गेली दोन वर्ष करोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध असल्यामुळे यंदाची दिवाळी देशभरात उत्साहाने साजरी केली जात आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत ठिकठिकाणी दिव्यांच्या या सणाचा आनंद घेतला जात आहे. मात्र, या फटाक्यांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फटाक्यांमुळे आकाश जरी उजळत असले तरी त्याचा परिणाम पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. फटाक्यांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत असून त्यामुळे हवा दुषित होत आहे. फटाके फुटल्यानंतर त्यातील सल्फर, झिंक, कॉपर आणि सोडियम या रसायनांनी भरलेल्या धुळीच्या कणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Diwali Photos: दिवाळीत उजळलं मरीन ड्राइव्ह, शिवाजी पार्क; मुंबईकरांचा एकोपा दाखवणारी सुंदर दृश्य पाहा

फटाक्यांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?

वायू प्रदूषण: फटाक्यांमध्ये विषारी वायू आणि रासायनिक घटक असतात. हवेशी संपर्कात आल्यानंतर हे घटक सक्रीय होतात, ज्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होते. प्रदूषणामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

जागतिक तापमानवाढ: फटाक्यांमुळे वातावरणातील उष्णतेसह कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढते. या दुषित हवेमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते.

ध्वनी प्रदूषण: मोठ्या आवाजाचा थेट प्रभाव मानवी आयुष्यावर पडतो. यामुळे वृद्ध लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील बाळाच्या आरोग्यालादेखील यामुळे धोका बळावतो.

आगीच्या घटनांमध्ये वाढ: मोठी आग लागण्यासाठी एक ठिणगीदेखील पुरेशी असते. त्यामुळे फटाक्यांना योग्यरित्या न हाताळल्यास मोठ्या आगीच्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. यामुळे बाह्य नुकसानासोबतच श्वसनाच्या आजाराचाही सामना करावा लागू शकतो.

प्राण्यांना धोका: दिवाळीच्या दिवसांमध्ये मुक्या प्राण्यांचे अतोनात हाल होतात. फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांचे शरीर जास्त प्रमाणात थरथरते, शिवाय त्यांच्या भुंकण्यामध्ये वाढ होते. आवाज आणि धुरामुळे प्राण्यांमध्ये मनोविकृतीदेखील बळावते.

Diwali 2022 : या भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न पडलाय? मग पर्यायांची ही यादी एकदा पाहाच

फटक्यांमधील रसायनांमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?

फटाक्यांमधील कॉपरमुळे श्वसनाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. यातील कॅडमियम या रासायनिक घटकामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. यामुळे अनेक जणांना ‘अ‍ॅनिमिया’ या आजाराचा सामना करावा लागतो. फटाक्यांमधील मॅगनेशियम आणि झिंकमुळे काही जणांना ताप आणि उलट्यांचा त्रास होतो. फटाक्यांमधील लीड थेट मज्जासंस्थेवर परिणाम करते. तर सोडियममुळे शरीर भाजले जाऊन जखम होण्याची शक्यता असते.

  • फटाक्यांमुळे संसर्ग आणि एलर्जीने ग्रस्त रुग्णांना आणखी गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. या रुग्णांमध्ये घसा आणि छातीचे आजार बळावतात.
  • फटाक्यांमधील धुरामुळे डोळे, कान, नाक आणि घशाला दुखापत होऊ शकते. वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे हृदय, श्वसनासह मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
  • आकाशात रंग पसरविण्यासाठी फटाक्यांमध्ये किरणोत्सारी आणि विषारी घटकांचा वापर केला जातो. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. फटाक्यांच्या आतिषबाजी दरम्यान गर्भपात टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी घरात राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
  • फटाक्यांमधील रासायनिक घटकांमुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय शरीरामधील विषारी घटकांमध्येदेखील वाढ होते.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How firecrackers and chemicals used in it affect human health and environment rvs