काही दिवसांपासून भाजीपाल्याचे, विशेषतः टोमॅटो आणि इतर खाद्यपदार्थांचे दर वाढल्यामुळे अनेकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले. भारतीय लोक आपल्या जेवणात म्हणजे थाळीमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करतात. या थाळीमधील आवश्यक असणारे अनेक खाद्यपदार्थ, भाजीपाला यांचे दर अचानक वाढल्यामुळे मध्यमवर्गीय भारतीय त्यात होरपळून निघाला. आकडेवारीत सांगायचे झाल्यास एक शाकाहारी थाळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात २४.२६ टक्के; तर मांसाहारी थाळीच्या खर्चात १२.५४ टक्के एवढी वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने घरांवर कसा परिणाम झाला?

मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीची तुलना केल्यास ऑगस्ट २०२३ मध्ये शाकाहारी थाळी बनविण्याच्या दरात २४.२६ टक्क्यांची वाढ होऊन, ही थाळी ३३.८ रुपयांवर (ऑगस्ट २०२२ मध्ये २७.२ रुपये लागत होते) पोहोचली; तर मांसाहारी थाळी तयार करण्यासाठी ६७.३ रुपये (ऑगस्ट २०२२ मध्ये ५९.८ रुपये लागत होते) लागणार आहेत, असा अहवाल क्रिसिल (Crisil) या संस्थेने दिला आहे. याचा अर्थ पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला एका वेळची शाकाहारी थाळी बनविण्यासाठी या वर्षी ३३ रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. तर, एका वेळच्या मांसाहारी थाळीसाठी मागच्या वर्षीपेक्षा ३७.५ रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. जर पाच जणांच्या कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाचा हिशेब लावला, तर या वाढीव खर्चामुळे शाकाहारी थाळीचा महिन्याचा खर्च १,९८० रुपयांवर; तर शाकाहारी थाळीचा खर्च २,२५० रुपयांवर पोहोचतो.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार २०२२ या वर्षात भारताच्या ग्रामीण भागातील पुरुष शेतमजुराला एका दिवसाला सरासरी ३२३.२ रुपये इतकी मजुरी मिळत होती. जर महिन्यातले २० दिवस काम केले, तर प्रतिव्यक्ती मासिक उत्पन्न ६,५०० रुपये एवढे होते. जर त्या कुटुंबात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील, असे मानले, तरीही त्यांच्या मासिक उत्पन्नातली जवळपास ७८ टक्के मजुरी ही दोन वेळची शाकाहारी थाळी बनविण्यासाठी खर्च होईल. [एक थाळी (३३.८) दिवसातून दोनदा म्हणजे ६७.६ रुपये; पाच जणांच्या कुटुंबासाठी ३० दिवसांचा हिशेब लावला, तर १०,१४० रुपये खर्च होतात]

दोन जणांच्या मजुरीतले जर ७८ टक्के पैसे (१३ हजार रुपये) जेवणावर खर्च झाले, तर शिक्षण, आरोग्य, कपडे, प्रवास व ऊर्जा यासाठी येणारा खर्च उरलेल्या २२ टक्क्यांत बसवावा लागेल. त्याचा अर्थ अशा शेतमजूर कुटुंबांना त्यांच्या रोजच्या जेवणावरील दर्जात तडजोड करावी लागेल; जेणेकरून त्यांचा खाण्यावरील खर्च कमी होऊन, त्यांना इतर बाबींवर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे उरतील.

थाळी पद्धत म्हणजे काय आणि तिची आकडेमोड कशी लावली?

भारतीय लोकांच्या रोजच्या जेवणात शाकाहारी-मांसाहारी, अशी थाळी पद्धतीने जेवण घेण्याची सवय आहे. शाकाहारी थाळीत चपाती (भाकर), भाजी (कांदा, टोमॅटो, बटाटा यांचा समावेश), भात, डाळ, दही आणि कोशिंबिर किंवा सलाडचा समावेश असतो. मांसाहारी थाळीमध्ये डाळ आणि भाजीच्या जागी चिकन येऊन बाकी सर्व पदार्थ तसेच राहतात.

‘क्रिसिल’च्या माहितीनुसार, भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या भागांमध्ये थाळीमध्ये अंतर्भाव असलेला भाजीपाला, खाद्यान्न यांचे वर्तमान दर काय आहेत? याच्या अंदाजावरून थाळी तयार करण्यासाठी किती खर्च लागू शकतो, याची आकडेवारी काढली जाते. जेवण तयार करण्याच्या खर्चात एखाद्या महिन्यात अचानक वाढ झाली, तर सामान्य माणसाचे खर्चाचे गणित बिघडते. आकडेवारीतून हेदेखील स्पष्ट झाले की, तृणधान्ये, डाळी, बॉयलर चिकन, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, घरगुती गॅस यांचे दरही थाळीच्या किमतीवर परिणाम करतात.

थाळीच्या किमतीमध्ये अचानक वाढ का झाली?

