संरक्षण दलाच्या Defence Acquisition Council (DAC) बैठकीत संरक्षण दलासाठी तब्बल चार हजार २७६ कोटी रुपये किंमतीची विविध शस्त्रे विकत घ्यायचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये लष्करासाठी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर, शिवलिक वर्गातील युद्धनौकांसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, नौदलासाठी नव्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका घेतल्या जाणार आहेत. यामध्ये आता एका वेगळ्या शस्त्राची भर पडली आहे ती म्हणजे VSHORAD क्षेपणास्त्र प्रणाली.
VSHORAD म्हणजे Very Short Range Air Defence System म्हणजेच कमी उंचीवरील हवेतील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे एकाद्या संयत्रातून डागण्याची आवश्यकता नाही, तर ही एखादा सैनिक खाद्यांवरुनही हे क्षेपणास्त्र डागत हवेतील लक्ष्याचा भेद करु शकतो. या VSHORAD ची निर्मिती हे DRDO ने म्हणजेच ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ ने केली आहे.
VSHORAD नेमकं कसं आहे?
जमिनीवरुन कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद करणाऱ्या या क्षेपणास्त्राबद्दल माहिती काहीशी गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र या नव्या निर्णय़ामुळे काही माहिती हळूहळू उघड होत आहे. या नव्या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या आत्तापर्यंत झाल्या असल्याची माहिती आहे. जास्तीत जास्त सहा किलोमीटर उंचीपर्यंत लक्ष्य मग ते ड्रोन, हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमान भेदण्याची क्षमता या नव्या क्षेपणास्त्रात असणार आहे.
हे क्षेपणास्त्र दोन मीटर लांबीच्या एका नळकांड्यात बंदिस्त असेल, ज्याचे एकुण वजन हे २० ते २५ किलोच्या दरम्यान असेल. सैनिकाने खांद्यावरुन डागल्यावर लक्ष्यातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा ( Infrared homing ) माग घेत लक्ष्यभेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. क्षेपणास्त्राच्या टोकावर सुमारे २ किलो वजनाचे स्फोटक असेल जे लक्ष्य जवळ आल्यावर त्याचा स्फोट होईल आणि त्यातून निघणाऱ्या धातुच्या तुकड्यांनी लक्ष्य नष्ट होईल अशी सर्वसाधारण याची रचना असावी असा एक अंदाज आहे. याचा वेग ध्वनीच्या दीडपट म्हणजे १.५ मॅक एवढा असावा असाही एक अंदाज आहे.
नव्या क्षेपणास्त्राचे महत्व काय?
देशाला लागून असलेली चीनची सीमा ही बहुतांश ठिकाणी हिमालय पर्वत रांगेमुळे मोठ्या प्रमाणात उंच सखल आहे. काही ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने दोन्ही देशांनी सैन्य तैनात केलं असून हवाई क्षेत्र हे जास्त संवेदनशील झालं आहे. अशा पर्वतीय भागातून शत्रू पक्षाचे हवेतील लक्ष्य भेदणे हे VSHORAD क्षेपणास्त्र प्रणालीमुळे काहीसे सोपे होणार आहे. त्यामुळे चीन काय पाकिस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा ( LOC ) इथेही हे क्षेपणास्त्र उपयुक्त ठरु शकणार आहे.
१९७९ ते १९८९ दरम्यान सोव्हिएत रशियाचे सैन्य हे अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून होते. तेव्हा अमेरिकने पुरवलेल्या आणि अफगाण मुजाहिदीनने वापरलेल्या Man-portable air-defense systems (MANPADS) या क्षेपणास्त्रांनी डोंगराळ भागातील लढायांमध्ये रशियाची दाणादाण उडाली होती, मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने गमावली होती.
रशियाकडून भारतीय सैन्यदल अशाच प्रकारची Igla-M ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार होते. मात्र त्याची किंमत तसंच केंद्र सरकारचे आत्मनिर्भर धोरण, बदलेली संरक्षण आयात नियमावली यामुळे DRDO ने भारतीय उद्योग क्षेत्राचा आधार घेत VSHORAD ची निर्मिती केली आहे.
तेव्हा सध्याच्या काळातील बदलेल्या पर्वतीय युद्ध प्रकारात (mountain warfare ) मध्ये प्रशिक्षित सैन्य तुकडीकडे VSHORAD क्षेपणास्त्र महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे.