवाश्मयुगात ही सापडतात. काही ठिकाणी तर पूर्वजांची आठवण म्हणून गुहेत जाऊन चित्र काढण्याचा विधि आजही पाळला जातो.
भारतात गुहाचित्रे आहेत का? कुठे?
भारतात मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी अशा प्रकारे अश्मयुगातील तिन्ही कालखंडांमधील गुहाचित्रे आढळली आहेत. विष्णू श्रीधर वाकणकर या ज्येष्ठ पुराविदांकडे त्याचे श्रेय जाते. त्यांची जन्मशताब्दी अलीकडेच साजरी करण्यात आली. गुहाचित्रांचा कालखंड ३० हजार वर्षांपूर्वीचा सांगितला जातो.
गुहाचित्रांविषयी औत्सुक्य…
गुहाचित्रांमधील विषयांबाबत आजही संशोधक, पुरातत्वज्ञ आदींना प्रचंड औत्सुक्य आहे. मुळात त्या वेळच्या मानवाने ही का चितारली? वेळ घालवण्यासाठी (टाइमपास) म्हणून ती चितारली असावीत का, असा प्रश्न सुरुवातीच्या कालखंडात अनेकांना पडला होता. मात्र तत्कालीन कालखंडात आपल्या नंतर येणाऱ्या टोळीच्या मदतीसाठीच संकेत- संवाद- संदेश म्हणून ती चितारण्यात आली यावर आता जगभरातील संशोधकांचे एकमत झाले आहे.
या गुहाचित्रांमधील ठिपके नेमके काय सांगतात?
अनेक गुहाचित्रांमध्ये ठिपके पाहायला मिळतात. ठिपक्यांची संख्याही विविध चित्रांमध्ये वेगवेगळी आहे. काही वेळेस प्राण्यांच्या पोटामध्ये तर काही वेळेस बाहेरच्या बाजूस हे ठिपके दर्शविण्यात येतात. या ठिपक्यांना अर्थ नक्कीच आहे पण तो नेमका काय, याचा उलगडा करण्यात आजवर यश आलेले नव्हते.
आणखी वाचा : विश्लेषण : पाच हजार वर्षांपूर्वीची स्मार्ट शहरे नक्की होती तरी कशी? राखीगढीत मिळाले उत्तर…!
हा उलगडा कुणी केला?
लंडनमधील बेन बेकन हे जुन्या फर्निचरचे संवर्धक असून त्यांना हिमयुगादरम्यान तब्बल २० हजार वर्षांपूर्वी चितारण्यात आलेल्या गुहाचित्रांमधील ठिपक्यांचा शोध घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकांना आपल्या संशोधनात जोडून घेतले. भरपूर गुहचित्रे पाहिली. त्याविषयीची माहिती वाचली आणि युरोपातील या गुहाचित्रांमध्ये मासा, रेनडिअर आणि गुराढोरांचे चित्रण होते. त्यांच्यामध्ये येणाऱ्या ठिपक्यांचा अर्थ शोधण्यासाठी त्यांनी ब्रिटिश लायब्ररी गाठली आणि जगभरातून गुहाचित्रांची माहिती गोळा केली. त्यात काही विशिष्ठ पॅटर्न सापडतोय का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना पॅटर्न लक्षात आला.
गुहाचित्रांमधील ‘Y’ या खुणेचाही त्यांनी शोध घेतला. कदाचित जन्माशी संबंधित अशी ही खुण असावी, असे त्यांना वाटले. कारण एका रेषेच्या नंतर पुढे दुभंगत जाऊन दोन रेषा होतात. त्यामुळे या खुणेचा संबंध जन्माशी असावा, असा त्यांचा प्राथमिक अंदाज होता.
ठिपक्यांचा अर्थ कसा उलगडला?
ड्युऱ्हॅम विद्यापीठातील दोन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मधील अशा तीन प्राध्यापकांसोबत बेकन यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस असे लक्षात आले की प्राण्यांचा समागमाच्या कालखंडाशी याचा काही संबंध असावा. त्यावर जवळपास सर्वांचेच एकमत झाल्यानंतर पुन्हा एका सर्व गुहाचित्रे एकत्र शोधून प्राण्यांचे समागमाचे हंगाम आणि हे ठिपके यांचा अर्थ लावला असता. चांद्रमासानुसार येणाऱ्या प्राण्यांच्या समागमाच्या हंगामाची मानवाने केलेली ती नोंद होती, असे लक्षात आले.
आणखी वाचा : विश्लेषण : इस्राइल-पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाचे कारण ठरलेली अल-अक्सा मशीद आहे तरी काय?
या उलगड्याचा शीत कालखंडाशी काही संबंध आहे का?
हो, खास करून ज्या गुहाचित्रांवर बेकन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले. ती २० हजार वर्षांपूर्वीची होती. त्यावेळेस शीत कालखंड होता. अशा वेळेस वनस्पती उगवत नाहीत त्यावेळेस पूर्णपणे प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून राहावे लागते. समागमानंतरच्या कालखंडात प्राण्यांची संख्या वाढते, तेव्हा ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यावर गुजराण करणे माणसाला सोपे जाते. चांद्रमासानुसार केलेली ही नोंद म्हणजे पहिली मानवी कालगणनाच असल्याचे बेकन यांचे मत आहे. या संदर्भातील त्यांचे संशोधन अलीकडेच केंब्रिज आर्किऑलॉजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आणि ही माहिती जगासमोर आली. आपले पूर्वजही आपल्याच सारखे विचार कऱणारे होते, हेच यातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया बेकन यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
या शोधामुळे आणखीही काही उलगडा होण्याची शक्यता आहे का?
हो, भारतातही काही गुहाचित्रांमध्ये ठिपके पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अनेक लेणी आणि गुहांमध्ये तसेच बाहेरही ठिपके कोरलेले दिसतात. याशिवाय जगभरातही अनेक गुहाचित्रांमध्ये असे ठिपके पाहायला मिळतात. याशिवाय इतरही काही सांकेतिक चित्र आहेत, या शोधामुळे त्याचाही विचार आता संशोधकांकडून नव्याने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.