वर नमूद केल्याप्रमाणे शाकाहारी थाळी बनविण्याच्या दरात २४.२६ टक्क्यांची जी वाढ झाली, त्यातील २१ टक्के वाढ ही फक्त टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे झाली आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचो दर प्रतिकिलो ३७ रुपये एवढा होता; तर या वर्षी प्रतिकिलो १०२ रुपयांनी टोमॅटो विकला गेला. गतवर्षीपेक्षा टोमॅटोच्या दरात १७६ टक्क्यांनी ही वाढ नोंदवली गेली. ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत, कांद्याच्या दरात आठ टक्के, मिरची २० टक्के आणि जिऱ्याच्या दरात १५८ टक्क्यांनी वाढ झाली. या सगळ्याच्या दरवाढीमुळे परिणामस्वरूप शाकाहारी थाळीही महागली, अशी माहिती ‘क्रिसिल’ने दिली.

मांसाहारी थाळीबाबत बोलायचे झाल्यास, बॉयलर चिकनच्या किमतीमध्ये वर्षभरात केवळ एक ते तीन टक्क्यांची वाढ झाली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मांसाहारी थाळीच्या दरात फार विशेष दरवाढ पाहायला मिळाली नाही. तसेच वर्षभरात वनस्पती तेलाच्या किमतींमध्ये १७ टक्के आणि बटाट्याच्या दरात १४ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे दोन्ही थाळ्यांची दरवाढ काहीशी नियंत्रणात राहिली, असेही क्रिसिलच्या आकडेवारीतून समोर आले.

थाळीच्या किमतींमध्ये घट होईल?

क्रिसिलच्या माहितीनुसार, जुलै २०२३ च्या तुलनेत किरकोळ बाजारातील टोमॅटोचे दर सप्टेंबर महिन्यात कमी होऊन अर्ध्यावर म्हणजेच प्रतिकिलो ५१ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच घरगुती स्वंयपाकघरातील १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरमध्ये २०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात १,१०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर सप्टेंबर महिन्यात ९०३ रुपयांना मिळत आहे. या दोन्ही गोष्टींचा सकारात्मक परिणाम होऊन जेवणाचे ताटावरील खर्चाचा ताण कमी होऊ शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्याची वाढ केली; ज्यामुळे रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला. त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात अन्नधान्याची महागाई फारशी कमी होण्याची शक्यता नाही. टोमॅटोचे दर कमी झाल्यामुळे आता भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर ऑगस्ट महिन्यात सुमारे सात टक्के एवढा राहण्याची शक्यता आहे. जुलै २०२३ मध्ये चलनवाढीचा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे मागच्या १५ महिन्यातील हा उच्चांक ठरला होता.

अन्न महागाईवर आरबीआयची प्रतिक्रिया काय आहे?

भारतात दर दोन वर्षांनी बटाट्याच्या दरात वाढ होते; तर कांद्याच्या दरात २.५ वर्षांनी वाढ होत असते. प्रत्येक वर्षी जून-जुलैमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते. त्यामुळे भारतीयांसाठी भाजीपाल्याच्या किमतींमध्ये अचानक झालेली वाढ नवीन नाही. ‘बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज’मधील भारतीय अर्थतज्ज्ञ आस्था गुडवानी म्हणाल्या की, २०१० च्या आर्थिक वर्षापासून भाजांच्या किमतींमधील चढ-उताराच्या १२ भागांचे (१२ वर्षे) आम्ही विश्लेषण केले. त्यात असे दिसले की, भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी त्यात काही महिन्यांतच उतार पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षी दर कमी होण्यासाठी वेगवेगळा काळ लागलेला आहे. टोमॅटोचे दर कमी होण्यासाठी २०१०-११ साली ६१ दिवस आणि २०१६-१७ साली १४२ दिवस लागले होते.

या १२ भागांमध्ये भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआयने कशा प्रकारे प्रतिसाद दिला, याचेही विश्लेषण करण्यात आले. भाजीपाल्याची दरवाढ ही हंगामी असल्यामुळे आरबीआयने शक्यतो अशा घटनांवर धोरण ठरविण्याचे टाळले आहे. १२ भागांपैकी सहा वेळा अन्नधान्याच्या महागाईने उच्चांक गाठला असतानाही आरबीआयने रेपो दरात फारसा बदल केला नाही. दोन वेळा असे दिसले की, रेपो दरात २५ बीपीएसची कपात करण्यात आली (२०१९ साली कांद्याची महागाई) आणि १२ पैकी चार वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे, अशीही माहिती आस्था गुडवानी यांनी दिली.

टोमॅटो आणि कांद्यावर काय परिणाम झाला?

कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेच्या लाटा व मंडईतील संप यांमुळे टोमॅटो, कांदा व बटाटा यांच्या दरात चढ-उतार आलेले पाहायला मिळतात. या पदार्थांची मागणी तुलनेने नेहमी स्थिर असल्यामुळे पुरवठा खंडित झाला किंवा उत्पादन कमी झाल्यास महागाईची समस्या गंभीर बनते. आरबीआयच्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ या अहवालानुसार, प्रतिकूल हवामान आणि कीटकांच्या हल्ल्यांमुळे टोमॅटोच्या मुख्य उत्पादन क्षेत्रात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; ज्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.

टोमॅटो हे अत्यंत नाशवंत पीक असून, त्याचा उत्पादन कालावधीही कमी आहे. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये हंगामी फरक दिसून येतो. पण, ही दरवाढ अल्पकाळ टिकते, असेही आरबीआयने म्हटले आहे.