अनिकेत साठे
आपली क्षमता जोखण्यासाठी भारतीय हवाई दलाने नुकतीच १० दिवसीय ’गगन शक्ती – २०२४‘ ही विशाल युद्ध कवायत पूर्ण केली. देशभरात विखुरलेले हवाई दलाचे तळ, आस्थापना या कवायतीत पूर्ण क्षमतेने सहभागी झाल्या. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील संभाव्य युद्धे,तसेच नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी हवाई दलाच्या कार्यक्षमतेची चाचणी यातून घेण्यात आली.
’गगन शक्ती २०२४‘ काय आहे?
छोट्या वा तीव्र स्वरूपाच्या युद्ध परिस्थितीत समन्वय, तैनाती आणि हवाई शक्ती यांची कार्यक्षमता व तयारीचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने हवाई दलातर्फे देशव्यापी युद्ध कवायतीचे आयोजन केले जाते. ‘वायू शक्ती’नंतर ‘गगन शक्ती’ ही हवाई दलाची सर्वांत मोठी युद्ध कवायत मानली जाते. हवाई दलाच्या देशात सात कमांड आहेत. त्यांच्याकडील सर्वच युद्धसामग्री वापरात आणली जाते. खोलवर हल्ल्यापासून ते हवाई प्रभुत्व राखण्यापर्यंतच्या अनेक पैलूंवर सराव केला जातो. यात हवाई तळाची सुरक्षा, रासायनिक, जैविक, आण्विक हल्ल्याप्रसंगी मोहीम कार्यान्वित ठेवणे, बॉम्बफेक झालेल्या धावपट्टीची दुरुस्ती अशा विविध तंत्रांचाही अंतर्भाव असतो. युद्ध कार्यवाहीची व्यवहार्यता तपासली जाते. बोध घेतला जातो. दलाच्या कार्यात्मक व युद्ध क्षमतेची प्रचिती देणारी ही कवायत असते. लढाऊ विमानात हवेत इंधन भरणे, छत्रीधारी सैनिकांना विशिष्ट जबाबदारी देऊन उतरवणे, आघाडीवरील तळावरून जखमींना हवाईमार्गे हलवणे, शोध व बचाव मोहीम असेही सराव केले जातात. यंदा कवायतीत हवाई दलाचे १० हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
हेही वाचा >>>लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?
कवायतींचे महत्त्व काय?
आपली युद्ध योजना प्रमाणित करणे, विद्यमान मानक कार्यप्रणाली (एसओपी) आणि प्रक्रियेत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट कवायतीतून साध्य होते. सामर्थ्य, बलस्थाने कळतात. काही उणिवा आढळल्यास त्यावर काम करण्याची दिशा मिळते. गतवेळच्या ’गगन शक्ती – २०१८’ कवायतीत ११५० हून अधिक विमानांचा समावेश होता. हवाई दलाने १३ दिवसांत ११ हजार सॉर्टी (विमान, हेलिकॉप्टरचे एकदा उड्डाण व अवतरण) करीत साऱ्यांना आश्चर्यचकीत केले होते. यातील नऊ हजार सॉर्टी केवळ लढाऊ विमानांच्या होत्या. १९७१ च्या भारत-पाक युद्धात दलाने दोन्ही आघाड्यांवर १४ दिवसांत दररोज ५०० आणि एकूण सात हजार सॉर्टीज केल्या होत्या. अतिशय कार्यक्षम पद्धतीने या कवायतीचे नियोजन केले जाते. एका आघाडीहून दुसऱ्या आघाडीवर युद्धसामग्री, मनुष्यबळ हलविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची पडताळणी होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, टेहेळणी यंत्रणा, भात्यातील क्षेपणास्त्र आदींच्या सेवा क्षमतेचे अवलोकन होते. तिन्ही दलातील समन्वय वृद्धिंगत करण्यास हातभार लागतो.
हेही वाचा >>>आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
लष्कराचा सहभाग कसा?
जैसलमेरच्या पोखरण फायरिंग रेंजसह विविध भागात आयोजित कवायतींसाठी भारतीय लष्कराने रसद पुरवठ्याची जबाबदारी सांभाळली. हवाई दलाच्या कार्यात्मक रेल्वे एकत्रीकरण योजनेच्या पैलूंचे प्रमाणीकरण करण्यासाठी दलाचे सुमारे १० हजार कर्मचारी आणि दारूगोळा यांच्या देशभरात वाहतुकीचे खास नियोजन करण्यात आले. लष्कराने वेगवेगळ्या भागातून १२ रेल्वेगाड्या, त्यांचे वेळापत्रक, भोजन व अन्य सुविधांची पूर्तता केली. शस्त्रागारातून सरावाच्या ठिकाणी दारूगोळा पुरवण्यासाठी दोन स्वतंत्र दारूगोळा वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या तयार करण्यात आल्या. छोट्या तुकड्यांची वाहतूक सुलभ करण्यासाठी एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले गेले. हालचाली नियंत्रण विभागाने स्थापलेल्या कक्षावर या विशेष रेल्वेगाड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात ‘जॉइन्ट थिएटर कमांड’ स्थापण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या कवायतीत त्याचे दर्शन घडते.
आगामी कवायत कशी असणार?
’तरंग शक्ती‘ या बहुराष्ट्रीय हवाई दल कवायतीचे यजमानपद भारतीय हवाई दलास मिळाले आहे. यामध्ये जगातील १२ राष्ट्रांची हवाई दले सहभागी होण्याचा अंदाज आहे. चालू वर्षात भारतात होणारी ही सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कवायत असेल. त्यातून माहितीची देवाण-घेवाण, कार्यात्मक क्षमतेत सुधारणा, परस्परांकडून सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे आणि सहभागी देशांतील लष्करी सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.